उन्हाळ्यात आवश्यक असलेले पेय l Refreshing top 10 summer drinks in Marathi

WhatsApp Group Join Now

सृष्टीचे कालचक्र अखंड सुरू असते. एका मागून एक ऋतू येतात आणि जातात. प्रत्येक ऋतू मधील हवामान वेगवेगळे असते. त्यानुसार आपल्या शरीरातील तपमान सुद्धा कमी जास्त होत असते. निसर्गानेच तशी रचना केलेली आहे. आयुर्वेदानुसार भारतीय उपखंडामध्ये कालचक्रा मध्ये सहा ऋतू असतात. शिशिर वसंत आणि ग्रीष्म हे तीन उत्तरायणातील ऋतू असतात. तर वर्षा हेमंत आणि शरद हे दक्षिणायनातील ऋतू असतात.

उत्तरायणात सूर्याची उत्तरेकडे हालचाल सुरू असते. हा काळ साधारण जानेवारीचा मध्य ते जून पर्यंत असतो. या काळात सूर्य आणि वारा प्रबळ असतो. सूर्यामुळे माणसाचे सामर्थ्य कमी होते. तसेच पृथ्वीची शीतलता पण कमी होते. त्यामुळे कडू, तुरट आणि तिखट या रसांमध्ये वाढ होते. त्यामुळे शरीराला कोरडेपणा येतो.

बाहेरील उन्हाचा दाह बघता मनुष्याला आपल्या शरीराला आवश्यक असे पोषण देणे गरजेचे असते. शरीरातील पाणी टिकवून ठेवण्याकरता, आवश्यक तेवढे पाणी शरीराला पुरवणे गरजेचे असते. म्हणूनच या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पेय पिऊन शरीराचा थंडावा टिकवता आला पाहिजे.

तर उन्हाळ्यात आवश्यक असलेले पेय refreshing summer drinks, in Marathi या लेखामध्ये आपण अकरा पेयांची  माहिती करून घेऊ की जे प्यायल्याने मनुष्याच्या शरीरातील पाणी तर टिकवून ठेवले जातेच व तेवढीच त्याला शक्ती मिळते. या सरबतांमध्ये किंवा पेयांमध्ये अनेक प्रकारचे खनिजे, विटामिन्स असतात.

१)ताक–घरीच विरजण लावलेल्या गोड दह्यामध्ये पाणी मिसळून त्याला घुसळले की ताक तयार होते. मग त्यामध्ये योग्य प्रमाणात सैंधव मीठ, साखर, थोडी मिरेपूड, जिरे पूड व हिंग घातले की अतिशय उत्तम चव येते. ताक हे पित्तशामक असते थंड असते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये शरीराला आवश्यक ते पाणी पुरवते. ताकामध्ये सुद्धा वेगवेगळ्या चवी आपण तयार करू शकतो. ताकाला थोडी तुपाची हिंग जिऱ्याची फोडणी देऊन आले घातले आणि जेवणानंतर जर त्याचे प्राशन केले तर अन्न पचनाला सुद्धा मदत होते. ताकामध्ये थोडा पुदिना आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा चवीला घालता येतो.थोडा सब्जा सुद्धा या पेयात टाकू शकतो.चवीनुसार बदल केले जाऊ शकतात.

२) लिंबू सरबत—उन्हाळ्यात काय तर बाकीच्या ऋतूंमध्ये सुद्धा लिंबू सरबत हे प्यायले तरी शरीराला त्याची मदतच होते. आवश्यक तेवढ्या पाण्यामध्ये लिंबू पिळले आणि मीठ व साखर घातली तर लिंबू सरबत तयार होते. यात आपण साध्या मिठाऐवजी सेंधा नमक वापरू शकतो. लिंबू सरबत हे फ्रीजमध्ये ठेवून अथवा त्यामध्ये बर्फ घालून प्यायल्याने शरीराला गारवा देते.

या लिंबू सरबतामध्ये थोडा सोडा मिसळून, पुदिन्याची पाने घातल्यास त्याची चव सुद्धा अतिशय उत्तम येते. पुदिना सुद्धा उन्हाळ्यात शरीराला थंडावा देतो.

३) जलजीरा–या पेयाला उन्हाळ्यात सर्वाधिक मागणी असते. हे पेय घरी तयार केले जाते किंवा तयार पावडर सुद्धा मिळते. त्यात फक्त पाणी घालून हे पेय तयार होतं. घरी तयार करण्याकरता थंड पाण्यामध्ये पुदिन्याची पानं, कोथिंबीरची पान, लिंबाचा रस, आंब्याची  कोरडी पावडर, चिंच, हिंग, काळे मीठ व थोडी साखर हे सगळे जिन्नस एकत्र करून तयार केले जाते. या पेयाला फ्रिजमध्ये तयार करून सुद्धा ठेवता येते व हवे तेव्हा पिता येते.

४) लस्सी–लस्सी करता थोडं आंबट गोड दही हवं असतं.

दह्यामध्ये पाणी मिसळून त्याला जर रवीने घुसळवले तर उत्तम प्रकारची लस्सी तयार होते. मिक्सरमध्ये घुसळवण्या पेक्षा रवीने घुसळले तर लस्सीला उत्तम चव येते. पाणी आणि दही यांचे मिश्रण व त्यात बर्फ घालून साखर आणि मीठ घालून जर रवीने दहा मिनिटे घुसळले तर लस्सी तयार होते. यामध्ये सुद्धा तुम्ही थोडं जिरेपूड तसेच बदामाचे काप, थोडे काजूचे काप घालून त्याला सजवू शकता. लस्सी हे उत्तर भारतात अतिशय प्रसिद्ध आहे. कारण तिथे उन्हाळ्यामध्ये तापमान अतिशय वरती जाते व त्याचप्रमाणे तिथे दूध दुभते सुद्धा भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे.

५) कलिंगडाचे सरबत–कलिंगडामध्ये पाण्याचा अंश भरपूर असतो त्यामुळे उन्हाळ्यामध्ये त्याचा वापर भरपूर प्रमाणात केला जातो. कलिंगडाचे सरबत करण्यासाठी किंवा कलिंगडाचा ज्यूस तयार करण्यासाठी कलिंगड कापून त्याच्या बिया काढून त्याचे लहान लहान तुकडे केले जातात. या तुकड्यांना मिक्सरमध्ये घालून, थोडं लिंबू, जिरेपूड, मिरेपूड व काळे मीठ घालून चवीपुरती साखर घालून, फिरवले व  गाळले की कलिंगडाचे सरबत किंवा ज्यूस तयार होतो. या सरबतात सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जिन्नस घालू शकतो. थोडा पुदिना सुद्धा घालता येतो किंवा आजकाल चाट मसाला मिळतो. त्याला अतिशय चटपटीत चव  असते तो घातला की सुद्धा या सरबताला अतिशय सुंदर चव येते.

६) कोकम सरबत—कोकम म्हणजे आमसूल. आमसूल हे नेहमीच पित्तनाशक असते व शरीराला थंडावा देते. बाजारामध्ये कोकम आगळ हे तयार मिळते. त्याचा वापर सरबत करण्याकरता केला जातो. एका भांड्यामध्ये थंड पाणी घेऊन त्यामध्ये कोकम आगळ मीठ ,साखर व जिरेपूड टाकली व सर्व नीट ढवळून घेतले की कोकम सरबत तयार होते. थोडा चाट मसाला टाकला की एक निराळीच चव येते. यामध्ये बाजारात चिया सीड्स मिळतात त्या टाकल्या की चव तर छान येतेच, पण याच्यामध्ये नैसर्गिक फायबर असते त्यामुळे पचनाला सुद्धा त्या उपयोगी असतात. Refreshing summer drinks, in Marathi

७) आवळा सरबत—आपल्याला माहितीच आहे की आवळ्यामध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात असतं.

आवळा सरबत तयार करण्यासाठी आवळ्याचा सिरप बाजारात मिळतो. तो वापरला जातो किंवा आवळे शिजवून किंवा किसून त्याच्यापासून घरी सुद्धा रस काढता येतो.

आवळ्याचा रस हा पाण्यामध्ये मिसळला जातो. त्यामध्ये थोडा आल्याचा रस, काळे मीठ, साखर, मीरे पुड, जिरेपूड एकत्र ढवळून घेतले व बर्फाचे खडे टाकून, त्यामध्ये थोडा पुदिना टाकला की अतिशय सुमधुर अशी चव या सरबताला येते. या सरबतांमध्ये साखरे ऐवजी गूळ सुद्धा घालता येतो. आवळ्याचा रस उपाशी पोटी सकाळी घेतल्यास सांधेदुखी सुद्धा कमी होते.

८) उसाचा रस—उसाचा रस घरी तयार करता येत नाही. तो पिण्याकरता आपल्याला बाहेर रसवंतीमध्येच जावे लागते. तिथे उसाच्या गुऱ्हाळामध्ये उसाच्या रसामध्ये लिंबू, आलं आणि बर्फ टाकून  रस मिळतो. अतिशय सुमधुर असा उसाचा रस प्यायल्याने शरीराला खूप ताजेतवाने वाटते. जे लोक दिवसभर बाहेर कष्ट करतात अशा लोकांना करता उसाचा रस तर जीवनदायिनीच  आहे. Refreshing top 10 summer drinks in Marathi

९) पन्हं —उन्हाळ्यातील घराघरातील अतिशय आवडते असे हे पेय आहे. कच्च्या कैरीला उकडून तिचा गर काढल्या जातो. त्या गरामध्ये साखर किंवा गूळ घालून त्याला मिक्सरमध्ये फिरवले जाते. काळे मीठ, जिरेपूड व मिरेपूड घालून थोडा बर्फ घालून प्यायला दिले जाते. पन्ह हे दाहनाशक आहे त्यामुळे उन्हाळ्यात तर त्याचा उपयोग नक्की करावा.

१०) बेलाचे सरबत—उन्हाळ्यामध्ये अंगाची लाही लाही होत असताना अतिशय उत्तम असे गुण असणाऱ्या बेलाच्या फळाचे सरबत हे फायदेशीर ठरते. आयुर्वेदात सुद्धा बेलफळाचे महत्त्व सांगण्यात आलेले आहे.  दररोज जर बेलफळाचा रस घेतला तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.बेल फळांमध्ये प्रोटीन्स, थायमिन, रायबो फ्लेमिंग, विटामिन सी यासारखे तत्व आढळतात. बेलफळामुळे गॅस आणि पोट दुखी सुद्धा कमी होते. उन्हाळ्यामध्ये विशेष करून पोटाचे आजार उद्भवतच असतात. त्याकरता हा रामबाण उपाय आहे. बेलफळाच्या आतील गर काढून त्यामध्ये गूळ घालून त्याचे सरबत प्यायले असता त्याने डीहायड्रेशन झालेले असले तर परत शरीराला हायड्रेट करता येते. अति उन्हाळ्यामुळे तोंडात फोड झाले असले तर बेलफळाचा रस नक्की सेवन करावा.

११) थंडाई —हे पेय होळीच्या सुमारास बनवले जाते तसेच उन्हाळ्यात सुद्धा याचे सेवन केले जाते. या पेया करता दूध, साखर, भिजवलेली खसखस, भिजवलेले बदाम, गुलाब पाणी, भिजवलेले तुळशीचे बी व वेलदोडा यांची गरज असते. तिची कृती करताना  आपल्याला जितकी थंडाई तयार करायची आहे, तेवढं दूध घेऊन त्याला थोडा आटवायचे आणि बाकीचे जिन्नस यात घालून, त्यामध्ये बर्फ घालून दिले जाते. अतिशय रुचकर आणि थंड पेय आहे.

वरील सगळे पेय आपल्याला गारवा देतातच, पण त्याचबरोबर अनेक प्रकारचे आईस्क्रीम, मिल्क शेक, शहाळे, व अनेक पश्चिमात्य पेय, असे थंडावा देणारे पेय आपल्याला बाजारात मिळतात. त्याने सुद्धा अनेक जण उन्हाळ्यातील तपमानाला  कमी करण्याचा प्रयत्न करतात. शेवटी माणूस आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीला तोंड देऊन नेहमीच पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो.

तर उन्हाळ्यात आवश्यक असलेले पेय refreshing summer drinks in Marathi हा लेख आपल्याला कसा वाटला हे नक्की कळवा. प्रतिक्रिया द्या. आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा व त्याकरता आमच्या लेखक मित्र या वेबसाईटला जरूर भेट द्या. व्हाट्सअप चॅनेल नक्की जॉईन करा. धन्यवाद!

6 thoughts on “उन्हाळ्यात आवश्यक असलेले पेय l Refreshing top 10 summer drinks in Marathi”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top