आंबा आणि आंब्याच्या जाती l Types of Mangoes in India

WhatsApp Group Join Now

 आंबा आणि आंब्याच्या जाती

आपण सर्वच ज्याची आतुरतेने वाट पाहत असतो तो फळांचा राजा आंबा याचे बाजारपेठेत दिमाखात आगमन झाले आहे. लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारे हे फळ आहे. आंबा हे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटले ना! अशीच काहीशी स्थिती सर्व आंबाप्रेमींची दिसून येते. आंब्याच्या विविध प्रकार (जाती) बघायला मिळतात. कित्येकदा आपल्याला आंबा खरेदी करताना आंब्याची कोणती जात आहे हे ओळखता येत नाही. अलीकडे हापूस आंबा हा लोकप्रिय असल्याने हापूस आंब्याच्या नावाने सामान्य आंब्याची सर्रास विक्री केली जाते. तर हा विविध प्रकारचा(जातीचा) आंबा कसा ओळखावा? त्याचे प्रकार( जाती) कोणकोणते आहेत हे आज आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत.

आंबा फळाचा इतिहास

आंबा हे फळ जगभरात प्रसिद्ध आहे. विषुवृत्तीय प्रदेशात आढळणारे हे झाड आहे. साधारणतः एप्रिल ते जून दरम्यान या फळाचा मोसम असतो. दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशिया मध्ये जैववैविध्य पाहता व तेथील 250 ते 300 लक्ष वर्षांचा इतिहास पाहता आंब्याचा उगम ह्या भागात झाला असावा असे मानले जाते.

भारत आणि पाकिस्तान या देशाचे राष्ट्रीय फळ आंबा आहे. तसेच फिलिपाईन्सचे राष्ट्रचिन्ह आणि बांगलादेशाचे राष्ट्रीय झाड आहे. हजारो वर्षापासून दक्षिण आशियामध्ये आंब्याची लागवड करण्यात येत आहे. भारतीय संस्कृतीत आंब्याला विशेष महत्त्व आहे. जगाच्या आंबा उत्पादनात 56% आंब्याचे उत्पादन भारतात होते. जवळपास 1300 हून जास्त आंब्याच्या जाती भारतात आढळतात. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रकारचे आंब्याचे पीक घेतले जाते. आंब्याच्या कच्च्या फळाला कैरी म्हणतात.

भारतातील आंब्याच्या लोकप्रिय जाती कोणत्या व त्या कशा ओळखाव्यात?

भारतात आंब्याच्या अनेक जाती आहेत पण त्यातील काही जाती लोकप्रिय आहेत. प्रत्येक प्रांतानुसार व तेथील हवामानानुसार आंब्याची चव,आकार व रंग यात विविधता आढळते. आंब्याचे कोणते लोकप्रिय प्रकार (जाती ) आहेत ते पाहूयात.

1) हापूस आंबा

मुख्यतः महाराष्ट्रातील हा आंबा फारच लोकप्रिय असल्याने परदेशातही याला प्रचंड मागणी असते. चवीला गोड असणारा हा आंबा महाराष्ट्र सोबत कर्नाटकाच्या काही भागात हि आढळून येतो.कोकणातील हापूस आंबा हा त्याच्या अवीट चव व गोडीमुळे प्रसिद्ध आहे. कोकणातील खारे हवामान, जांभा दगड व तांबडी माती हि हापूस आंब्याला पोषक ठरते. 

कसा ओळखावा:

हापूस आंब्याचे वैशिष्ट्य म्हणजे याचा उत्तम स्वाद, आकर्षक रंग व आकार,तंतुविरहित गर आणि हे फळ पिकल्यानंतरही बरेच दिवस टिकते. हे फळ पिकल्यानंतर त्यावर सुरकुत्या दिसतात. यातील आतला गर केशरी रंगाचा असतो व याची साल पातळ असते. देठापासून उजवा भाग थोडा उंच असतो. या आंब्याला असलेल्या नैसर्गिक सुगंधामुळे तो ठराविक अंतरावरून सुद्धा पटकन ओळखता येतो.

2) पायरी आंबा

हापूस आंब्यानंतर कोकणातील पायरी आंबा देखील तितकाच प्रसिद्ध आहे. पायरी आंबा त्याच्या उत्तम स्वाद व गोडी साठी ओळखला जातो.हा आंबा पिकल्यावर जास्ती काळ टिकत नाही. पायरी आंब्याला आमरसासाठी जास्त मागणी असते.

कसा ओळखावा:

हापूसच्या तुलनेत अधिक गोड आणि रसाळ असतो.पायरी आंब्यावर लालसर रंगाची छटा असते.

3) तोतापुरी आंबा

तोतापुरी आंबा मुख्यतः कर्नाटक,आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यात आढळतो. तोतापुरी आंबा याला” बंगलोरा” या नावानेही ओळखले जाते. हा आंबा रंगाने हिरवा, पिवळसर असतो. हा आंबा चवीला सौम्य असतो तसेच या आंब्याची साल जाड असते. साधारण प्रतीचे असले तरी तोतापुरी आंबे हे टिकाऊ असतात. भरपूर आणि नियमित उत्पादन होत असल्यामुळे या आंब्याची निर्यात करता येते.

कसा ओळखावा:

या आंब्याचा आकार पोपटाच्या चोचीसारखा असतो, त्यामुळे तो सहज ओळखता येतो. याची दोन्ही टोके निमुळती असतात.

4) केसर आंबा

केसर आंब्याचा उगम प्रामुख्याने गुजरात येथील जुनागढ जिल्ह्यात गिरनार पर्वताच्या पायथ्याशी झाला असे मानले जाते. हा आंबा त्याची अप्रतिम चव आणि सुगंध यासाठी ओळखला जातो. या आंब्याची साल पातळ असते व हे मध्यम आकाराचे फळ आहे.

कसा ओळखावा:

पिकलेला केसर आंबा स्पर्श केल्यास मऊ लागतो आणि या आंब्यास गोड सुगंध येतो.तसेच या आंब्यावर पिवळसर केशरी छटा असतात.

5) रायवळ आंबा

भारतात नैसर्गिकरित्या ही जात आढळली जाते असे मानले जाते.रायवळ आंबा हा कोकणात मुबलक प्रमाणात आढळतो. ही एक गावरान किंवा देशी जात आहे. कलम नसलेल्या झाडावरचे आंबे म्हणजेच रायवळ आंबे. या झाडाचे संगोपन,निगा फक्त निसर्ग करतो. हापूस किंवा कलमी आंब्यांना जी मागणी असते तो मान रायवळ आंब्यांना मिळत नाही. हे आंबे साधारणतः चोखून खाल्ले जातात. रायवळ जातीत प्रदेशानुसार,राज्यानुसार विविधता आढळते म्हणजेच या आंब्याचा आकार,चव,रंग यात वैविध्य दिसून येते.

कसा ओळखावा:

रायवळ आंबा पूर्ण पिकल्या शिवाय त्यास रंग येत नाही. आणि हे फळ एकाच आकाराचे असेल असेही नाही.

6) दशेरी आंबा

महाराष्ट्रात दशेरी तर उत्तर भारतात दशहरी या नावाने आंबा ओळखला जातो. उत्तर भारतातील अतिशय प्रसिद्ध अशी ही जात आहे. हा आंबा उभट आकाराचा असतो. हे फळ मध्यम आकाराचे उभट पिवळ्या रंगाचे असते. हा आंबा इतर आंब्यांपेक्षा लवकर पिकतो आणि याची फळे इतरांच्या तुलनेत टिकाऊ असतात.

कसा ओळखावा:

या आंब्याचा रंग पिवळा, शेंदरी असतो. हे फळ मध्यम आकाराचे व उभट असते.

7) बदामी आंबा

बदामी आंबा हा मुख्यतः कर्नाटक मध्ये आढळून येतो. याला कर्नाटकचा हापूस म्हणून ओळखले जाते. कारण याची चव व आकार साधारणपणे हापूस आंब्यासारखा असतो.हा आंबा सामान्य पोषक तत्त्वांनी समृद्ध असतो. बदामी आंब्याचा आतील गर मलईदार, गुळगुळीत गोड आणि रसाळ असतो. याची चव जर्दाळू आणि पीच सारखी असते.

कसा ओळखावा:

बदामी आंबा हा काहीसा उभट ,अंडाकृती असतो. हा आंबा कापल्यावर आतून पिवळसर दिसतो. याची साल जाड व चमकदार असते.

8) नीलम आंबा

नीलम आंब्याचे उत्पादन तामिळनाडू,आंध्रप्रदेश आणि कर्नाटक घेतले जाते. नीलम आंब्याचा हंगाम उशिरा म्हणजे जुलै ते ऑगस्ट दरम्यान असतो. हा आंबा चवीला गोड व याला विशिष्ट गोड सुगंध असतो.

कसा ओळखावा:

नीलम आंबा आकाराने लहान,आयताकृती आणि टोकदार असतो. हा आंबा सोनेरी पिवळसर दिसतो.

9) लंगडा आंबा

लंगडा या आंब्याचा उगम उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे झाला आहे. हा आंबा जुलै ते ऑगस्ट दरम्यान बाजारात उपलब्ध होतो. पायाने अधू असलेल्या शेतकऱ्याने त्याच्या शेतात पहिल्यांदा याची लागवड केली होती म्हणून या आंब्याला लंगडा आंबा असे म्हटले जाते.

कसा ओळखावा:

हा आंबा पिकल्यानंतर ही बाहेरून हिरवाच दिसतो. तसेच आकाराने अंडाकृती असतो.

10) बैंगनपल्ली आंबा

आंध्र प्रदेशातील कर्नुल जिल्ह्यात बानागनपल्ले येथे या आंब्याचे उत्पादन केले जाते. त्यामुळे याला बैगनपल्ली असे म्हटले जाते. हे आंबे गुळगुळीत सालीचे व चवीला गोड असतात. 

कसा ओळखावा:

हा आंबा आकाराने अंडाकृती व हापूस आंब्यापेक्षा थोडा मोठा असतो.

11) चौसा आंबा

या आंब्याचे उत्पादन बिहार आणि उत्तर प्रदेश या प्रांतात घेतले जाते. चौसा ही आंब्याची जात शेरशाह सुरीने लोकप्रिय केली होती आणि हे नाव त्यांनीच दिले होते असे म्हणतात. हे फळ पिकल्यावर सोनेरी पिवळया रंगाचे दिसते.

कसा ओळखावा:

हे फळ आकाराने लहान, सोनेरी पिवळ्या रंगाचे,चवीने गोड व रसाळ असते.

12) हिमसागर आंबा

हा आंबा पश्चिम बंगाल आणि ओरिसाची खासियत आहे. गोड सुगंध हे त्याचे वैशिष्ट्य आहे.

कसा ओळखावा:

हे फळ मध्यम आकाराचे, गोड ,सुगंधी आणि हिरव्या रंगाचे असते.

•आंब्याच्या स्वादिष्ट पाककृती

सध्या आंब्याचा सिझन असल्याने आणि आंबा हा सगळ्यांचा पसंतीचा असल्याने त्यापासून बनणारे पदार्थही आपल्याला खायला आवडतात.तर पाहूयात आंब्याच्या काही पाककृती.

1)कैरीचे पन्हे :-

*साहित्य

अर्धा किलो कैरी, एक वाटी गूळ, अर्धी वाटी साखर, पाव टीस्पून मीठ, एक-दोन वेलच्या.

*कृती

कैऱ्या उकडून गर काढून तो मिक्सर मधून काढावा व त्यात गूळ,साखर,मीठ,वेलची पावडर घालून अंदाजे दीड लिटर पाणी घालावे.

*टीप 

पण हे जास्त पातळ करू नये.आंबट वाटल्यास गूळ जास्त घालावा.

2)आंबा बर्फी :-

*साहित्य

2 वाटी मावा, दीड वाटी हापूस आंब्याचा रस, 2 वाटी साखर,1 टीस्पून तूप.

कृती :-

तुपावर मावा थोडा परतून घ्यावा. आंब्याचा रस मिक्सरमधून काढून, त्यात साखर घालून गॅसवर ठेवून ढवळत रहावे.रसाचा पक्का पाक होऊन कडेने साखर दिसू लागली की मावा घालून मिश्रण ढवळावे व चांगले उकळल्यावर भांडे खाली घेऊन गोळा होईपर्यंत ढवळावे. मिश्रणाचा गोळा होत आल्यावर भांड्याला तुपाचा हात लावून त्यात गोळा ओतून व चांगले थंड झाल्यावर वड्या कापाव्यात.

वरील दिलेल्या माहितीत तुम्हाला कुठल्या जातीचा आंबा जास्त आवडतो तसेच ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन कथा,माहितीपर लेख, बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. त्यासाठी आमच्या लेखक मित्र या वेबसाईटला नक्की भेट द्या व आमचा व्हाट्सअप ग्रुप ही जॉईन करा.

                           धन्यवाद

4 thoughts on “ आंबा आणि आंब्याच्या जाती l Types of Mangoes in India”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top