उद्योजक होण्यासाठी महत्त्वाचे १० गुण

WhatsApp Group Join Now

उद्योजकतेची व्याख्या करायची झाल्यास असे म्हणता येईल की – एखादा व्यवसाय उपक्रम असा विकसित करणे की त्यातून योग्य मार्गाने अधिकाधिक नफा मिळविण्यासाठी विविधांगी सातत्यपूर्ण आयोजन करणे, आणि त्यात अनुस्यूत असलेल्या अनिश्चिततेला स्वीकारून तो उद्योग चालविण्याची क्षमता बाळगणे. वास्तविक उद्योग करणे हे मोठ्या जोखिमेचे व धाडसी कार्य आहे. त्यासाठी उद्योजकाला अनेकविध गुण अंगी बाणवण्याची गरज असते. त्यातील प्रमुख दहा गुण खालीलप्रमाणे सांगता येतील –

१] उत्कटता (Passion) :-

उद्योजकाला आपल्या कामाबद्दल अत्यंत उत्कटता अर्थात Passion असणे जरूरी असते. ही उत्कटताच अनिश्चिततेच्या काळात कामाचा जोम कायम ठेवते. उत्कट व्यावसायिक होण्यासाठी, कामाच्या गाभ्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते. केवळ अधिक पैसे कमविण्याचे ध्येय ठेवण्याऐवजी, कामात प्रगतीशील रहाण्याचे धोरण ठेवणे महत्त्वाचे आहे. उत्कटता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायला मदत करते आणि व्यवसायात जेव्हा कठीण काळ येतो तेव्हा चिवटपणे तगून राहायला मदत होते.    

२] उत्पादन किंवा सेवा ज्ञान (Product / Service Knowledge) :-

उद्योजक जे उत्पादन किंवा सेवा देऊ इच्छितात त्याची इथ्यंभूत माहिती असणे आवश्यक असते. आपल्या उत्पादन किंवा सेवेची बाजारातील भूमिका आणि त्याची आपल्या ग्राहकांसाठी उपयुक्तता याबद्दल स्पष्टता असणे खूप आवश्यक. ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा आपल्याला वेगळे व वरचढ ठेवण्यासाठी बाजारपेठेचा सतत अभ्यास करणे आवश्यक आहे.

३] जोखीम व्यवस्थापन (Risk Management) :-

उद्योजकांना व्यवसायात अपरिहार्यपणे जोखीम पत्करावी लागते. कठीण परिस्थितीला सामोरे जाताना सर्व परिस्थितीचे नियोजन करून विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक असते. जोखीम व्यवस्थापनात आस्थापनाच्या दीर्घकालीन टिकाऊपणा आणि कार्यक्षमतेसाठी, संभाव्य धोके शोधणे, मूल्यांकन करणे आणि त्यावरील उपाययोजना यांचा समावेश होतो. कंपनीला धोक्यात आणू शकणारे अंतर्गत आणि बाह्य घटक शोधण्यासाठी, कठोर जोखीम मूल्यांकन आवश्यक असते. त्यासाठी दैनंदिन कामकाजातील जोखीम, नियामक बदल, स्पर्धात्मक वातावरण आणि बाजारातील अस्थिरता यासह विविध घटक विचारात घ्यावे लागतात. चांगले व्यावसायिक जोखमीचे परिणाम कमी करण्यासाठी योग्य रणनीती आणि पर्यायी योजना आखतात.

४] आर्थिक व्यवस्थापन (Financial Management) :-

उद्योजकांनी आपल्या व्यवसायाची सद्य आर्थिक स्थिती, भूतकाळातील आर्थिक नोंदी आणि भविष्यातील आर्थिक उद्दिष्टे यांचा सतत मागोवा घेणे आवश्यक असते. पदरी चांगला लेखापाल असला तरी अंतिम निर्णय घेणारा तो उद्योजकच असल्याने, त्याला आपल्या व्यवसायाच्या आर्थिक परिस्थितीची चांगली माहिती असणे आवश्यक आहे. उपलब्ध निधी आपल्या व्यवसायाच्या विकासासाठी गुंतवताना किती आर्थिक जोखीम घेऊ शकतो याचा अभ्यास असणे जरूरी आहे. आपल्या आर्थिक निर्णयांचा परिणाम तपशीलवार समजून घेण्यासाठी वेळोवेळी तज्ञांचा सल्ला घेणे फार गरजेचे असते.

एका यशस्वी व्यावसायिकाकडे कंपनीच्या अंतर्गत आर्थिक संसाधनांचे कार्यक्षमतेने व्यवस्थापन आणि वाटप करण्याची क्षमता आणि ज्ञान असणे आवश्यक आहे. असा अर्थशिक्षित व्यावसायिक शहाणपणाचे निर्णय घेऊन नफावृद्धी करतो आणि कंपनीच्या दीर्घकालीन आर्थिक स्थैर्याची काळजी घेतो. योग्य अंदाजपत्रक तयार करून त्याचे अनुसरण करण्याची क्षमता हा आर्थिक व्यवस्थापनाचा महत्त्वाचा पैलू आहे. हुशार उद्योजक असे वाजवी बजेट करतात, जे कंपनीच्या उद्दीष्टांशी सुसंगत आणि निर्धारित लक्ष्यांना अनुसरून असेल. यामुळे त्यांना जास्त खर्चाची क्षेत्रे शोधणे, त्यात आवश्यक त्या सुधारणा करणे आणि उपलब्ध निधीचा जास्तीतजास्त विनियोग करणे शक्य होते.

५] दृष्टी / दूरदृष्टी (Vision/Foresight) :-

उद्योजकाकडे आपल्याला कामाचे प्रयोजन, ध्येयनिश्चिती आणि त्यादिशेने कारभार याची दृष्टी असणे गरजेचे असते. अशी दृष्टी संस्थेची ओळख निश्चित करते. उद्योगामधला सकारात्मक दृष्टिकोन प्रत्येक सहभागी घटकाला प्रोत्साहित करतो. योग्य दृष्टी उद्योगाला प्रगती करण्यास आणि मूळ ध्येयांशी वचनबद्ध ठेवण्यास मदत करते. दूरदृष्टी हा चांगल्या व्यावसायिकाचा महत्त्वाचा गुण असतो ज्यातून त्याची वर्तमानाच्या पलीकडे पाहण्याची नजर आणि दीर्घकालीन योजना ठेवण्याची क्षमता दिसते. एक दूरदर्शी व्यावसायिक भागधारक, कर्मचारी आणि ग्राहकांसह त्याची दृष्टी सामायिक करू शकतो. योग्य धोरण-योजना, संसाधनांचे रास्त वाटप आणि अचूक निर्णयप्रक्रिया यांचा उपयोग करतो. तसेच सर्वांना एका समान उद्दिष्टासाठी एकत्र आणून ते साध्य करण्यासाठी त्यांना प्रेरित करतो.

६]  निर्णयक्षमता (Decision Making ability) :-

उद्योजकांना अनेकदा त्वरीत निर्णय घेऊन कृती करावी लागते. निर्णयक्षमता सुधारण्यासाठी परिस्थितीवर उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया देणे टाळावे. समस्येचे सर्व पैलू समजून घेऊन त्यातील बारकावे जाणून मगच कृती करणे श्रेयस्कर. आपल्या निर्णयाच्या परिणामाचे पूर्वमूल्यांकन करणे आणि कोणत्याही स्थितीत घाई न करणे आवश्यक. चांगली निर्णयक्षमता असलेला व्यावसायिक वर्तमान वस्तुस्थितीचे मूल्यांकन करतो, पर्यायांचे मापन करतो, संभाव्य परिणाम विचारात घेतो आणि उद्दीष्टांची पूर्तता करण्यासाठी आणि अडथळ्यांवर मात करण्यासाठी योग्य कृती करतो. शहाणपणाचे निर्णय घेण्यासाठी एक सक्षम व्यावसायिक अचूक आणि विश्वासार्ह डेटा, बाजार संशोधन, आर्थिक अहवाल आणि माहितीचे इतर समर्पक स्त्रोत यांचा आधार घेतो.

७] सचोटी / प्रामाणिकपणा (Integrity/Honesty)  :-

व्यवसायाच्या जगात प्रामाणिक शब्दांना व कृतीला फार महत्त्व असते. प्रामाणिकपणा आणि सचोटी हे उद्योजकाचे महत्त्वाचे गुण आहेत, ज्या गुणवैशिष्ट्यांमुळे अनेक फायदे होऊ शकतात, उदाहरणार्थ – कर्मचारी आपल्या नेत्याचा आदर करतात, ग्राहकांना खात्री वाटते की ही व्यक्ती आपल्या आश्वासनांची पूर्तता करेल, लोक भावी प्रकाल्पांसाठी पैसे उधार देऊ शकतात, कठीण काळात समाजातील सर्व घटक अश्या व्यक्तीला साथ देतात. सचोटी असलेला उद्योजक पारदर्शकपणे व मोकळेपणाने व्यवसाय करतो. नैतिक व्यावसायिक खोटे बोलणे किंवा दिशाभूल करणारी कृत्ये टाळतात. ते ग्राहक, कामगार आणि भागधारकांना अचूक आणि विश्वासार्ह माहिती देतात. ज्यामुळे त्यांची समाजातील पत वाढून त्यांच्या व्यवसायाच्या भरभराटीस मदत होते.

८] ग्राहकांचे समधान (Customer Satisfaction) :-

ग्राहकांच्या गरजा, आवडीनिवडी आणि समाधानाला प्राधान्य देण्याची वृत्ती हे चांगल्या उद्योजकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. ग्राहकांना प्राधान्य देणारा उद्योजक, त्यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचे फायदे ओळखून असतो. तसेच त्यांना कामाचे पूर्ण मूल्य प्रदान करण्याची आणि त्यांची अपेक्षापूर्ती करण्याची आवश्यकता जाणून असतो. ग्राहकांच्या गरजा आणि त्यांच्या समस्या व अपेक्षा याबद्दल अधिक जाणण्यासाठी, एक हुशार व्यावसायिक बाजार संशोधन आणि ग्राहक सर्वेक्षण यांना वेळ देतो.

९] वेळेचे नियोजन (Time Management) :–

यशस्वी व्यावसायिकांकडे उत्पादन/सेवेच्या सर्वोत्तमीकरणासाठी, समयसीमा पूर्ण करण्यासाठी आणि ईप्सित साध्य करण्यासाठी, वेळेचे चांगले व्यवस्थापन करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. उत्पादकता आणि एकूणच व्यवसायातील यश वाढविण्यासाठी, उद्योजकाला वेळापत्रकाचे प्रभावीपणे नियोजन करणे आणि वेळेचा जास्तीत जास्त सदुपयोग करणे जमवता आले पाहिजे. निश्चित उद्दिष्टे आणि त्यांची काटेकोर अंमलबजावणी हा वेळ व्यवस्थापनाचा मुख्य भाग आहे. एक कुशल व्यावसायिक, मुख्य उद्दीष्टे प्रथम नीट जाणतो आणि नंतर त्यांना व्यवस्थापित करण्यायोग्य कार्यांमध्ये विभागतो. असे उद्योजक व्यावसायिकदृष्ट्या बिनमहत्वाच्या कामांवर वेळ घालवत नाहीत आणि उद्दिष्टे व कामांचा योग्य प्राधान्यक्रम ठरवून त्यावर लक्ष केंद्रित करतात.

१०]  मेहनत (Hard Work:

एक चांगला उद्योजक अतिशय कार्यक्षम आणि मेहनती असावा लागतो. आळशी आणि अकार्यक्षम व्यावसायिक बाजारात स्पर्धा करू शकत नाही. उद्योजक असणे हे आव्हानात्मक असते ह्यात शंकाच नाही, परंतु धंद्यातली आव्हाने स्वीकारून परिस्थिती बदलून दाखवण्याची मजाही वेगळीच असते. उद्योजकाला त्याच्या मनाप्रमाणे वागण्याचे थोडेफार स्वातंत्र्य असते असे म्हणता येईल, परंतु भरपूर कष्ट करून त्याला ह्या स्वातंत्र्याची किंमत चुकवावी लागते. स्वतःच्या बुद्धी व कष्टाचे फळ मिळाल्याचे पाहताना, अनुभवताना मिळणारा आनंद वेगळाच असतो. ठराविक ८ किंवा ९ तासांचेच काम करण्याच्या मनोवृत्तीचे लोक उद्योजक बनू शकत नाहीत.

याशिवाय, गुणवत्तेचा ध्यास, आशावादी विचारसरणी, संकुचितपणाचा त्याग, नवनवीन संकल्पनांचा स्वीकार, जागतिक भान, सरकारी नियमांची माहिती, तंत्रज्ञानस्नेहीत्व, लवचिकता, संवादकौशल्य, विपणन कौशल्य, निडरपणा यांसारखे गुण उद्योजकाला खूप यशस्वी होण्यास मदत करतात.

– गुरुप्रसाद दि पणदूरकर (मुंबई)

3 thoughts on “उद्योजक होण्यासाठी महत्त्वाचे १० गुण”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top