Unsung Heroes of Maharashtra -2024

WhatsApp Group Join Now

 “हरवले आभाळ ज्यांचे

हो तयांचा सोबती

      सापडेना वाट ज्यांना

      हो तयांचा सारथी”

गुरु ठाकूर यांच्या सुरेख ओळीआपल्याला माहीती आहेत. पण आपल्या आजूबाजूला अशी असंख्य माणसं आहेत ती या ओळींचा अर्थ शब्दशः जगत आहेत.चला आज अशा व्यक्तींची थोडक्यात ओळख करुन घेऊया

Unsung Heroes of Maharashtra -2024

१) स्वागत थोरात

दुसऱ्या व्यक्तीचं दु:ख पाहून आपण हळहळतो ,कधी थोडीफार पैशाची मदत करतो आणि विसरून जातो.कधी आपण दुसऱ्यांचं दु:ख अनुभवण्याचा प्रयत्न केला आहे का ? आपण दुसऱ्यांचं दु:ख अनुभवण्याचा विचार ही करणार नाही. स्वागत थोरात या अवलिया ने असा विचार केला. त्यातून ते दु:ख ,अडचणी अनुभवल्या. हा अनुभव इतका तीव्र होता की या अडचणी दूर करण्यासाठी स्वागतनी आपलं आयुष्य झोकून दिलं.नेमकं काय घटना घडली ? स्वागतच आयुष्य कसं बदललं? हे सविस्तर जाणून घेऊया.

उत्तम पक्षी निरीक्षक, उत्तम चित्रकार, आस्वादक, दिग्दर्शक असणा-या स्वागत थोरात यांना बालचित्रवाणीच्या एका कार्यक्रमात संधी मिळाली. अंध मुलांच्या शिक्षणपद्धतीवर एक माहितीपट तयार होत होता ,त्याची संहिता तयार करण्याचं काम स्वागत यांच्याकडे आलं. कामाच्या संदर्भात अंध विद्यार्थ्यांना भेटून आल्यावर संहिता लिहिण्यासाठी स्वागतने त्यांचं जीवन स्वतः अनुभवायचं ठरवलं.घरात स्वतःच्या डोळ्यांवर पट्टी बांधून वावरायला सुरुवात केली. अंधांच्या रोजच्या आयुष्यात किती आव्हानं आहेत याची कल्पना तिथंच आली.यथावकाश “काळोखातील चांदणं” ही संहिता तयार झाली. स्वागत थोराताचं जीवन मात्र आमूलाग्र बदलून गेलं.अंध मुलांशी स्वागतचा एक वेगळाच बंध निर्माण झाला. अंध व्यक्तींच्या कलागुणांना वाव देणारा एक अफाट मेहनतीचा प्रवास सुरू झाला.शांता शेळके यांनी हेलन केलरवर लिहिलेल्या चरीत्राच्या अभिवाचनापासून सुरुवात होऊन एक विश्वविक्रमी घटनेपर्यत झंझावात येऊन पोचलं.पुण्यातल्या पहिल्या खुल्या महापौर एकांकिका स्पर्धेत ८८ अंध कलाकारांना घेऊन “स्वातंत्र्याची यशोगाथा” निर्माण झाली.पुण्यातल्या अंध मुलांची शाळा ,आणि अंध मुलींची शाळा वेगवेगळ्या ठिकाणी होत्या. ज्यांना दृष्टी नाही त्यांना अभिनय शिकवायचा होता. पण आव्हानांना छातीवर पेलत अनंत अडचणींवर मात करत  “स्वातंत्र्याची यशोगाथा” साकारलं.

स्पर्धेत तर या एकांकिकेने बाजी मारलीच, पण  “गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड” मध्ये नोंद झालेलं हे पहिलं मराठी नाटक ठरलं. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डनेही याची नोंद घेतली.ही तर केवळ सुरुवात होती.यानंतर पुलंच्या “तीन पैशाचा तमाशा” हे नाटक अंध कलाकारांना घेऊन सादर केलं.त्यानंतर बहुचर्चित “अपुर्व मेघदूत”  हे अंध कलाकारांचं नाटक रंगभूमीवर आलं.या नाटकांमध्ये काम करणाऱ्या  प्रत्येक कलाकारांचा स्वतःचा एक संघर्ष आहे.तो वाचताना ,ऐकताना आपण नि:शब्द होऊन जातो.अंध कलाकारांना घेऊन काम करताना एक गोष्ट स्वागतच्या लक्षात आली ती म्हणजे या व्यक्तींकडे प्रखर ज्ञानलालसा आहे. पण त्यासाठी पुरेसे पर्याय नाहीत.मग १९९८ ला जन्म झाला “स्पर्श गंध” या ब्रेल लिपितल्या पहिल्या दिवाळी अंकांचा.१५ फेब्रुवारी २००८ ला  ‘स्पर्शज्ञान’ हे मराठीतलं आणि भारतातलं पहिलं नोदणीकृत ब्रेल पाक्षिक सुरु झाले. या कामाची म्हणावी तशी दखल सरकार दरबारी घेतली गेली नाही. तरीही अथकपणे स्वागत यांचं काम सुरूच आहे.नीता अंबानी यांच्यापर्यंत हे काम पोचल्यानंतर त्यांनी या कामात खूप रस दाखवला.रिलायन्सच्या सहकार्याने “दृष्टी” हे ब्रेल लिपीतलं पहिलं पाक्षिक भारतात हिंदी भाषेतून सुरू झालं.ब्रेल प्रिंटिंग मशीनसाठी वेगळा अभ्यास आणि खर्च ही भरपूर आला.पण हार न मानता हे काम सातत्याने घडत राहिलं. स्वागत थोरात यांच आणखी एक महत्वपूर्ण कार्य मोबिलिटी वर्कशॉप्सच्या माध्यमातून अंध व्यक्तींना स्वयंपुर्ण करणं.स्वयंपाक, अभ्यास, रस्त्यावर एकट्याने चालणे ,पांढ-या काठीचा वापर अशा अनेक गोष्टी यात शिकवल्या जातात.आयुष्यात पसरलेल्या अंधारात ज्ञानाचा एक कवडसा किती अमूल्य असतो हे तुम्हा आम्हांला जाणवणं अशक्य आहे.पण ज्यांच्या आयुष्यात हे ज्ञान ब्रेल लिपिचा हात धरून आलं,त्यांचा आनंद शब्दांत मांडणं अशक्य आहे.कुणी दखल घेवो अथवा न घेवो ,तन, मन आणि खूप सारं धन वेचून स्वागत थोरात आजही आशेचे असंख्य दीप प्रज्वलित करत आहेत.

२)संजय हळदीकर

नुकतीच आपण हादरवून टाकणारी शालेय घटना ऐकली,वाचली.ही लहान मुलं अशी कशी वागू शकतात?असा प्रश्न तर पडतोच.आजच्या शाळेतल्या मुलांना वेळ द्यायला पालकही कमी पडतात का असा प्रश्न पडतो.मुलांमध्ये असणा-या उर्जेला योग्य मार्ग दाखवला जात नाही. मुलांनी कोणत्या पद्धतीने व्यक्त व्हायचं आहे याकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे.मुलांच्यात असणाऱ्या अफाट ऊर्जेला बालनाट्याच्या माध्यमातून एक चांगला आकार देता येऊ शकतो का?या प्रश्नाचे उत्तर “हो” असंच आहे. कारण गेले 25 /30 वर्ष कोल्हापूरातील रंगकर्मी संजय हळदीकर वेगवेगळ्या आर्थिक, सामाजिक स्तरातील मुलांना बालनाट्याच्या माध्यमातून  व्यक्त व्हायला शिकवत आहेत.मुलांच्या अंगात असणाऱ्या कलागुणांना त्यांच्यातल्या खदखदणा-या गोष्टींना नीट व्यक्त करण्यासाठी माध्यम पुरवणारा, वाव देणारा एक कलाकार माणूस म्हणजे कोल्हापूरचे बालरंग भूमीचे खांदे कार्यकर्ते  संजय हळदीकर.हळदीकर सरांचं बालपण सोळांकुर या राधानगरी तालुक्यातल्या संपन्न गावात आपल्या आजोळी बहरलं. मामा सोंगी भजनात असल्यामुळे ते पाहून, ऐकून आपणही सोंग काढावीत अशी इच्छा हळदीकर सरांच्या मनात जागी झाली. ही सोंग वठवण्याची उत्तम जागा कोणती? तर नाटक ! आणि लवकरच हळदीकर सरांनी नाटकाकडे आपला मोर्चा वळवला. कॉलेज जीवनात अश्रूंची झाली फुले, प्रेमा तुझा रंग कसा?, लग्नाची वेडी अशा नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केला. लवकरच “अभिरुची” या संस्थेची त्यांनी कोल्हापूरात  स्थापना केली. या संस्थेद्वारे अनेक एकांकिका सादर केल्या. नाटकाचा हा जो प्रवास सुरू झाला तो थांबलाच नाही. त्यात नाटकात अभिनय करणं, बॅकस्टेजला काम करणं आणि दिग्दर्शन अशा तीनही प्रवाहामध्ये हळदीकर सरांचं काम उत्तम पद्धतीने सुरू होतं. पण काहीतरी वेगळं करायला हवं हा विचार मनात होता. मग ब्रेख्तच्या कवितांचचा नाट्यविष्कार मंटोच्या कथांचा नाट्यविष्कार ,राजन गवस यांच्या कथांचा नाट्यविष्कार, आणि मुन्शी प्रेमचंद्र यांच्या कथेवरती नाट्यविष्कार असे वेगवेगळे प्रयोग सुरू झाले .

दरम्यान “सांस्कृतिक दुष्काळाची डायरी”  हेही एक वेगळे सादरीकरण झालं होतं. विनोदी नाटकात काम करून झालं होतं. आपल्याकडे जे जे आहे ते दुसऱ्यांना द्यावं त्यांनाही शहाणं करून सोडावं या विचारांनी बालनाट्य प्रशिक्षण शिबिराला त्यांनी सुरुवात केली. ही बालनाट्य फक्त पैशासाठी नव्हती आणि फक्त सुशिक्षित, सुस्थितीत वर्गासाठी ही नव्हती. ही शिबिरं आश्रम शाळा ,अनाथालय, होती. ही बालनाट्य शिबिरं  घेत असतानाच हळदीकर सरांमधला संवेदनशील माणूसही जागाच होता. शिबिराचा एक भाग म्हणून मुलांना कविता लिहायला सांगितलं जायचं किंवा एखादं चित्र रेखाटला सांगितलं जायचं .”खिडकी” असा विषय दिल्यानंतर वेगवेगळ्या वातावरणातल्या वेगवेगळ्या मुलांच्या चार-पाचशे चित्रांसह कविता जमा झाल्या.त्यांचं  “कवडसे” नावाचं अनोखं प्रदर्शन महाराष्ट्रातल्या मोजक्या शहरांमध्ये हळदीकर सरांनी आयोजित केलं. काही वेळेला त्याला प्रायोजक मिळाले ,तर काही वेळेला स्वतःच्या खिशातून तून पैसे खर्च करून त्यांनी ही प्रदर्शन मांडली. या प्रदर्शनाला वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मोठ्या व्यक्तीने आवर्जून भेट दिली, त्यावरती आवर्जून आपल्या प्रतिक्रिया ही दिल्या. काश्मीर मधल्या एका शिबिरात “दिलं की  आवाज” असा विषय मुलांना दिल्यानंतर एका मुलांने खिडकीत बसून दिसणारी  शाळा आणि त्या शाळेच्या दारावर  दिसणारं मोठं कुलूप याचं चित्र काढलं होतं. तर कामाठीपुरातल्या एका मुलीने “खिडकी” या विषयावरती खिडकी बाहेर दिसणारी गिधाड आपल्या चित्रात  मांडली होती.हे सारं पाहून कोणताही संवेदनशील माणूस  अस्वस्थ होईल. हळदीकर सरही अस्वस्थ होत होते. मात्र या बालनाट्य शिबिराच्या माध्यमातून मुलांना व्यक्त व्हायला, मोकळं व्हायला एक उत्तम साधन मिळत आहे हे ही त्यांच्या लवकरच लक्षात आलं.मुलांच्यातली ही अस्वस्थता बाहेर पडण्यासाठी  चित्रकला, कविता आणि नाटक हे माध्यम योग्य आहे हे त्यांच्या हळूहळू लक्षात येत होतं‌. सेवाग्राम मध्ये त्यांनी “नई तालीम” या गांधीजींच्या शिक्षण पद्धती आधारित विषयाची अभिव्यक्ती करायला सांगितले होतं.

 यात कथा यात कविता आणि चित्रही होती याचंही अनोखा प्रदर्शन मोजक्या शहरांमध्ये गाजलं. “आम्ही असू लाडके” या चित्रपटाचं कला दिग्दर्शन  हळदीकर सरांनी केलं. हैदराबाद मध्ये एका शिबिरात  30 मुलींपैकी 20/ 22  मुली या अमेरिकेत जन्मलेल्या आणि फक्त इंग्रजी समजणा-या आशा होत्या .पण यांनी सुद्धा नाट्य शिबिरामध्ये आनंदाने सहभाग नोंदवला. इंग्रजी,हिंदी, मराठी अशा तीनही भाषांमध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये ,जम्मू काश्मीर कलकत्ता श्रीनगर अशा ठिकाणी 2500 पेक्षा जास्त बालनाट्य शिबिरं हळदीकर सरांनी घेतलेली आहेत. गेले 25 ते 30 वर्ष बालरंग भूमी वरती ते नेटानं कार्यरत आहेत.या शिबिरांमधून हळदीकर सरांच्या लक्षात एक गोष्ट येते आहे ती म्हणजे कुठल्याही स्तरातल्या विद्यार्थ्याला “शालेय रंगभूमी” हवी आहे ती निर्माण व्हावी ती प्रत्येकापर्यंत पोहोचावी यासाठी हळदीकर सरांचे प्रयत्न सुरूच आहेत.

३)विनायक गद्रे विनया गद्रे

मुलभूत शिक्षणाचा हक्क सर्वांना आहे.पण प्रत्येकाला तो हक्क मिळतो का?अगदी छोट्या छोट्या कारणांनी कित्येक मुलांचा शिक्षणाचा हक्क नाकारला जातो.या मुलांना व्यावहारिक जगातले चटके कसे चुकवता येतील ?अशा मुलांना एकत्र करुन त्यांच्यावर शिक्षणाची सावली धरण्याचं काम करणारं दांपत्य म्हणजे इचलकरंजीचे विनायक गद्रे आणि विनया गद्रे.              आपल्या  शेताच्या आसपास राहणाऱ्या कुटुंबातील मुलं शाळेत जात नाहीत हे पाहून गद्रे काकुंना काकांनी बालवाडी शिक्षिका कोर्स करायला लावला आणि काका काकूंच्या समाजजीवनाचा श्रीगणेशा झाला. प्रत्येकाला शिक्षण मिळण्यासाठी जे काही करता येईल ते ते त्या दोघांनी आयुष्यभर केलं. ज्ञानप्रबोधिनीच्या सानिध्यात आल्यावर साखरशाळा , अगदीच शाळेत न जाणाऱ्या मुलींसाठी शिवणकाम अशा कितीतरी गोष्टी काका काकूंनी राबवल्या.  फक्त पुस्तकी शिक्षण नाही तर जगणं समृद्ध करणारं व्यावसायिक, कौशल्य विकास करणारं शिक्षण यावर काकांचा भर राहीला. शालेय ज्ञानाबरोबरच आकाशनिरिक्षण, पक्षी निरीक्षण, वाचनाची आवड अशा कितीतरी गोष्टींचा आनंद प्रत्येकानं घ्यावा यासाठी त्यांची धडपड आहे. सर्व वयोगटातल्या सर्वांनाच निरनिराळे अनुभव अनुभवता यावेत हीच त्यांची मोठी प्रेरणा. कोकणातल्या मूळ गावी आंब्यातल्या मुलांसाठी विविध अनुभवांची रास त्यांनी रचली. हे करत असताना प्रचलित शिक्षणपद्धतीचा अट्टाहास न धरता हसतखेळत आनंददायी शिक्षणासाठी प्रयोग केले,नव्या वाटा शोधून काढल्या. 

कौशल्य विकास आणि आणि अँक्टिव्हिटी बेस लर्निग आज महत्वाचं वाटतं पण काकांनी कधीपासून याचा पुरस्कार आणि प्रसार केला आहे. काका काकूंचे विद्यार्थी आज मोठमोठी पदं भूषवित आहेत, नव्या नव्या अनुभवांना भिडत आहेत.एव्हढा प्रचंड प्रवास काका काकूंनी निस्वार्थीपणे केला यांचं खरंच कौतुक आहे. *ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते* या उक्तीवर त्यांचा ठाम विश्वास. वैज्ञानिक दृष्टिकोन जपत विज्ञानाचा प्रसार करायचा तो ही पर्यावरण पूरक पद्धतीने हे काम फार अवघड आहे. पण गद्रे काका काकूंनी हे काम इतका सहजतेने केलंय की त्याची व्याप्ती जाणून घ्यायला आपण कमी पडतो.प्रचंड ऊर्जेने भारलेलं हे दांपत्य, कधी  थकतच नाही. कधी पिशव्यांचे निरनिराळे आकार कधी क्लिल्टचे प्रयोग,कधी आंबा या मूळ गावी होणारे सेंद्रिय प्रयोग,त्यामधला त्यांचा सहभाग याविषयी किंती सांगावं? दरवेळी त्यांना भेटल्यावर नवं काहीतरी शिकायला मिळतंच! 

            जिथे कमी तिथे आम्ही, असं म्हणत उभं राहणे, काळाबरोबर आपले विचार अपडेट करणं , दुसऱ्यांच मनापासून कौतुक करणं, योग्य व्यक्तीला योग्य मदत मिळवून देणे, प्रसिध्दीचा सोस नसणे, स्पष्टवक्तेपणा असला तरी तो बोचरा नसणे आणि विनम्रता हे आजकाल हरवलेले दुर्मिळ गुण गद्रे काका काकूंच्या ठायी आजही खणखणीतपणे पहायला मिळतात.

अशा या जगावेगळ्या परोपकारी दांपत्याला मनापासून सलाम!

४)विनायक माळी सार्शा माळी 

कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातल्या अब्दुल लाट या गावात आणखी एक जोडपं कार्यरत आहे.”चीपर बाय द डझन” या पुस्तकात मोटारीतून एक डझन एकाच कुटुंबातली मुलांची सवारी बघून आश्चर्य चकित होणारी माणसं वाचली होती.पण तुम्ही कधी २०० मुलं असलेले पालक पाहिले आहेत?विनायक आणि सार्शाकडे पहा !कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील 200 मुलांचे ज्ञानदीप प्रकल्पाद्वारे शैक्षणिक दत्तक पालकत्व या दोघांनी खुशीने स्वीकारलं आहे ते उत्तम पद्धतीने निभावत ही आहेत.खरं तर या मुलांचे पालक होऊन विनायक सार्शा इतके खूश होते की स्वतःचं मूल होऊ द्यायचं नाही हा निर्णय घेऊन मोकळे झाले होते.मात्र काही वैद्यकीय कारणांमुळे स्वतःच्या  मूलाला जन्म द्यावा  लागला.तरीही या २०० आणि इतर ही शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांवरील त्यांचं अपत्य प्रेम यत्किंचितही कमी झालेलं नाही.

साखरशाळा या ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या  शिक्षणासाठी राबवण्यात येणारा उपक्रम ही दोघं जीवतोड मेहनत करून फुलवतात.त्यासाठी सेवांकुर केंद्रच त्यांनी सुरू केलं आहे.सतत विस्थापित होणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विनायक माळी यांनी जितकी मेहनत घेतली तितकीच मेहनत ऊसतोड मजूरांना काही मुलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी घेतली.यासाठी फक्त निवेदन देऊन न थांबता त्यांनी पाठपुरावा केला आणि या मुलभूत गोष्टी अब्दुल लाट परिसरात तरी उपलब्ध करुन दिल्या.विद्यालय मुक्तांगण परिवार या सामाजिक संस्थेच्या निर्मीतीमध्ये त्यांचा सहभाग आहे.मनात आलं आता  मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करुया ,अशी पद्धत न अवलंबता यासाठी शिक्षण शास्र पदविका अभ्यासक्रम विनायक यांनी पुरा केला आहे.हस्त कला अभ्यास क्रमाचं विशेष प्रशिक्षण घेतलं आहे.ज्ञान प्रबोधिनीत विद्यार्थी कार्यकर्ता म्हणून कामाचा चिक्कार अनुभव घेतला.आसाम, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड या प्रदेशातील विद्यार्थ्यांबरोबर विज्ञान प्रचार आणि  प्रसार काम केलं.हिमाचल प्रदेश, बिहार, राजस्थान चंदिगड या ठिकाणी सामाजिक संस्थांच्या विशेष प्रशिक्षणामध्ये सहभाग नोंदवला.

त्यासाठी सभिनय गाणी,छोटे कलाम विज्ञान केंद्र अंतर्गत मुलांच्या जिज्ञासेला उत्तर देण्याचा प्रयत्न,फिरते विज्ञान केंद्र अशा नावीन्यपूर्ण संकल्पना विनायक आणि सार्शा राबवतात.या सगळ्या व्यावहारिक ज्ञानाचं ते मुक्त हस्ताने दान ही करतात.अगदी शिक्षकांना ही प्रशिक्षण देतात.शालेय विद्यार्थ्यांना सोबत घेऊन पंचवीस हजार लोकांपर्यंत वेगवेगळया  सामाजिक विषयातील पथनाट्य सादर केलेली आहेत.समाजासाठी कार्य करत असताना  केरळ महापूर मदत कार्यामध्ये सहभागी झाले.त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील  महापूरात श्रमदान आणि लोकांना जीवनावश्यक साहित्य देऊन त्यांना मदत करण्यात ही ते मागे हटले नाहीत.तरुणपणातली गुलाबी स्वप्न बाजूला ठेवून विनायक आणि सार्शा यांनी विधायक कार्य आनंदाने हाती घेतलं आहे.वाट दाखवणारी ही पेटती मशाल इतरांच्या आयुष्यात उजेड पाडेल यात शंका नाही.

या चौघांच्या कार्याला शुभेच्छा आणि त्यांना मानाचा मुजरा !

तुम्हाला हा लेख कसा वाटला असेच नवनवीन विषय वाचण्यासाठी आमच्या watsapp ग्रुपला जॉईन व्हा.

2 thoughts on “Unsung Heroes of Maharashtra -2024”

  1. प्रमोद दिगंबर कुलकर्णी

    अतिशय सुंदर लेख !!आपल्या सभोवार लपलेल्या अशा अमूल्य हिऱ्यांचा परिचय आपल्या या लेखामुळे झाला आणि एका सर्वसामान्य व्यक्तिकडून देखील हिमालया एवढं महान कार्य घडू शकतं हे पाहून अचंबित व्हायला झालं !! चांगल्या कार्याची अंत:प्रेरणा आणि विधायक समिजककार्याचा ध्यास हीच खरी देवपूजा होय !! आपल्या लेखातील श्री हळदीकर सरांच कार्य जवळून अनुभवण्याची भाग्य मला लाभलं आहे !!
    खूप खूप धन्यवाद !!

  2. डाॅ.सुनिता पवार नाकाडे

    चारही लेख खुप ऊत्साह वाढविणारे आणी समाजसेवा करायला प्रोत्साहन देणारे आहेत.स्वागत थोरात आणी संजय हळदीकर सरांना मी ओळखते.दोघांचही कार्य महान आहे.सर्वचजण आपापल्या परीने खुप कौतुकास्पद कामगीरी करत आहेत.सर्वांना त्यांच्या अप्रतिम कार्यासाठी लाख लाख शुभेच्छा!!!धन्यवाद.!!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top