कथेचे नाव – श्रद्धा अंधश्रद्धा
‘ भु भु भु s s s s s भुभु ‘ मिष्टी खिडकीत बसून जीव तोडून ओरडत होती. तिच्या ओरडण्याने मिताला आणि जाईला जाग आली; पण रात्रीचे दोन – अडीज वाजले असल्याने दोघींना उठावेसे देखील वाटत नव्हते. तसंही मिष्टीला मांजरे दिसली की ती भुंकत बसायची. मिष्टी भुंकण्याची थांबत नसल्याने शेवटी मिता उठली आणि हॉलमध्ये गेली. मिष्टी हॉलच्या खिडकीत बसून भुंकत होती. मिता तिच्या जवळ गेली. मिष्टी जिथे बघून भुंकत होती त्या दिशेला मिताने पाहिले असता कंपाउंडच्या भिंतीवर मांजरासारखे दिसले. तिने डोळे चोळून पाहिले तर ते मांजर नव्हते ते पांढऱ्या रंगाचे घुबड होते.
मिता आयुष्यात पहिल्यांदाच घुबड पाहत होती. रात्रीच्या वेळी ते सुद्धा पांढऱ्या रंगाचे घुबड समोर बघून तिला अत्यानंद झाला. मिताच्या मनात विचार आला की, ‘ आज जर उठले नसते तर इतका सुंदर निसर्गाचा आविष्कार पाहू शकले नसते. बरं झालं आपल्या मेंदूने ऑर्डर दिली उठायची.’ घुबडाला समोर पाहून मिता जवळपास किंचाळली, ” जाई ! आपल्या खिडकीसमोर घुबड बसलं आहे.” इतका वेळ मिष्टीच्या जोरजोरात भुंकण्याने त्या घुबडाला काहीच प्रॉब्लेम झाला नव्हता; पण मिताच्या ओरडण्याने ते घुबड उडून गेले. हे सारे एका क्षणात घडले की त्याचा फोटो देखील मिताला टिपता आला नाही. जाईचे बाबा मिष्टीच्या भुंकण्याने उठले नव्हते मात्र आता मिताच्या ओरडण्याने उठले. घरात एकट्या मिताने ते घुबड बघितले होते त्यामुळे जाई आणि तिच्या बाबांना ती त्या घुबडाचे वर्णन करून सांगू लागली.
मग सुरू झाल्या तिघांमध्ये गप्पा. किती सुंदर दिसत होतं ते घुबड आणि का त्या घुबडला पाहिले की अपशकुन होतो असे समजतात लोकं ? तो देखील एक सजीव आहे. निसर्गानेचं सगळ्यांना घडवलं तसंच त्यालाही घडवले तरी तो का म्हणून अपशकुनी ठरतो ?” मिताने विचारलं.
” मूर्खपणा आहे ग. बाकी काही नाही. लोकांच्या मनात नुसत्या अंधश्रद्धा असतात. जग कुठे चाललं आहे आणि आपण कुठे आहोत हा विचार सुद्धा त्यांच्या मनाला शिवत नाही.” जाईचे बाबा म्हणाले.
” हो ना खरंच ! अजूनही खूप अंधश्रद्धा आहेत समाजात. आता बघा ना, हल्लीच महाशिवरात्री होऊन गेली तेव्हा शंकराच्या पिंडीवर अभिषेक म्हणून भाविकांकडून लाखो लिटर दूध अर्पण केले गेले. देव मागतो का मला दूध द्या म्हणून नाही ना ? लाखो लिटर दूध जातं कुठे शेवटी तर गटारात. तेच दूध जर भुकेल्यांना दिलं तर त्याने देव कोपेल का ? उलट ते दूध गटारात जाण्यापेक्षा कोणाच्यातरी मुखी लागेल आणि त्या दुधामुळे मंदिराच्या परिसरात अस्वछता, दुर्गंधी पसरते ती वेगळीच. अशा वागणुकीने मंदिरात पावित्र्य राखलं जातं का ? कधी सुधारणार ही लोकं ते देवच जाणे.” मिताने कोपरापासून नमस्कार केला.
” हो ! बरोबर बोललीस. आता गणेशोत्सव साजरा करतात तेव्हा देखील हाच प्रकार पाहायला मिळतो. एकतर मोठ्या मोठया मुर्त्या घडवल्या जातात, त्यांची प्राणप्रतिष्ठा केली जाते, विसर्जनाच्या दिवशी तर ढोल, ताशे, फटाके यांनी ध्वनी आणि हवेचे प्रदूषण करतात ती तर गोष्ट वेगळीच; पण मूर्त्यांचे विसर्जन करताना देखील त्यांचं पावित्र्य जपलं जातं का ? कित्येक मुर्त्या भंगलेल्या अवस्थेत पाहायला मिळतात कारण त्या पर्यावरणपूरक नसतात. बरं ! देव सर्वत्र आहे असे समजले जाते ना ? मग कशासाठी देवाच्या दर्शनासाठी मंडपासमोर तासनतास लांबच लांब रांगा लावायच्या ? तिथे शारीरिक, शाब्दिक चकमकी होतात त्यातून नको ते प्रसंग घडतात. कुठली भक्ती म्हणायची ही ? कशासाठी हा सगळा आटापिटा करतात हे लोक तेच समजत नाही.” जाईचे बाबा म्हणाले.
” हो ! अगदी बरोबर आणि फटाक्यांमुळे मुकी जनावरे, पक्षी, लहान मुले, नवजात शिशु, आजारी तसेच वृद्ध माणसे यांना किती त्रास होतो हे तर आपल्या मिष्टीमुळे आपल्याला समजतेच. कोणाचं काहीच पडलेलं नसतं ह्या लोकांना. सण जरूर साजरे करा पण काहीतरी मर्यादा राखून करा ना. लोकांना त्रास होईल असे का वागावे ? रात्री अपरात्रीपर्यंत फटाके फोडत बसायचे ह्यात कसला आला शहाणपणा ? कशाला हवी ती चढाओढ ? कशाला हवा तो दिखावा ? पैशापाई पैशांचा चुराडा आणि मुख्य म्हणजे जनमानसात ठासून भरलेली अंधश्रद्धा. गोकुळाष्टमी साजरी करताना कशाला रचले पाहिजेत उंच उंच मानवी मनोरे ? त्यातून किती दुर्दैवी घटना घडतात. पाहिलंत ना आपल्या शेजारच्या बिल्डिंगमधला दुर्वेश जन्माचा पांगळा होऊन बसला आहे. आयुष्यभर आता त्याला परावलंबी जीवन जगायला लागेल. ह्यात कोणाचं नुकसान झालं तर केवळ त्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं. दरवर्षी ह्या गोष्टींना हौशी बालगोपाळांना सामोरे जावे लागते तरी केवळ चढाओढ आणि भरघोस बक्षिसांचा हव्यास हवा कशाला ?” मिता म्हणाली.
” आता नवीन नवीन भोंदू बाबा – बाबी उदयास आले आहेत. अशिक्षित लोकांचं तर सोडूनच द्या स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारी लोकं देखील त्यांच्यापाठी इतकी वेडी झाली आहेत की विचारण्याची सोय नाही. ते भोंदू भोळ्याभाबड्या लोकांना हातोहात फसवतात आणि स्वतःचे गलेलठ्ठ खिसे भरतात.” जाईचे बाबा म्हणाले.
इतका वेळ आईबाबांचे बोलणे ऐकत असलेली जाई म्हणाली, ” मी देखील माझ्या मैत्रिणींना सांगते की, आपल्याला पिरियड येतात म्हणजे त्यात विटाळ किंवा अपवित्र वगैरे नसते. ‘ पाळी ‘ ही स्त्रीला मिळालेली देणगी आहे. त्यामुळेच गर्भधारणा होते. त्यात देवाधर्माचा काहीएक संबंध नसतो. आपण जेव्हा गर्भात असतो तेव्हा त्या अशुद्ध रक्ताचे आवरण आपल्याभोवती असते म्हणजे आपण तर जन्मतःचं अपवित्र असतो असे म्हणायला हवे नाही का ? पण माझ्या काही मैत्रिणी अजूनही पाळी आली की देवळात जात नाहीत, कुठल्याही धार्मिक कार्यक्रमाला जात नाहीत. मी त्यांना खूप समजवायचा प्रयत्न करते पण त्या ऐकत नाहीत. वाईट इतकेच वाटते की एकविसाव्या शतकातील तरुणांनी तरी अशा अंधश्रद्धा पाळल्या नाही पाहिजेत.”
” हो ! एकदम छान विषय मांडलास. पूर्वीच्या काळी स्त्रिया घरात एखाद्या गुरासारखी कामे करत असत. पाळीच्या दिवशी त्यांना आराम मिळावा यासाठी देवाधर्माचे लेबल चिटकवले ते आजतागायत. आमच्यावेळी आधीच्या पिढीने आमच्यावर ह्या अंधश्रद्धेचा खूप पगडा ठेवला होता. आम्हाला जरी सायन्स मध्ये ह्या गोष्टी शिकवल्या जायच्या तरी तो विषय फक्त अभ्यासापूरता मर्यादित होता. पाळी आली की देवळात जायचे नाही, घरात कुठला उत्सव असेल तेव्हा पुढे पुढे करायचे नाही, एका कोपऱ्यात बसून राहायचे अशी बंधने लादली जायची. मुळात म्हणजे आईवडील आणि पाल्य एकमेकांशी मोकळेपणाने कुठल्याही चर्चा करत नसत. त्यामुळे जी प्रथा सुरू झाली ती पिढ्यानपिढ्या तीच अखंडपणे सुरू राहिली. माझ्यावर देखील तो पगडा होता; पण तूच मला योग्य ते पटवून दिल्यावर मी मान्य केलेच ना ? भले माझे बुरसटलेले विचार जाण्यास थोडा वेळ लागला असेल पण मी आता ह्या अंधश्रद्धा नाही पाळत. मला तुझे म्हणणे अगदी तंतोतंत पटले.” मिताने जाईकडे कृतज्ञतापूर्वक पाहिले.
” तीच गोष्ट ‘ मुलगा म्हणजे वंशाचा दिवा ‘ समजणारी लोकं अजूनही मुलगा हवा म्हणून गर्भातच मुलीचा गर्भ पाडून टाकतात. काही ठिकाणी जोपर्यंत मुलगा होत नाही तोपर्यंत मुली जन्माला येऊ घालतात. आताच्या महागाईच्या काळात कशाला हवी इतकी मुलं ? नाही त्यांना चांगला सकस आहार देऊ शकत नाही चांगलं शिक्षण; पण मुलगा म्हणजे म्हातारपणाची काठी समजणारे समाजात आढळतात. अजूनही काही ठिकाणी विधवा स्त्रियांना समाजात सन्मानाने वागवत नाहीत. त्यांना सणसमारंभात डावलले जाते. त्यांचे पती निर्वतले असले तरी त्यांना मन नसते का ? काही ठिकाणी अजूनही रुढीपरंपरेच्या नावाखाली लग्नामध्ये हुंडा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या घेतला जातो. कित्येक मुली आणि मुलींचे पालक त्यात भरडले जातात. हे सगळे कधी थांबणार माहीत नाही. लोकांची मानसिकता कधी बदलेल ठाऊक नाही.” जाई म्हणाली.
” हो ना ! पण आता तुम्ही तरुण पिढीने एकत्र येऊन हे अंधश्रद्धेचे, जाचक रुढीपरंपरेचे सावट दूर सारले पाहिजे. तुम्ही समाजाला श्रद्धा – अंधश्रद्धेमधील फरक दाखवला पाहिजे. देवाला आपण निश्चितच मानतो. देव ही नक्कीच एक चांगली शक्ती आहे; पण त्या श्रद्धेला अंधश्रद्धेची झालर नसावी. रूढी – परंपरा नक्कीच पाळाव्या पण त्याचे अवास्तव स्तोम माजवू नये. कोणाच्याही त्यात भावना दुखावल्या जाता कामा नये. त्यामुळे कुठलाही नवीन पायंडा पाडायचा असेल तर त्याची सुरुवात स्वतःपासून करावी लागते. खूप मोठा काळ जाईल अंधश्रद्धा तसेच जाचक रुढीपरंपरा नष्ट व्हायला पण आपले प्रयत्न चालू ठेवायचे.” जाईचे बाबा म्हणाले.
” हो बाबा. मी ‘ लोका सांगे ब्रम्हज्ञान ‘ असे नाही वागत. मी स्वतः जशी वागते तसेच दुसऱ्यांना माझ्यापरीने खूप चांगलं चांगलं सांगत असते. लोकांची ऐकून घेण्याची वृत्ती तर हवी ना ? बघू मी प्रयत्न तर करतच असते.” जाई म्हणाली.
” चला आता थोड्या वेळाने पहाट होईल. ह्या विषयांवर बोलताना आपल्या गप्पा काही संपणार नाहीत. त्या घुबडाचा विषय राहिला बाजूला. ते तर बिचारं कधीच गेलं उडून आणि आपण किती विषयांवर चर्चा केली ते बघा. चला झोपुया. नशीब उद्या रविवार असल्याने आपल्याला सुट्टी आहे सगळ्यांना.” जाईचे बाबा म्हणाले.
” हो हो ! झोपुया बाबा.” असे म्हणून तिघेही निद्रेच्या स्वाधीन झाले.
( समाप्त )
लेखिकेचे नाव – सौ. नेहा उजाळे
तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा. कथा ह्या एकमेव माध्यमातून मी काही सामाजिक, वैचारिक मते मांडत असते. जर कथा आवडली तर आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhsApp ग्रुपही जॉईन करा.
धन्यवाद !
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
चांगला विषय.. जन जागृती साठी 👍👍✅
मनःपूर्वक आभार 😊🙏
नेहमी प्रमाणे उद्बोधक कथा. खंत एकच वाटते, अनेक लोक बोलतात, पण स्वतः वर वेळ आली की कचरतात. ट्रेन मधे एक बाजू ब्लॉक करणा-या किंवा उतरण.यासाठी दाराजवळ जाणा-यांसारखं… दुस-याला बोलताना एक न्याय आणि स्वतः करताना वेगळा न्याय. हे आचरणात येण्यासाठी अजून बरीच वर्ष जातील.
आजही ११वी च्या प्रवेशप्रक्बरियेसाठी बसल्यावर ५-६ केसेस तरी चौथं/ पांचवें अपत्याच्या असतात, विशिष्ट समाजात तर नक्कीच परंतु अलिकडच्या शिक्षित घरांमध्येही.
खरं आहे अदिती, लोकांची मानसिकता बदलायला बराच काळ लोटेल. प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार 😊🙏
चांगली झाली आहे कथा, उद्बोधक
मनःपूर्वक आभार 😊🙏
छान कथा. सामाजिक प्रबोधनपर.
मनःपूर्वक आभार 😊🙏
खूप छान विषय मांडला आहात. श्रद्धा आणि अंधश्रद्धेतील पुसटशी रेषा ओळखता यायला पाहिजे.
मनःपूर्वक आभार 😊🙏
Nice story…
मनःपूर्वक आभार 😊🙏
खूप छान 👌
मनःपूर्वक आभार 😊🙏