भारतीय जेवणामधील भाताचे विविध प्रकार
भारतात अनेक राज्यांमध्ये तांदूळ हे मुख्य पीक आहे त्यामुळे तेथील मुख्य अन्न भात हेच आहे. मुख्यतः दक्षिण भारतातील चारही राज्य तसेच ओरिसा, बंगाल अशा अनेक प्रांतामध्ये लोकांच्या जेवणामध्ये भाताचा समावेश असतो. भाताचे विविध प्रकार करून त्यांचा समावेश मुख्य जेवणामध्ये केला जातो. त्या त्या राज्यात बाकीच्या पदार्थांच्या उपलब्धतेनुसार हे भाताचे प्रकार तयार केले जातात. पण हे सगळेच प्रकार अतिशय चविष्ट आहेत.
वरण-भात, दही-भात, कढी -भात, राजमा-भात अशा जोड्या तर प्रसिद्ध आहेत. याबरोबर चवीला लोणचं, पापड घेतलं तर अगदी पूर्णान्न तयार होतं.
भारतीय जेवणामधील भाताचे विविध प्रकार variety of rice in indian cuisine या लेखामध्ये आपण भाताच्या विविध प्रकारांची माहिती करून घेऊया.
साहित्य आपण अंदाजाने तो पदार्थ किती लोकांसाठी करतो आहे तेवढे घ्यावे.
१) कैरी भात–
साहित्य—साधारण दोन वाटी तांदूळ, एक साल काढून किसलेली कैरी, हळद, शेंगदाणे, फोडणीकरता तेल, मोहरी, हिंग, मीठ, जिरे, तीन ते चार लाल मिरच्या, कढीपत्ता, चवीपुरती साखर कृती –या भाताच्या प्रकारामध्ये आपण जो तांदूळ भात खाण्यासाठी वापरतो तो साधारणतः एक ते दोन वाटी शिजवून घ्यावा. भात मोकळा शिजवून घ्यावा. साधारण एक आंबट कैरी साल काढून किसून घ्यावी. शिजलेला भात थंड झाला की त्याला कैरीमध्ये मिसळून घ्यावे. फोडणी करता दोन ते तीन चमचे तेल गरम करून झाले की त्यामध्ये मोहरी जिरे आणि हिंग घालावा. लाल मिरची व कढीपत्ता घालावा व साधारण अर्धा वाटी शेंगदाणे घालावे. शेंगदाणे खरपूस होईपर्यंत फोडणी होऊ द्यावी नंतर गॅस बंद करावा. ही फोडणी त्या कैरी मिसळलेल्या भातामध्ये घालून त्याला व्यवस्थित कालवून घ्यावे. चवीपुरते मीठ आणि थोडी साखर घालावी. चविष्ट असा कैरी भात तयार होतो. वरून कोथिंबीर घालावी.
२) मसाले भात–
साहित्य—-एक ते दोन वाट्या तांदूळ, एक कांदा, एक टमाटा, एक बटाटा, दोन-तीन हिरव्या मिरच्या, तेल, मोहरी, हिंग, दालचिनी, तमालपत्र, लवंग हे सारे प्रमाणानुसार घ्यावे. तिखट, हळद चवीपुरतं मीठ. कृती —-मसालेभात तयार करताना आधी जितक्या प्रमाणात भात करायचा आहे, तेवढे तांदूळ स्वच्छ धुऊन घ्यावे. कांदा, टमाटा आणि बटाटा चिरून घ्यावा. हिरवी मिरची चिरून घ्यावी. फोडणी करता तेल गरम करून त्यामध्ये मोहरी आणि हिंग घालून त्यामध्ये दालचिनी तमालपत्र आणि लवंग घालून सगळ्या भाज्या टाकून घेऊन परतून घ्याव्या. हळद, तिखट, गरम मसाला घातल्यावर तांदूळ परतून घ्यावे. चवीनुसार मीठ घालावे.व अंदाजाने पाणी घालून दोन शिट्ट्या द्याव्या.व मोकळा असा भात तयार आणि शेवटी त्यावर कोथिंबीर पेरावी. चवीला अतिशय छान असा मसालेभात हा सगळ्यांनाच आवडतो. मसालेभाताबरोबर कोशिंबीर किंवा रायतं छान लागतं.
३) व्हेज पुलाव–
साहित्य–साधारणतः दोन वाटी तांदूळ, भाज्यांमध्ये चिरलेला बटाटा, फ्रेंच बीन्स, टमाटा, कांदा, मटर, गाजर, अंदाजाने, हिरवी मिरची दोन ते तीन बारीक चिरलेली..
तिखट, हळद, गरम मसाला किंवा व्हेज पुलाव मसाला, धने पावडर, जिरे पावडर, मीठ. तीन ते चार चमचे तेल, मोहरी, हिंग
कृती –कुकर मध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करून घ्यावे.
तेल तापले की त्यामध्ये मोहरी आणि हिंग घालावा. चिरलेला कांदा परतून घ्यावा. मग उरलेल्या भाज्या परतून घ्याव्या. नंतर हळद, तिखट, पुलाव मसाला घालून परतून घ्यावे आणि धुतलेला तांदूळ त्यामध्ये टाकून एकत्र करून घ्यावे व चवीनुसार मीठ घालावे. सगळे नीट परतून झाले की अंदाजानेच पाणी घालावे व दोन ते तीन शिट्ट्या द्याव्या. व्हेज पुलाव तयार. वरून कोथिंबीर घालावी. व्हेज पुलाव बरोबर रायतं तयार केलं की एक संपूर्ण जेवण तयार होते
४) नारळी भात–
साहित्य–दोन वाट्या धुऊन घेतलेल्या तांदळाचा शिजवलेला भात, एक लहान दालचिनी, तीन-चार लवंगा, आठ दहा काजू, दहा-बारा बेदाणे, एक खोवून घेतलेले नारळ, दोन-तीन वेलची किंवा वेलची पूड. साजूक तूप, केशर किंवा खाण्याचा रंग.
कृती –एका पॅनमध्ये तूप गरम करून झाले की त्यामध्ये लवंग आणि विलायची तसेच सुकामेवा काजू, बदाम, बेदाणे घालून घ्यावे. साधारण सोनेरी रंगावर परतून घेतले की, त्यामध्ये शिजवलेला भात घालावा तो परतून घेतला की खोवलेले खोबरे घालावे आणि केशराचे दूध घालावे किंवा खाण्याचा रंग घालावा. सगळे एकत्र करून झाले की,एक वाटी साखर घालावी किंवा गुळही घालता येतो हे सारे परतून घ्यावे. आणि थोडी वाफ द्यावी.. नारळी भात तयार होतो.
५) बिसी बीळे भात–
साहित्य–साधारण एक वाटी तांदूळ आणि एक वाटी तूर डाळ स्वच्छ धुऊन पाण्यामध्ये ठेवावे, एक चिरलेला कांदा, एक वाटी फरसबी चिरलेली, एक टमाटा चिरलेला, एक वाटी फ्लावरचे तुकडे, अर्धा वाटी गाजराचे चिरलेले तुकडे, साधारण एक इंच आल्याचे तुकडे, एक वाटी सिमला मिरचीचे कापलेले काप, एक चिरलेला बटाटा.
तेल, मोहरी, हळद, तिखट, जिरे, चवीला मीठ, धने पूड, एक ते दोन चमचे चिंचेचा कोळ, एक चमचा गुळ, सात आठ कढीपत्त्याची पाने, कोथिंबीर.
दोन चमचे चणाडाळ, दोन चमचे उडीद डाळ, अर्धा वाटी सुकं खोबरं, एक दालचिनीचा तुकडा, चार-पाच सुक्या मिरच्या, अर्धा चमचा मेथी, अर्धा चमचा धणे. या साहित्याला कढईत एकत्र भाजून घेऊन त्याची पूड करायची.
कृती –कढईमध्ये फोडणी करून मोहरी, हिंग, जिरे घालून कढीपत्त्याची पाने घालून कांदा टमाटा घालून थोडं शिजू द्यावं व त्यामध्ये तुरीची डाळ घालावी व थोडं मिक्स करून त्याला शिजू द्यावे. त्यामध्ये आता इतर भाज्या घालाव्या. हे सगळे साहित्य शिजत आले की मग त्यामध्ये तांदूळ घालावे व वरील वाटलेला मसाला योग्य त्या चवीनुसार घालावा तसेच चिंचेचा कोळ घालावा चवीपुरते मीठ आणि गूळ घालावा आणि शिजू द्यावे. अधून मधून हलवत मंद आचेवर शिजू द्यावे. हे सारे तयार झाले की त्यामध्ये कोथिंबीर हलकेच पेरावी. चविष्ट असा बिसी बेळे भात तयार. हा भात कर्नाटक राज्यात खाल्ल्या जातो.
६) दाल खिचडी–
साहित्य–एक वाटी तांदूळ, एक वाटी मूग डाळ, तीन-चार लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेऊन, कढीपत्त्याची पाने,एक कांदा बारीक चिरलेला, एक टमाटा बारीक चिरलेला, दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, अर्धा इंच आलं, कोथिंबीर बारीक चिरलेली.
फोडणी करता तेल किंवा तूप, जिरे ,मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ हे सगळे आवश्यक असेल तेवढे. दोन लाल मिरच्या.
कृती –डाळ व तांदूळ स्वच्छ धुऊन त्यामध्ये पाणी टाकून कुकरमध्ये हळद टाकून नीट शिजवून घ्यावे.
त्यानंतर एका कढईमध्ये फोडणी करता तीन ते चार चमचे तेल अथवा तूप गरम करून ते तापले की त्यामध्ये मोहरी व जिरे टाकून तडतडल्यावर हिंग टाकावे .बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, लसूण, आलं टाकून कढीपत्त्याची पाने टाकून थोडे परतून घ्यावे व कांदा टमाटा टाकावा. हे सारे शिजत आले की, त्यामध्ये हळद, तिखट, धने पूड, जिरे पूड टाकावी व कुकर मधली शिजलेली खिचडी त्यामध्ये टाकावी. हे सारे मिश्रण नीट परतून घ्यावे. गरज वाटल्यास थोडे पाणी घालावे व चवीनुसार मीठ घालावे. पाच मिनिट झाकण ठेवून खिचडी नीट शिजवून घ्यावी. त्यानंतर एका छोट्या भांड्यात फोडणी करता तेल गरम करून त्या खिचडीला वरून लाल मिरची व लसणाची फोडणी द्यावी आणि वरून कोथिंबीर टाकावी गरम गरम दाल खिचडी तयार. हे एक पूर्णान्न आहे.
७) गोळा भात–हा एक विदर्भातला अतिशय आवडता पदार्थ आहे.
साहित्य–एक वाटी चना डाळीचे म्हणजे हरभरा डाळीचे भरड, तीन चमचे बेसन, दोन ते तीन वाटी स्वच्छ धुऊन घेतलेला तांदूळ
तेल, मोहरी, जिरे, हिंग, लाल मिरची, हळद , कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता
कृती –सर्वप्रथम हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुऊन खरपूस भाजून घ्यावी व त्याचे त्याचा भरड काढावा म्हणजेच मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यावी.
या डाळीच्या भरडामध्ये बेसन टाकून हळद तिखट, मीठ, जिरे पावडर धने पावडर टाकून त्याला भिजवून घ्यावे व त्याचे गोळे करावे.
एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग घालावे हिरवी मिरचीचे तुकडे व लाल मिरची तसेच कढीपत्ता घालावा. हळद घालून त्याला परतून घ्यावे व त्यात धुतलेला स्वच्छ तांदूळ टाकावा आणि दोन ते तीन वाट्या पाणी टाकून त्याला शिजू द्यावे. झाकण ठेवावे. भात शिजत आला की त्यामध्ये मीठ घालावे. व तयार केलेल्या गोळे त्यावर ठेवावे आणि झाकण ठेवून नीट शिजू द्यावे. हा गोळा भात शिजला की त्यावर कोथिंबीर घालावी. गरम गरम गोळा भात कढी बरोबर खूप चविष्ट लागतो.
८) टॅमरिंड राईस-टॅमरिंड राईस म्हणजे चिंचेच्या कोळामध्ये शिजवलेला भात. हा भात साधारणतः तामिळनाडू या राज्यामध्ये तयार केला जातो.
साहित्य–एक वाटी तांदूळ, एक चमचा चणाडाळ, एक चमचा उडद डाळ, तीन-चार लाल मिरच्या, कढीपत्ता, 30 ते 40 ग्रॅम चिंचेचा कोळ,
फोडणी करता तेल, हिंग, जिरे, मोहरी, हळद, तिखट, चवीपुरते मीठ, तीन चमचे शेंगदाणे आणि गुळ
कृती –एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यावे. त्यामध्ये मोहरी हिंग आणि धुतलेली उडद डाळ आणि चणाडाळ घालून खरमरीत परतून घ्यावे. त्यामध्ये कढीपत्ता घालावा व लाल मिरची घालून घ्यावी. तसेच शेंगदाणे पण घालावे. हळद आणि तिखट घालून नीट परतून घ्यावे. यामध्ये गुळ आणि चिंचेचा कोळ घालून थोडा वेळ शिजू द्यावे. त्यानंतर शिजवलेला तांदूळ घालावा व नीट वाफ येऊ द्यावी. चवीपुरते मीठ घालावे. गरम भात तयार. वरती कोथिंबीर टाकावी.
९)पोंगल–
साहित्य–साधारण एक वाटी तांदूळ आणि एक वाटी मूग डाळ, साजूक तूप, दहा-बारा काळीमिरी दहा-बारा कढीपत्त्याची पाने, सात आठ काजू, जिरे, किसलेलं आलं, हिंग, मीठ
कृती –तांदूळ आणि डाळ एकत्र करून स्वच्छ धुऊन घ्यावे. कुकरमध्ये दोन चमचे साजूक तुपामध्ये परतवून त्यांना नीट शिजवून घ्यावे.
कढईमध्ये परत तीन ते चार चमचे तूप घालून त्यामध्ये मोहरी व हिंग घालून कढीपत्त्याची पाने, काळीमिरी, काजू, किसलेले आले घालून परतून घ्यावे व त्यामध्ये शिजलेला भात व मुगाची डाळ घालावी व एक वाफ द्यावी. नंतर चवीनुसार मीठ घालावे. गरम गरम पोंगल तयार.
वरील भाताचे प्रकार इंग्लिश मध्ये one pot meal म्हणतात तसेच असतात, कारण या एका प्रकारातच संपूर्ण जेवणाचा आनंद मिळतो. तसेच त्यामध्ये पौष्टिक पदार्थ पण असतात.
भारतीय जेवणामधील भारताचे विविध प्रकार variety of rice in indian cuisine हा लेख आपल्याला कसा वाटला हे वाचून प्रतिक्रिया द्या. त्याकरता आमच्या लेखक मित्र या वेबसाईटला जरूर भेट द्या. आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये सुद्धा शेअर करा आणि आमचे व्हाट्सऍप चॅनेल जॉईन करा धन्यवाद!
लेखिका– वैशाली देव( पुणे)
Khup mast
Ekdam mast
Very easy and testy rice recipes….its a sweet treat for rice lovers like me….🧃
Thak u for shraing🙏
Very nice information.