विषय :दिवाळीची सुरुवात – “वसुबारस” :
मंडळी नुकताच दसरा सण झाला की वेध लागतात ते दिवाळीच्या सणाचे. आपल्या सणांच्या आगमनाची चाहूल लागते ती प्रथम निसर्गाला. हवेत गारवा जाणवू लागतो. पाऊसही आपला निरोप घेऊन परतीच्या वाटेवर आहे.वातावरणाला हवाहवासा वाटणारा एक छान गंध आहे. दिवाळीच्या उंबरठयावर गारठा चांगलाच जाणवू लागलाय.
दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण, तिमिराकडून प्रकाशाकडे वाटचाल, आनंदाचा,तेजाचा सण. दिवाळीच्या सणाची सुरुवात होते ती ‘वसुबारस’ सणानी. दसर्याला आम्ही ९ दिवस देवींची माहिती सांगितली त्यावेळी अनेकांनी दिवाळी ची हि माहिती आणायची असे कमेंट केले होते म्हणूनच खास तुमच्यासाठी आम्ही दिवाळीतला प्रत्येक क्षण सेलिब्रेट करत आहोत. त्यामुळे हे सर्व भाग पहायला विसरू नका.
भारत हा कृषिप्रधान देश आहे.विविध भाषा, परंपरा, संस्कृती, प्रांत, सण – उत्सव यांनी नटलेला आहे. आज पाहूया वसुबारस पूजनाचे महत्व………….
: वसुबारस पूजन :
महाराष्ट्रात दिवाळीची सुरुवात ‘वसु – बारस’ या दिवसापासून होते. अश्विन कृष्ण द्वादशीस – गोवत्स द्वादशी, वसुबारस या नावाने संबोधले जाते.हिंदू धर्मात गायीला अनन्य साधारण महत्व आहे. घराच्या अंगणात रंगीबेरंगी रांगोळ्या काढल्या जातात.आकाश दिवा लावला जातो.विविध आकाराचे दिवे, पणत्या लावून घर – अंगण प्रकाशात उजळत असते.
सांजवेळी – दिवेलागणीला स्त्रिया एकभुक्त राहून संवत्स म्हणजेच वासरासह गायीची पूजा करतात, त्यांच्या पायावर पाणी घालून, कुंकुम तिलक लावून पुरण पोळीचा महानैवेद्य दाखवतात. या दिवशी गहू, मूग खात नाहीत.सुवासिनी बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात.
तत: सर्वमये देवी सर्वदेवैरलङ्कृते |
मातर्ममाभिलषितं सफलं कुरू नन्दिनि ||
अर्थ – हे सर्वात्मक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर.
तसेच भय निवारण कर, भरपूर कृषी उत्पादन व्हावे, गोधन वृध्दी व्हावे, सुबत्ता, समृध्दी लाभो अशी मनोभावे प्रार्थना करतात
गायीमध्ये ३३ कोटी देवतांचा वास असतो म्हणून ती पूज्य,पवित्र मानली जाते. वसुबारस या दिवशी पारंपरिक कथा सांगितली जाते ती अशी आहे – देव व दानवानी समुद्र मंथन केले.त्यातून ५ कामधेनू उत्पन्न झाल्या, त्यातील एका धेनुचे नाव नंदा होते. म्हणून वसुबारस हे व्रत केले जाते. महाराष्ट्रात जशी वसु बारस साजरी करतात, तशीच गुजरात मधे बाग बरस म्हणून साजरी होते. तर दक्षिण भारताच्या काही भागामधील लोक नंदिनी व्रत म्हणून साजरे करतात.
वसुबारस हा दिवस ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, कारण गाय हा प्राणी त्यांच्यासाठी उत्पन्नाचा एक प्राथमिक स्त्रोत असतो
या दिवशी देवी लक्ष्मी जी संपत्तीची देवी म्हणून ओळखली जाते ती गाईचे रूप धारण करते, म्हणून लोक देवी लक्ष्मीचे आशीर्वाद घेण्यासाठी गायीची मनोभावे पूजा करतात.
: गोपुजेची परंपरा :
गोमातेची महती अवर्णनीय आहे.तिची रोज पूजा करण्याची प्रथा आहे.तिला गोग्रास दिला जातो.प्रामुख्याने गायीला हरभरा डाळ व गूळ खायला देतात.ती वंदनीय,पूजनीय असल्यामुळे तिला शेती कामात कधीही घेतले जात नाही. मनुष्याच्या हितासाठी पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पाच तत्त्वरूपी देवतांची निर्मिती केली. गाय या पंचतत्त्वांची माता आहे; कारण गोमाता भूमी, पाणी व वायू यांची पुढीलप्रकारे शुद्धी करते.
गोमय (शेण) व गोमूत्र हे भूमातेचे स्वाभाविक अन्न आहे. हे अन्न भूमातेला योग्य प्रमाणात मिळाले, तर भूमीही आरोग्यदायी होऊन पुष्कळ प्रमाणात अन्नाचे उत्पादन करील. आज केवळ शिल्लक राहिलेले अवशेषआणि कीटकनाशके यांमुळे अन्न, पाणी अन् वायू यांमध्ये प्रदूषण होत आहे. गोमय व गोमूत्र यांमध्ये कीटक प्रतिबंधक गुण असतात; मात्र ते मानव, पशू, पक्षी, कीटक-पतंग आणि पर्यावरण यांसाठी बाधक नाहीत. गोमयाच्या साहाय्याने कोणत्याही प्रकारच्या कचर्यापासून ‘कंपोस्ट’ पद्धतीने उत्तम खत बनवले जाऊ शकते.
आप : गोमय व गोमूत्र भूमीवरील पाणी अन् पावसाचे पाणी यांची शुद्धी करते. गोमयामुळे जलाशयासारख्या पाण्याच्या मोठ्या स्रोतांचे स्थलांतर रोखले जाऊन त्याची शुद्धी होत असते.
तेज : गायीचे तूप हवनाच्या माध्यमातून अग्नीरूपी देवतेच्या मुखामध्ये प्रवेश करून तेजतत्त्वाची शुद्धी करण्यासह आकाशादी सर्व देवतांची तृप्ती करते.
वायू : दिवसेंदिवस होणारी जागतिक तापमानाची वृद्धी व कार्बनचे उत्सर्जन यांवर नियंत्रण केवळ गोमय अन् त्यापासून निर्माण होणारे इंधन यांचा वापर केल्यानेच होऊ शकेल.
आकाश : आज प्रदूषणामुळे मानवाला रासायनिक पाऊस, अवर्षण प्रवण , यांसारख्या आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. गायीच्या तुपाचे हवन केल्याने आकाश व वायू यांची शुद्धी तर होतेच; पण योग्य प्रमाणात वृष्टीही होते. जगातील अनेक देशांमध्ये हवन हे अरोग्यासाठी तसेच वातावरण शुध्दी साठी उपयुक्त आहे, ही संकल्पना मूळ धरू लागली आहे. गायीचे गोमूत्र व दूध ही संजीवनी आहे.
गोमूत्र : हे पावित्र्य निर्माण करणारे आहे. गोमूत्र काही रोगांना सरळ नष्ट करते, तर काही रोगांना शरिराची रोगप्रतिकारशक्ती वाढवून नष्ट करते.गायीचे दूध : हे बुद्धीवर्धक, स्फूर्तीदायी रोगप्रतिबंधक व शरिराचे पोषण करण्यास संवर्धक आहे.गायीचे तूप, ताक व पंचगव्य : हे सर्व पदार्थ गायीच्या माध्यमातून मानवाला मिळालेला ईश्वरनिर्मित उत्तम आहार आहेत.
ज्या ठिकाणी संरक्षण – संवर्धन होऊन तिला पूज्य भाव देऊन तिचे पूजन केले जाते, त्या ठिकाणी व्यक्ती, समाज, राष्ट्र भरभराटीस येते.
गोरक्षण, गोपालन, व गो उत्पादनाचे संवर्धन याला पर्याय नाही.एकप्रकारे गोमाता ही पंचमहाभुतांच्या कुपोषणाची अधिकरिणी आहे.
गायीचे लाभ ओळखून सर्वांनी तिच्या पालनाची प्रतिज्ञा करणे, ही काळाची आवश्यकता !
रक्षामि धेनुं नित्यं पालयामि धेनुं सदा। ध्यायामिधेनुं सम्यक् वन्दे धेनुमातरम् ।।
अशी ही बहुलक्षणी व बहुगुणी गोमातेला आमचे त्रिवार वंदन.
तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा . व्हिदिओ आवडल्यास subscribe करायला विसरू नका
लेखिका – सौ. वृषाली विश्वनाथ पोंदे.