वट पौर्णिमा २०२४ – पूजा कशी करावी ?
वट पौर्णिमा हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. भारताच्या उत्तर भागात वटपौर्णिमेचं हे व्रत अमावस्या तिथीला पाळले जाते आणि महाराष्ट्र, गुजरातसह दक्षिण भागात हे व्रत पौर्णिमा तिथीला पाळले जाते.
वटपौर्णिमा विषयी पौराणिक कथा
अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला. पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला. व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली.
सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासूसासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात.
वडाच्या झाडाचे धार्मिक महत्त्व
धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाचे मोठे महत्व सांगितले आहे. हे झाड त्रिमूर्तीचे! सालात विष्णूचे, मुळात ब्रह्मा आणि फांद्यामध्ये शिवाचे प्रतीक आहे. हे झाड दीर्घकाळ अक्षय राहते, म्हणून त्याला ‘अक्षयवत’ असेही म्हणतात. सौभाग्यवतीचे वरदान मिळण्याबरोबरच आरोग्यासाठीही या वटवृक्षाची पूजा केली जाते. भगवान शिवही वटवृक्षाखाली ध्यानधारणा करत असत. वटवृक्ष अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. देवतेसमान मानले जाणारे वटवृक्ष सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे केंद्र मानले जाते.
वड हा वृक्ष दीर्घायुषी असल्याने वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करायवयचे असते. तीन रात्र व्रत करावे असे सांगितले गेले आहेत. तरी तीन दिवस व्रत- उपवास करणे अशक्य असल्यास फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा.
वटपौर्णिमा व्रत कसे करावे?
पूजा साहित्य:-2 हिरव्या बांगड्या, शेंदुर, एक गळसरी, अत्तर, कापुर, पंचामृत, पुजेचे वस्त्र , विड्याचे पाने, सुपारी, पैसे, गुळ खोबरयाचा नैवेद्य, आंबे, दूर्वा, गहु, सती देवीचा फोटो किंवा सुपारी इ.
पूजन विधी:-
वडाच्या झाडाला किंवा वटपौर्णिमाच्या कागदाला ( वटपौर्णिमेचा कागद बाजारात मिळतो) तिहेरी दोरा बांधावा. सूत कापसाचे काढलेले असावे. प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी. त्याची हळद कुकुं अक्षता वाहुन पंचोपचार पूजा करावी. त्यानंतर सती मातेच्या सुपारीचीपण पंचोपचार पूजन करावे. वडाच्या मूळाजवळ पुरुष सुक्तासह षोडशोपचार अभिषेक करून चोपचार पूजन व् आरती करावी.
सूत गुंडाळताना या मंत्राचा उच्चार करावा.
अवैधव्यं च सौभाग्यं देहि त्वं मम सुव्रते।
पुत्रान् पौत्रांश्च सौख्यं च गृहाणाध्र्यं नमोस्तुते।।
वटवृक्षाला पाणी अर्पण करताना या मंत्राचा उच्चार करावा…
वट सिंचामि ते मूलं सलिलैरमृतोपमै:।
यथा शाखाप्रशाखाभिर्वृद्धोसि त्वं महीतले।
तथा पुत्रैश्च पौत्रैस्च सम्पन्नं कुरु मां सदा।।
खालील मंत्र म्हणून वडास नमस्कार करावा.
सावित्री ब्रम्हा वादिनी सर्वदा प्रिय भाषिणी।
तेन सत्येनमां पाहि दुःखसंसार सागरात।।
अवियोगि यथा देव सवित्र्या सहीतस्य ते।
अवियोग तथास्माकं भूयात् जन्म जन्मनि।।”
स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा दुसऱ्या दिवशी सकाळी 10 नंतर सोडावा. वडास हळदी कुंकू वाहून आंबे पैसे वडापुढे ठेऊन नमस्कार करावा. वडाला तिन प्रदक्षिणा घालाव्यात. पाच सुवासिनींची आंबे, ५ प्रकारची फळे देऊन ओटी भरावी.
लेखिका -तेजस्विनी गडकरी