व्यसनांच्या विळख्यापासून तरुण मुलांना कसे वाचवावे? l व्यसन म्हणजे काय ?

WhatsApp Group Join Now

किशोरवय आणि ड्रग्सचे मायाजाल

आजची तरुण पिढी म्हणजे उद्याचे भविष्य हे नशेच्या विळख्यात अगदी सहजपणे सापडत आहे, असे आपण वरचेवर पाहत आणि ऐकत असतो. पण याबद्दल केवळ काळजी व्यक्त न करता असे का घडत असावे आणि यातून त्यांची सुटका कशी करु शकतो किंबहूना आपण आपल्या मुलांचे किंवा एक सामाजिक दृष्टिकोन विचारात घेऊन आपल्या नजीकच्या तरुणांचे यापासून संरक्षण कसे करता येईल, याचा आपण नक्कीच विचार केला पाहिजे. आणि त्यासाठी सर्वप्रथम मुलांमध्ये या सगळ्याचा आकर्षण का आहे? याचे नक्की कारण काय?,या सगळ्यांमुळे त्यांच्यावर काय दुष्परिणाम होतात ? आणि हे सगळं आपण कसं रोखू शकतो? हे सर्व काही आपण या लेखात पाहूयात.

शाळकरी किंवा तरुण मुलांना ड्रग्सची भुरळ का पडते?

आजकाल घरोघरीं नोकरी निमित्त अथवा काही कौटुंबिक कारणांमुळे एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास होत चालला आहे. याला बरेच अपवादही असू शकतात. बऱ्याचश्या कुटुंबांमध्ये आई-बाबा दोघेही काम करत असल्याने घरात मूल सांभाळायला कोणी नसल्याने अशा मुलांची अगदी लहान वयातच पाळणाघरात रवानगी केली जाते. मुलांना आई-वडिलांचा सहवास कमीत कमी मिळतो. अगदी घरी आल्यानंतर देखील कित्येक पालक त्यांच्या आयुष्यात व्यस्त असल्याने मुलांशी अभ्यास व जेवण या व्यतिरिक्त इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी त्यांना वेळच नसतो. वरचेवर मुलांना आपल्या दैनंदिन जीवनातील काही ठराविक घडामोडींची कल्पना देणे, आजूबाजूला घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टी बद्दल त्यांच्यासोबत चर्चा करणे या गोष्टी होत नाहीत. ज्या मुलांची जडणघडण आई-वडिलांच्या सहवासात होत असते, त्या मुलांबाबत देखील या गोष्टी कमी अधिक प्रमाणात आढळून येतात. जर मुल एकुलते एक असेल तर शक्यतो त्याचे अतिरिक्त प्रमाणात लाड होताना दिसतात.  अगदी मुल मागेल त्या गोष्टींचा ताबडतोब पुरवठा केला जातो. आई वडील पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याने वस्तुरूपी त्या वेळेची भरपाई केली जाते. एकंदरीत घरात संवाद साधण्यासाठी कोणी नसल्याने आलेल्या एकटेपणाला कंटाळून ही मुले अजाणते पोटी अगदी सहज नशेच्या आहारी जातात. 

तसेच या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात आजची स्मार्ट पिढी या स्मार्ट डिव्हाइसेसचा वापर सहजरित्या करताना दिसते. फक्त उच्चभ्रूच नव्हे तर सामान्य कुटुंबातील मुलांकडे देखील मोबाईल फोन असतो. अगदी सातवी आठवीपासून मुले स्वतःचा वैयक्तिक मोबाईल वापरताना आढळून येतात. पालक विविध प्रकारचे ऑनलाइन क्लासेस आणि कुठे बाहेर जाता येता त्वरित संपर्क साधता यावा याकरिता त्यांना मोबाईल व लॅपटॉप देतात. परंतु आपले मूल याचा वापर कसा करीत आहे, याची त्यांना कल्पनाच नसते.  ओटीटी प्लॅटफॉर्म मध्ये तर दहा पैकी आठ वेब सिरीजमध्ये अश्लीलता व अनेक प्रकारच्या मादक पदार्थांचे सेवन हे अगदी सर्रासपणे दाखवले जाते. कळत नकळत मुलांच्या कोवळ्या मनावर त्याचा दुष्परिणाम होत असतो. त्यांना चांगल्या वाईट गोष्टींची पुरेपूर जाणीव नसल्यामुळे त्या अशा स्क्रीनवर दाखवल्या जाणाऱ्या गोष्टींकडे लगेचच आकर्षित होतात आणि संधी मिळाल्यास त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. 

स्पर्धात्मक युगात आपल्या मुला/मुलीचा टिकाव लागावा म्हणून पालक शालेय जीवनापासूनच त्यांचा कल लक्षात न घेता, शालेय अभ्यासक्रमा व्यतिरिक्त त्यांना वेगवेगळ्या परीक्षांना बसवतात. काही मुलांना या परीक्षांचा ताण अथवा त्यात आलेले अपयश पचवता न आल्याने मानसिक आधारासाठी ते अमली पदार्थांकडे वळतात. 

आज कालच्या इन्स्टंट जमान्यात संयम हरवत चालला आहे. खाण्यापासून ते सर्वच गोष्टींसाठी कोणाकडेही थांबायला वेळ नसतो. प्रत्येकजण कुठली ना कुठली तरी गोष्ट मिळविण्यासाठी घड्याळाच्या काट्यावर पळत असतो. जर एखादी गोष्ट मला आज नाही मिळाली तर उद्या जगचं बुडणार आहे, इथपर्यंत काही लोकांचे वर्तन असते.  त्यामुळे जरा कुठे अपयश आले किंवा मनाविरुद्ध घडले की मुलांचा स्वतःच्या मनावरचा ताबा सुटतो आणि ते सैरभैर होतात. आणि अशा अपयशांनी नैराश्य आलेली मुले क्षणिक आनंदासाठी नशेच्या आहारी जातात.

मुलांना ड्रग्स कसे आणि कुठून मिळतात?

त्यातून काही समाज विघातक व्यक्ती हे अमली पदार्थ मुलांना पावडर, गोळी, पेन, स्टॅम्प अशा विविध स्वरूपात अगदी सहजपणे उपलब्ध करून देतात.  शाळा, कॉलेजच्या आजूबाजूच्या परिसरातच हे लोक छुप्या पद्धतीने आपले दुकान मांडून प्रथमतः काही मुलांना हेरून त्यांना आपले ग्राहक बनवतात. त्यानंतर त्या मुलांमार्फत अजून काही मुलांना या जाळ्यात अडकवतात. हेरॉईन, कोकेन, मारीजुवाना, बटन अशा स्वरूपाचे घातक ड्रग्स बाजारात सर्रासपणे मिळतात.त्यातील बटन नावाचे ड्रग्स हे 16 ते 23 वयोगटातील मुलांमध्ये खूपच फेमस आहे. याच्या सेवनाने गुंगी येते तर त्याच्या अतिरिक्त सेवनाने मृत्यू देखील होऊ शकतो.

ड्रग्स घेतल्याने मन एकदम शांत होतं, मनावरचा ताण कमी होतो आणि मुलं एका काल्पनिक विश्वात जातात, त्यात भर म्हणजे वयाच्या नवीन उंबरठ्यावर उभ्या असणाऱ्या या मुलांमध्ये काही नैसर्गिक शारीरिक बदल देखील होत असतात. ड्रग्स घेतल्याने त्यांच्या भावना उत्तेजित व्हायला लागतात आणि मग पुन्हा पुन्हा याचा अनुभव घेण्यासाठी ते ड्रग्सचे वारंवार सेवन करू लागतात. मग कळत नकळतपणे ड्रग्सच्या मायाजालात गुरफटत जातात. 

मुलांना ड्रग्स पासून कसे दूर ठेवता येईल?

जर आपल्याला उद्याचे भविष्य खरोखरच उज्वल बनवायचे असेल तर आपण प्रत्येकाने सतर्क राहून या व येणाऱ्या पिढीला अशा विनाशकाली जाळ्यापासून दूर ठेवायला हवे. कुटुंब एकत्र असो वा विभक्त, पालकत्व एकेरी असो वा दुहेरी, आपल्या दैनंदिन कामांचे व्यवस्थितरित्या व्यवस्थापन करून मुलांशी जास्तीत जास्त संवाद साधला गेला पाहिजे. त्यांच्या शैक्षणिक विकासासोबत त्यांच्या मानसिक आरोग्याला देखील तितकेच महत्त्व दिले गेले पाहिजे. प्रत्येक वेळी मुलांना धाक दाखवण्यापेक्षा प्रेमाने त्यांच्या गरजा लक्षात घ्यायला पाहिजे. आपल्या पाल्याच्या मित्र-मैत्रिणींबद्दल आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. मुले स्मार्ट डिव्हाइसचा वापर कशा पद्धतीने करत आहेत कुठले ॲप्स, गेम्स इन्स्टॉल करत आहेत वगैरे वगैरे यावर पालकांचे लक्ष असलेच पाहिजे. आणि मुल व पालक यांचे नाते इतके घट्ट असावे की मुलांना देखील आपल्यावर पाळत ठेवत आहेत असे वाटता कामा नये. केवळ मुल हट्ट करत आहे म्हणून त्याला एखादी वस्तू पुरवायची असे न करता खरोखरच गरज असेल तरच त्यांना ती उपलब्ध करून द्यावी. योग्य त्या ठिकाणी नाही म्हणून मुलांना मन मोडून मन घडवण्याची शिकवण घरातूनच दिली गेली पाहिजे.

जर घरातील कौटुंबिक वातावरण स्नेहपूर्ण, खेळीमेळीचे असेल तर शक्यतो मुलांना मानसिक आधारासाठी कोणत्याही इतर गोष्टींची गरज भासत नाही. आठवड्यातून एकदा तरी कुटुंबातील सर्वांनी एकत्रितपणे एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या ठराविक घडामोडींबद्दल आपल्या मुलांशी चर्चा करावी. काही निर्णयांमध्ये त्यांना सामील करून त्यांचेही मत विचारात घ्यावे यामुळे त्यांना कुटुंबात आपल्यालाही महत्त्वाचे स्थान आहे असे वाटते आणि त्यामुळे ते देखील आपल्यापासून काही लपून छपून करण्याची शक्यता कमी होते.

शैक्षणिक संस्थांमध्ये देखील मुलांना लैंगिक शिक्षणासोबत या मादक पदार्थांपासून होणारा धोक्यांची कल्पना दिली गेली पाहिजे. लहानपणापासूनच मानसिक आरोग्य संतुलित राहून मनावरचा ताबा सुटू नये याकरता घरात अथवा शाळेत ध्यानधारणेची मुलांना शिकवण दिली गेली पाहिजे. त्यामुळे कोणत्याही कारणामुळे येणारे नैराश्य अथवा आकर्षण यामुळे ढासळणारा तोल परिणामी नशेच्या आहारी जाणे या सर्व गोष्टींना अटकाव करता येईल.

शाळकरी मुलांमधील ड्रग्चे वाढते प्रमाण लक्षात घेता भारत सरकार ‘नशा मुक्त भारत अभियान’ राबवत आहे. जर तुम्हालाही जाता येता अशी ड्रग्सच्या आहारी जाणारी मुले आढळली तर त्यांचं भविष्य वाचवण्यासाठी तुम्ही राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक १४४४६ यावर संपर्क करू शकता.

4 thoughts on “व्यसनांच्या विळख्यापासून तरुण मुलांना कसे वाचवावे? l व्यसन म्हणजे काय ?”

  1. बरोबर आहे शाळेतून सुद्धा या गोष्टींची कल्पना मुलांना दिली गेली पाहिजे.

  2. प्रिया

    मुलांबरोबर, पालकांना पण या बाबतीत जागरूक केल पाहिजेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top