ISRO’S lady humanoid robot astronaut ‘VYOMA MITRA’ for Gaganyan mission.
Vyom Mitra information in Marathi:भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) तर्फे लवकरच एक महिला रोबोट अंतराळवीर – ‘व्योममित्र’ अंतराळात जाण्यास सज्ज झाली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र प्रसाद यांनी नुकतीच माध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. ISRO च्या महत्त्वाकांक्षी गगनयान या मोहिमेच्या तयारीचा हा एक भाग आहे. या निमित्ताने आपण या रोबोट बद्दल तसेच एकंदरीत गगनयान मोहीमेबद्दल (Gaganyan mission) जाणून घेऊ यात.
गगनयान मोहीम– (Gaganayan mission)
गगनयान ही ISRO ची एक महत्वाकांक्षी अंतराळ मोहीम आहे. या मोहिमेअंतर्गत तीन जणांचा चमू ३ दिवसांसाठी अंतराळात पाठवला जाणे अपेक्षित आहे. मानवाला अंतरिक्षात घेऊन जाणारी आणि जवळजवळ १०,००० कोटींचा अंदाजे खर्च असलेली गगनयान ही पहिलीच भारतीय मोहीम आहे. त्यामुळे ही मोहीम भारतासाठी फार महत्त्वाची आहे. कारण ही मोहीम यशस्वी झाल्यास अंतरिक्षात मानव पाठवणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीन नंतर चौथ्या क्रमांकाचा देश ठरेल. मानवी अंतराळ उड्डाणात भारताची क्षमता आजमावून पाहणे आणि ती जगापुढे प्रदर्शित करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. या मोहिमेत अंतराळवीरांच्या चमूला पृथ्वीपासून सुमारे ४०० किमी अंतरावरील कक्षेत (लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये (LEO)) प्रस्थापित करणे तसेच त्यांना सुरक्षितपणे परत आणून पॅराशूटच्या सहाय्याने समुद्रात उतरवणे
समाविष्ट आहे. गगनयान २०२५ मधे प्रक्षेपित होणार आहे. या मोहिमेसाठी आवश्यक असलेल्या चाचण्या टप्प्याटप्प्याने करण्याचे काम चालू आहे. अनेक अत्यावश्यक तंत्रज्ञानाचा विकास या मोहिमेसाठी केले गेला आहे.
– क्रूला अंतराळात सुरक्षितपणे वाहून नेण्यासाठी मानवी-रेट केलेली प्रक्षेपण वाहने,
– जे कर्मचारी (अंतराळवीर) अवकाशात राहतात त्यांना पृथ्वीसारखेच परिचित वातावरण प्रदान करण्यासाठी लाइफ सपोर्ट सिस्टम,
– अंतराळवीरांना सुरक्षितरित्या परत आणण्यासाठी क्रू इमर्जन्सी एस्केप तरतुदी,
– क्रूसाठी क्रू मॅनेजमेंट पैलू विकसित करणे,
– गगनयान मोहिमेसाठी प्रशिक्षण, पुनर्प्राप्ती आणि पुनर्वसन इत्यादी.
या आधी ऑक्टोबरमधे गगनयान मोहिमेची (Gaganyan mission) पहिली उड्डाण चाचणी (Test vehicle flight- TV D1) यशस्वीरीत्या पार पडली.
कुठल्याही मानवी अंतराळ मोहिमेत अंतराळवीरांना सुरक्षितरित्या परत आणणे हे फार महत्वाचे असते. वरील चाचणी अशा क्रू एस्केप सिस्टम आणि पॅराशूट सिस्टम संबंधीची अर्हता चाचणी होती. मानवी उड्डाणासाठी आवश्यक असलेले सर्व निकष आता पार पडले आहेत. इस्रो आता अतिरिक्त चाचणी मोहिमांसाठी तयारी करत आहे. TV-D2, G-X मानवरहित परिभ्रमण प्रात्यक्षिक उड्डाण, इंटिग्रेटेड एअर-ड्रॉप टेस्ट (IADT), आणि पॅड ॲबॉर्ट टेस्ट या काही आगामी मोहिमा/ चाचण्या आहेत.
याच मोहिमेचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे वर उल्लेख केलेला व्योममित्र रोबोटहोय. प्रत्यक्ष मानवाला अंतराळात पाठवण्यापूर्वीच हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. बरेच देश मानवाला अंतराळात पाठवण्यापूर्वी एखाद्या प्राण्याला अंतराळात पाठवून चाचणी घेतात. पण इस्रो मात्र व्योममित्र रोबोट (Vyomamitra robot) पाठवणार आहे.
काय आहे व्योममित्र? (ISRO’S lady humanoid robot astronaut ‘VYOMA MITRA’)
वर सांगितल्याप्रमाणे, व्योममित्र ही भारतातील पहिली महिला रोबोट अंतराळवीर आहे. ISRO ने 22 जानेवारी 2020 रोजी बंगळुरू येथील ह्युमन स्पेसफ्लाइट आणि एक्सप्लोरेशन सिम्पोजियममध्ये व्योममित्रची पहिली झलक दाखवली. २०२१ पासून व्योममित्रच्या इस्रोच्या मुख्यालयात अनेक चाचण्या घेतल्या जात आहेत. या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये व्योममित्रला अवकाशात पाठवण्याची मोहीम नियोजित केली आहे. व्योममित्र अंतराळ मोहिमेचा (ISRO’S lady humanoid robot astronaut ‘VYOMA MITRA’) उद्देश भारताचा अंतराळ उड्डाणातील क्षमता प्रदर्शीत करणे हा आहे.
व्योममित्र हा शब्द दोन संस्कृत शब्दांपासून बनला आहे. पहिला शब्द आहे व्योम- म्हणजे अवकाश. आणि दुसरा शब्द आहे –मित्र. थोडक्यात,व्योममित्र या शब्दाचा अर्थ असा आहे की जे उपकरण (रोबोट) अवकाशात मित्राप्रमाणे सर्व समस्यांवर लक्ष ठेवेल आणि सर्व ऑपरेशन्ससाठी मॉनिटरिंग डिव्हाइस म्हणून काम करेल. गगनयान मिशनच्या (Gaganyan mission) यशस्वीतेसाठी ऑपरेशन्सवर लक्ष ठेवण्यासाठी हे एक अर्ध-ह्युमनॉइड मशीन आहे.
केरळमधील वट्टियूरकावू येथे असलेल्या इस्रोच्या इनर्शिअल सिस्टीम्स युनिट (IISU) ने स्त्रीप्रमाणे दिसणाऱ्या या रोबोटची रचना केली आहे. अंतराळ उड्डाणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या प्रणालींचे मूल्यांकन आणि प्रमाणीकरण (evaluation and validation) करण्यात व्योममित्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे, यात नियंत्रण प्रणाली, जीवन समर्थन प्रणाली तसेच पॅराशूट प्रणालींपर्यंत अनेक प्रणालींचा समावेश होतो.
व्योममित्राची वैशिष्ट्ये आणि कार्ये (Vyom Mitra information in Marathi)
- व्योममित्र मधे अत्याधुनिक रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा मिलाफ आहे. त्यामध्ये अत्याधुनिक एआय अल्गोरिदम (AI algorithm) वापरला आहे.
- व्योममित्रच्या उपकरणांमध्ये रोबोटिक धड, डोके आणि दोन हातांचा समावेश आहे. त्यामुळे हा रोबोट मानवासारखा दिसतो. व्योममित्र अर्ध-ह्युमॅनॉइड रोबोट आहे. एका ह्युमनॉइड रोबोटमध्ये डोके, दोन हात, दोन पाय आणि धड यांचा समावेश होतो. व्योममित्रला दोन पाय नसल्यामुळे तो अर्ध ह्युमनॉईड आहे. व्योममित्रला मुद्दाम अर्ध ह्युमनॉईड ठेवले आहे. त्यामुळे क्रू मॉड्यूलमध्ये तो कार्यक्षमतेने सुव्यवस्थित काम करू शकेल.
- गगनयान मोहीमेत (Gaganyan mission) अंतराळवीर हे ‘मानव नियंत्रित सूक्ष्म-गुरुत्वाकर्षणात’ पृथ्वीच्या बाहेर रहाणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या वजनरहीत अवस्थेला त्यांचे शरीर कसा प्रतिसाद देईल हे अभ्यासण्यासाठी व्योममित्रची मदत होईल. व्योममित्र अशा सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात प्रयोग करण्यासाठी वापरले जाऊ शकेल.
- अंतराळातील विकिरणांचा (रॅडिएशन्स) मानवी शरीरावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी व्योममित्रची मदत होईल.
- व्योममित्र अंतराळ प्रवासाचा मानवावरील परिणाम याविषयी डेटा देऊ शकते, ज्यामुळे भविष्यातील मानवयुक्त अंतराळ मोहिमांची सुरक्षा सुधारण्यास मदत होईल.
- व्योममित्र रोबोट जलद सूचना, सिग्नल पाठवण्याची क्षमतेसाठी विकसित केला आहे.
- व्योममित्रला कार्यक्षम पाय दिलेले नाहीत. पण तो सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात तरंगू शकतो,
- व्योममित्र अंतराळवीरांशी हिंदी आणि इंग्रजीमध्ये संवाद साधू शकतो. कारण व्योममित्रच्या भाषिक क्षमता हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा समजून घेण्यासाठी आणि प्रतिसाद देण्यासाठी प्रोग्राम केल्या गेल्या आहेत. त्यामुळे व्योममित्रची भूमिका केवळ तांत्रिक कार्यांपलीकडे आहे. अंतराळवीरांना भावनिक आधार देण्यासाठी, परस्परसंवादी सोबती म्हणून काम करण्यासाठी आणि अंतराळ प्रवासाच्या तणावपूर्ण आणि गंभीर टप्प्यांमध्ये मार्गदर्शन प्रदान करण्यासाठी व्योममित्रचे डिझाइन केले आहे.
- ते मानवी कृतींचे अनुकरण करू शकते, जसे श्वास घेणे, हालचाल करणे इत्यादी. त्यामुळे अंतराळयान मानवाला सामावून घेण्यासाठी सुयोग्य आहे की नाही हे निश्चित करण्यास व्योममित्रची मदत होईल.
- ते व्यक्ती ओळखू शकते आणि चौकशीला प्रतिसाद देऊ शकते.
- व्योमामित्र अंतराळयानाच्या विविध पॅरामीटर्सचे निरीक्षण करू शकते, जसे की तापमान, दाब आणि ऑक्सिजन पातळी. त्यामुळे अंतराळवीरांची सुरक्षा सुनिश्चित होण्यास मदत होईल
- व्योममित्र पर्यावरण नियंत्रण आणि लाइफ सपोर्ट सिस्टीम, स्विच पॅनल ऑपरेशन्स हाताळणे आणि पर्यावरणीय हवेच्या दाबामधील बदलांबाबत इशारा देण्याशी संबंधित कार्ये करू शकते. केबिनमधील पर्यावरणीय बदलांना स्वायत्तपणे ओळखण्यास ते सक्षम आहे.
- ते एअर कंडिशनिंग समायोजित करू शकते.
- नेमून दिलेली कार्ये व्योममित्र अचूकपणे पार पाडू शकते.
- आयआयएसयूने व्योममित्र मध्ये संगणक “मेंदू” समाविष्ट केला आहे. त्यामुळे ते मानवरहित चाचणी उड्डाणांदरम्यान नियंत्रण पॅनेलचा अर्थ लावू शकते. ते ग्राउंड स्टेशन कमांड्स ओळखू शकते. त्यामुळे अंतराळवीराना इस्रोच्या ग्राउंड स्टेशनशी प्रभावीपणे संवाद साधण्यास व्योममित्रची मदत होऊ शकेल. तसेच मिशनच्या योग्य अंमलबजावणीसाठी उपयुक्त माहितीचा अहवालही व्योममित्र देईल
- व्योममित्र रोबोट सुरक्षित आणि नियंत्रित वातावरणात मानवयुक्त मोहिमेसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रणाली आणि प्रक्रियांची चाचणी करण्यात सक्षम आहे.
आता हे सर्व वाचल्यानंतरही एक प्रश्न तुमच्या मनात नक्कीच अनुत्तरित राहिला असेल की या अशा खर्चिक मोहीमा कशासाठी आखायच्या? भारतासारख्या देशात, जिथे अनेक मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे तिथे या अशा मोहीमांची खरच गरज आहे का?
गगनयान मोहीम कशासाठी? (Gaganyan mission)
- भारताची अंतरिक्षात मानव पाठवण्याची क्षमता या मोहिमेमुळे जगापुढे येईल.
- या मोहिमेमुळे भारताचे अंतराळ स्थानक स्थापनेचे स्वप्न साकार करण्यास निश्चितच मोठी चालना मिळेल.
- सर्वच देशांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक बांधणे शक्य होत नाही. त्यामुळे भविष्यात इतर देशांसाठी असे अंतराळ स्थानक विकसित करण्यासाठी भारत मोलाचा वाटा उचलु शकेल.
- गगनयानाच्या उड्डाण प्रक्रियेत पाचशे हून अधिक कंपन्या सहभागी झाल्या आहेत. यात अनेक संशोधन संस्था सुद्धा आहेत. भारताला स्पर्धात्मक अंतरीक्ष मार्केट बनवण्यासाठी हे क्षेत्र खाजगी कंपन्यांना खुले केले गेले आहे.
- या मोहिमेमुळे भारताची राष्ट्रीय प्रतिष्ठा तर वाढेलच पण भारतातील विज्ञान तसेच तंत्रज्ञानाची क्षमता वाढवण्यास सुद्धा मदत होईल.
- यामुळे संशोधनाला चालना मिळेल तसेच नवनवीन संकल्पनांच्या निर्मितीस हातभार लागेल. परिणामस्वरूपी, टेलीकम्युनिकेशन, हवामान अंदाज, शेती, आपत्कालीन व्यवस्थापन इत्यादी अनेक क्षेत्रांत प्रगती साधता येईल.
- अशा मोहिमा तरुणांसाठी प्रेरणादायी असतात. भारतातील कुशल मनुष्यबळ जगापुढे आल्याने भारताच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल.
- इतर प्रगत देशांशी विविध क्षेत्रात सहयोगाच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील. त्यामुळे रोजगार तसेच महसूल निर्मिती होईल.
- आंतरराष्ट्रीय संबंध दृढ करण्यासाठी या मोहिमेमुळे गती मिळेल.
त्यामुळे आत्ता या मोहिमा खर्चिक वाटत असल्या तरी दूरवरील भविष्याचा विचार करता त्या महत्त्वाच्या आहेत.
गगनयान मोहीम (Gaganyan mission) हा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्यातील व्योममित्र (ISRO’S lady VYOMA MITRA) हे एक महत्त्वपूर्ण मिशन आहे जे गगनयान मोहिमेच्या यशास मदत करेल. निश्चितच, या मोहिमेमुळे भारताच्या विविध आगामी अंतराळ मोहिमांसाठी मार्ग मोकळा होईल.
तुम्हाला गगनयान मोहीम (Gaganyan mission) आणि व्योममित्र रोबोट (Vyom Mitra information in Marathi) बद्दलची ही माहिती कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा.
धन्यवाद !
क्षितिजा कापरे
Very good article , quite informative, great writeup
धन्यवाद
खूप छान माहिती, मला vyomamitra याबद्दल काहीच माहिती नव्हती वाचताना जे जे प्रश्न पडत होते त्याचे उत्तर पुढे याच लेखात येत गेले.
धन्यवाद
सर्व भारतीयांना या विषयाची माहिती सोप्या भाषेत करून देणारा लेख. गगनयान मोहिम आणि व्योम मित्र प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटावा अशी कामगिरी असेल…
नक्कीच! धन्यवाद.