कचरा एक जबाबदारी – छोट्या बदलांनी करा कचरा व्यवस्थापन (Responsibility towards Waste Management)

WhatsApp Group Join Now

            स्वच्छता म्हटली की आवर्जून उल्लेख करावा तो संत गाडगेबाबांचा. अत्यंत साधे राहणीमान असलेले गाडगेबाबा ज्या गावी जात तिथे स्वच्छतेचा प्रसार करत. कीर्तनासाठी गेले असले तरी आधी हाती झाडू. घेऊन स्वतः ते पूर्ण गाव झाडून स्वच्छ करून मगच कीर्तन करत. असे संत गाडगेबाबा यांनी स्वच्छ भारत अभियानास सुरुवात केली होती. कालांतराने शासनाने २०००-२००१ पासून गावागावात ‘ संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान ‘ राबवायला सुरू केले. अशा ह्या थोर संताचा आदर्श घेऊन आपणही स्वच्छ्ता मोहिमेत सहभागी होऊ शकतो.

           आज भारतात दररोज सुमारे ६० दशलक्ष टनाहूनही जास्ती एवढा कचरा निर्माण होतो त्यातील ७५% कचरा म्हणजे ४५ दशलक्ष टन कचरा उपचार न करता लँडफिलमध्ये टाकला जातो. फक्त दिल्ली आणि मुंबई मध्ये निर्माण होणारा कचरा सुमारे 10 दशलक्ष टन एवढा आहे. ही चिंताजनक बाब तर आहेच शिवाय ह्यावर वेळीच नियंत्रण ठेवले नाही तर ही स्थिती आणखी बिकट होऊ शकते. कारण वाढती लोकसंख्या आणि आपण मानवाने निर्माण केलेल्या आपल्या विकासाच्या प्रकल्पांमुळे, दैनंदिन, सामाजिक गोष्टींमुळे मोकळी जमीन कचऱ्यासाठी वापरणं हे खूप कठीण होईल. सध्या ह्यावर चालू असलेले काम, प्रकल्प तर कायम चालू राहतीलच. ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहेच आणि त्यावर ठोस उपाय झालेच पाहिजे.

  • कचऱ्याचे वर्गीकरण – हल्ली गाव असो वा शहर सगळीकडेच कचऱ्याचे विभाजन होताना पाहायला मिळते. कचरा गोळा करणाऱ्या गाड्याही ओला कचरा, सुका कचरा (Wet waste, Dry Waste) असे विभाजन करून कचरा गोळा करताना दिसतात. सार्वजनिक ठिकाणी जसे – रेल्वेस्थानक, बसस्थानक, रस्त्यांवर, असलेल्या कचरा कुंड्याही वेगवेगळ्या असतात. अनेक गृहसंस्थाही असे वर्गीकरण करतात. तरी हे प्रमाण हवे तसे अजूनही वाढलेले नाही.  बऱ्याच ठिकाणी कचरा गोळा करायला येणारे सगळा कचरा एकत्रच नेतात. आजही कचऱ्याचे विभाजन घरात होण्याचे प्रमाण कमीच आहे. ज्या गृहसंस्थांमध्ये अशाप्रकारे वेगवेगळा कचरा गोळा केला जातो आणि व्यवस्थित पुढे पाठवला जातो; त्यांचा आदर्श ठेवून फक्त गाव, शहरच नाही तर संपूर्ण देशात असे काम होणे गरजेेचे आहे. आणि त्यासाठी प्रत्येकाने आपल्या कॉलनीमध्ये, संस्थांमध्ये अशाप्रकारचे वर्गीकरण करण्यास सुरुवात करायला हवे.
  • माझा कचरा, माझी जबाबदारी – संबंधित परिस्थिती लक्षात घेता ह्या वाढणाऱ्या कचऱ्यावर  उपाय करणं ही फक्त संबंधित अधिकाऱ्यांची किंवा सरकारी प्रकल्पांचीच जबाबदारी नाही; तर समाजातील प्रत्येकानेच ह्यासाठी जमेल तेवढे कार्य केले पाहिजे. एवढेच नाही पुढाकार घ्यायला हवा होता किंवा जर कोणी असे कार्य करत असेल तर त्यात सहभागी नक्कीच होऊ शकतो. प्रत्येक माणूस हा समाजाचा, देशाचा नागरिक असतो आणि म्हणूनच ह्या वाढत्या कचाऱ्यासाठी प्रत्येक जण हा तेवढाच जबाबदार असतो. तेव्हा ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ हे धोरण अंगिकारून प्रत्येकाने ही समस्या सोडवायला आपले योगदान दिले पाहिजे. खूप काही नाही केले तरी छोट्या छोट्या साध्या गोष्टी आपण आपल्या नेहमीच्या कामांसोबत नक्कीच करू शकतो.
  • काय करता येईल?
  • आजच्या काळात स्वच्छतेसाठी अनेक मोहिमा वेगवेगळ्या समूहाकडून, सरकारकडून राबविल्या जात असतातच. त्यात आपला सहभाग असावा. (Waste Management Program)
  •  फक्त अशा मोहिमांमध्येच नाही तर आपल्या घरात आपण ह्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी नक्कीच करू शकतो. सर्वात जास्ती कचरा होतो तो म्हणजे ‘प्लास्टिकचा’. ह्याच प्लास्टिकचा आपण शक्य तेवढा वापर ठरवून कमी करणं ही काळाची गरज आहे. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपण आपल्या मित्रांना आणि कुटुंबियांना प्रोत्साहित केले पाहिजे.
  • भाज्या, फळे किंवा सामान आणण्यासाठी घरून कापडी पिशवी न्यायची सवय केली पाहिजे किंवा आत्तापर्यंत घरी  जमलेल्या पिशव्या आपण सामान आणण्यासाठी नेऊ शकतो. कुठलीही पिशवी एकदा वापरल्या वर कचऱ्यात फेकून देऊ नये. कुठलेही सामान विकत घेतले की दुकानदार जरी पिशवी देत असेल तरी त्याचाकडून पिशवी घ्यायची नाही ही आपली जबाबदारी आहे. आणि विक्रेत्यांनीही प्लास्टिक पिशव्या देणं बंद केलं तर ह्याचा जास्ती प्रभावात्मक फरक जाणवेल. (Say No to Plastic Bag)
  • आपल्या घरात कुणीही कुठेही कचरा फेकत नाही ना? का? तर घर स्वच्छ रहावं. मग हाच विचार समाजात वावरताना केला जात नाही आणि कचऱ्याचे साम्राज्य जिथे तिथे वाढताना दिसते. उदा. रस्त्यात, ट्रेन किंवा बस मधून प्रवास करताना बरेच जण काही खाऊ खाल्ला तर  त्या पदार्थाचे,चॉकलेट आदीचे पाकीट, प्लास्टिक किंवा टेट्रा पॅक (Tetra Pack) असा कचरा ट्रेन मध्येच किंवा खिडकीतून अगदी सहजपणे बाहेर फेकताना दिसतात. हे सर्वांनी बंद करायला हवे. आपल्याजवळ असलेल्या पिशवी मध्ये अगदीच पिशवी नसेल तर हातात तो कचरा पकडून ठेवून स्थानकात उतरल्यावर कचरा कुंडीत टाकता येऊ शकतो. किंवा घरी पोहोचल्यावर कचरा कुंडीत टाकू शकतो. तसेच, कित्येक दुकानदार आपल्या दुकानात होणारा कचरा दुकानाबाहेर रस्त्यावर किंवा जवळच्या गटारात फेकतात. त्याने नाल्यापर्यंत जाणारे पाणी अडते आणि पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढते. कित्येक दुकानदार वस्तू विकताना त्या वस्तू भोवती असलेलं आवरण तसेच बाहेर फेकून देतात. ह्या सर्व गोष्टी थांबल्या पाहिजे. 
  • ह्यासाठी देशभरात वारंवार जनजागृती होणे ही गरजेचे आहे. आपण आपल्या मित्र परिवाराला, परिसरातील लोकांना , सर्व  दुकानदारांना, भाजी / फळ विक्रेत्यांना हे मुद्दे पटवून दिले पाहिजे.    होणारी ही चूक वेळीच लक्षात आणून दिली पाहिजे. असे वेगळे उपक्रम वेळोवेळी आणि सक्रियपणे राबवणे गरजेचे आहे. 
  • लग्न, वाढदिवस अशा कुठल्याही समारंभात, व्यावसायिक कार्यक्रमात किंवा परिषदांमध्ये हल्ली पाण्यासाठी प्लास्टिकच्या छोट्या बाटल्या किंवा कप (Plastic Cup) ठेवलेले असतात. ह्यावर ठोस उपाय म्हणून काही वेगळी व्यवस्था केली गेली पाहिजे. जेणेकरून हा कचराही आटोक्यात आणता येईल. एका अर्थी पाण्याचा होणारा अपव्ययही (Water wasting) टाळता येईल. 
  • गडकिल्ले आणि प्रसिद्ध ठिकाणीही लोक बाटल्या, कचरा कसाही फेकतात. आपण ज्या ठिकाणी फिरायला आलो त्याचं पावित्र्य आणि सौंदर्य जपणे ही प्रत्येक मानवाची जबाबदारी आहे. ट्रेकर्स असो वा भटकंतीसाठी गेलेले कुणीही ही जबाबदारी घेऊ शकतात. कित्येक ट्रेकर्स आणि संस्था (Trekkers) गड किल्ले स्वच्छ ठेवण्याचे कार्य करतात ही उल्लेखनीय गोष्ट आहे. गडावरून खाली येताना लोकांनी फेकलेला कचरा गोळा करतात.  अशी जाणीव प्रत्येकाला असायलाच हवी आणि सर्वांनीच अशा प्रकारची जबाबदारी घ्यायला हवी. 
  • पॅकेजिंग साहित्य (Packaging Material) म्हणून वापरल्या जाणारे प्लास्टिक हाही बदलत्या काळात वाढणारा अधिकचा कचरा आहे. ऑनलाईन खरेदीमुळे अशा प्लास्टिकच्या पाकिटांचा कचरा खूप होतो. त्यासाठी पर्याय आवर्जून वापरले गेले पाहिजे. (Packaging Industry) हल्ली पॅकिंगचे नवनवीन, छान आणि वेगळे प्रकार बाजारात उपलब्ध आहे. पण त्यामुळे वाढणाऱ्या ह्या जास्तीच्या कचऱ्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. छोट्या वस्तूंना असलेलं प्लास्टिकचं आच्छादन जसे – पेन, खोडरबर इत्यादी ला असलेल्या प्लास्टिकच्या आच्छादनाचे कचऱ्यात विघटन होत नाही. आणि कित्येकदा ते प्राण्यांच्या आणि समुद्रात गेले तर माश्यांच्या तोंडात जाऊन त्यांना त्याचा त्रास होतो. तेव्हा जे खरोखर गरजेचं नाही अशा पद्धतीचे. पॅकिंग नाही बनवले आणि काही पर्यावरणपूरक (Environment Friendly) वेगळे पर्याय वापरले गेले तर ह्याचा सर्वांनाच फायदा होईल. 
  • कित्येकदा लहान मुलं घरात आणि बाहेर खेळायला गेले की, फिरायला गेल्यावर खाऊची पाकिटे कुठेही फेकून देतात. तेव्हा लहान मुलांना स्वच्छतेचं महत्व पटवून दिलं गलं पाहिजे. कचरा हा कचरा कुंडीतच त्याचसोबत ओला कचरा, सुका कचरा वेगळा टाकण्याची सवय पालकांनी वेळोवेळी लावली पाहिजे. त्यांच्यासोबत असताना ट्रेन आणि बस मधून कचरा फेकणे बंद केले तर मुलंही तसं करणार नाही.
  •  कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प प्रत्येक गृहसंस्थांमध्येही राबविले जायला हवेत. 2016 मध्ये सरकारच्या आकडेवारीनुसार 1.5 लाख टन प्रतिवर्षी कचऱ्याचे कंपोस्ट रूपांतरण 13.13 लाख टन प्रतिवर्ष झाले आहे. कंपोस्टिंगमुळे घरातील कचरा निर्मिती 30 टक्क्यांनी कमी होऊ शकते. कंपोस्टिंग वनस्पतींच्या वाढीसाठी देखील फायदेशीर आहे कारण ते त्यांना अनेक आवश्यक पोषक प्रदान करते आणि ते खत म्हणून देखील वापरले जाऊ शकते. असे मानले जाते की 4 जणांच्या कुटुंबाने पृथक्करण आणि कंपोस्टिंगचा अवलंब केल्यास त्यांचा कचरा दरवर्षी 1000 किलो वरून 100 किलोपेक्षा कमी होऊ शकतो. 
  • आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात  ई – वेस्टची  (E-Waste/ Electronic Waste) समस्याही दिवसेंदिवस वाढत आहे. तो कचरा ही इतर काचाऱ्यांसोबत टाकू नये. त्याचे वर्गी करणं करून रिसायकल साठी पाठवला गेला पाहिजे. 
  •   वेगवेगळ्या प्रकारचा कचरा लक्षात घेता गेल्या काही वर्षात नव्याने भर पडलेला कचरा म्हणजे मोबाईलचं कव्हर. (Mobile Cover/ Mobile Case) हे कव्हर खरोखर फाटले असेल तरच बदला. आणि योग्य त्या प्रकारे विल्हेवाट लावा. फक्त जुने झाले म्हणून नवीन घेण्यापेक्षा तेच नव्याने वापरा. आणि त्यासाठी पुढील मुद्दे नक्की वाचा. 
  • कमी वापर, पुनर्वापर आणि रिसायकल  Use 3 R method

          Reduce, Reuse, Recycle

  • कमी वापर – प्लास्टिक ही सर्वात जास्ती भेडसावणारी समस्या आहे. तेव्हा प्लास्टिक वस्तूंचा शक्य तेवढा वापर करणे , गरज नसताना प्लास्टिकच्या वस्तू विकत घेणे टाळले पाहिजे. अशा प्रकारच्या वस्तूंचा वापर कमी केल्याने पर्यावरणाचे संरक्षण तर होईलच शिवाय खर्चातही बचत होईल आणि विल्हेवाट लावण्यासाठीचा खर्च कमी करता येईल.
  • पुनर्वापर –  काही वस्तू जुन्या झाल्या म्हणून कचऱ्यात फेकून दिल्या जातात. पण त्याच वेळी त्यांचा पुनर्वापर करता येऊ शकतो. मोबाईलचे जुने कव्हर नव्याने रंगवून छान नवे वापरता येऊ शकते. म्हणजे तो कचरा आपण टाळू शकतो. बाहेरून काही खाण्याचे पदार्थ मागवले तर येणारे प्लास्टिकचे डबे , पाण्याच्या बाटल्या ह्या सर्व वस्तूंचा आपली कलात्मकता वापरून पुनर्वापर करता येतो. त्या साठी अनेक कल्पना, आणि उपयोग सांगणाऱ्या व्हिडिओ (DIY) आपल्याला यूट्यूब वर सहज पाहायला मिळतात. (Make Best Out Of Waste)
  • रिसायकल – पर्यावरण संवर्धनासाठी आपण खूप काही करत नाही. काहींना वाटतं हे सगळं फक्त सरकारने पाहिलं पाहिजे. आम्ही काय करू शकतो ? पण मी म्हणते ही फक्त त्यांचीच जबाबदारी आहे का ? प्लास्टिक कचरा इतर कचऱ्यात न टाकता रिसायकलसाठी पाठवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळे पर्यावरणाला फायदा होईल.
  • अपसायकल(Upcycle) – बद्दल तशी फार थोड्या लोकांना माहिती असली तरी आज कित्येक स्वयंसेवी संस्थाही ह्यावर कार्यरत आहे. आजही  प्लास्टिक, थर्माकॉल सारखे पर्यावरणाला हानी पोहोचवणारे घटक ज्यांचे विघटन होत नाही त्यांचा पुर्नवापर करून शक्य तेवढा कचरा वेगळा करू शकतो ज्याने समाजालाच फायदा होईल , जिथे असे काही प्रकल्प राबवले जातात तिथे आपला खारीचा सहभाग नक्कीच देऊ शकतो. ह्याबद्दल माहीती नसेल तर काही संस्था जे ह्यासाठी काम करतात त्यांच्याशी नक्कीच संपर्क करा. 5Rcycle , Recharkha ह्या आणि अशा इतरही काही गृहसंस्थाही ह्यावर सातत्याने उल्लेखनीय काम करत आहे.  त्यांच्या कार्यात आपलाही हातभार लावूया. 

अशा सोप्या उपायांची सवय प्रत्येकाने लावली तर ह्या समस्येवर मिळून नियंत्रण आणता येऊ शकतो. कचरा व्यवस्थापनासाठी  (Waste Management) तुम्ही काय काय करता हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहतो आहे. आपल्या मित्र परिवाराला हा लेख नक्की पाठवा. अशा अनेकविध विषयांवर सविस्तर माहितीपर लेखांसाठी, बातम्यांसाठी, नवनवीन कथांसाठी आपल्या ‘लेखकमित्र’ वेबसाईटला नेहमी नक्की भेट द्या.

वाचक मित्रहो, खूप खूप धन्यवाद.  

2 thoughts on “कचरा एक जबाबदारी – छोट्या बदलांनी करा कचरा व्यवस्थापन (Responsibility towards Waste Management)”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top