ब्लॉकचेन तंत्रज्ञान- डेटा सुरक्षिततेचे आश्वासक भविष्य.

WhatsApp Group Join Now

सन २०२२ च्या शेवटी भारताच्या केंद्रीय अर्थमंत्र्यांनी रिज़र्व बॅंकेतर्फे जारी केल्या जाणाऱ्या डिजिटल रूपीची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी म्हटले की हा डिजिटल रूपी ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारीत असेल. अनेक जणांनी ब्लॉकचेन हा शब्द त्यावेळी पहिल्यांदा ऐकला असेल. परंतु ज्यांनी बिटकॉइन संबंधीचे व्यवहार केले असतील किंवा किमान त्याबद्दल वाचले असेल त्यांना हा शब्द नवीन नाही. कारण बिटकॉइनही याच ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारीत आहे. काय आहे हे ब्लॉकचेन तंत्रज्ञान? ते कुठे आणि कशासाठी वापरले जाते? ते इतके लोकप्रिय का आहे? आजच्या लेखात आपण हे सर्व जाणून घेणार आहोत.

या लेखात आपण

१) ब्लॉकचेन तंत्रज्ञान म्हणजे काय?

२) ते कसे काम करते?

३) त्याच्या लोकप्रियतेची कारणे

४) ब्लॉकचेनचा इतिहास

५) त्याचे भविष्य

इत्यादी गोष्टी जाणून घेऊ.

व्यवसायांचा चेहरामोहरा बदलण्याची ताकद असलेले आणि गेल्या काही वर्षात वेगाने विकसित झालेले असे हे तंत्रज्ञान आहे. 

आजकालचा जमाना डिजिटल जमाना आहे. सध्या बहुसंख्य व्यवहार हे ऑनलाइन होत आहेत. व्यवहाराच्या सुलभीकरणाच्या दृष्टीने असे व्यवहार अत्यंत उपयुक्त आहेत यात शंकाच नाही. पण अशा व्यवहारांत सुरक्षिततेचा मुद्दा फार महत्त्वाचा असतो. डिजिटल व्यवहार अत्यंत सुरक्षित ठेवण्यासाठीचे साधन म्हणून ब्लॉकचेन तंत्रज्ञान फार उपयुक्त आहे. यामध्ये व्यवहारांची माहिती अशा रीतीने साठवली जाते की तिच्यात बदल करणे, ती हॅ*क करणे, खोडणे अशक्य होईल.

  •  ब्लॉकचेन तंत्रज्ञान व्याख्या: 

ब्लॉकचेन ही एक पारदर्शक, अखंड आणि विकेंद्रित खातेवही वितरण प्रणाली आहे.

मला खात्री आहे की या व्याख्येतून तुम्हाला काहीही अर्थबोध झाला नसेल. 

चला मग समजून घेऊ या सोप्या भाषेत!

इथे पहिलाच शब्द आहे ब्लॉकचेन. या शब्दाचे दोन भाग आहेत. ब्लॉक आणि चेन. थोडक्यात, ठोकळ्यांची साखळी. येथील ठोकळा हा डिजिटल माहितीचा असतो. संगणक नेटवर्कवर माहिती साठवताना अशा छोट्या छोट्या ठोकळ्यांची साखळी करून त्यात डिजिटल माहिती साठवली जाते. जणूकाही ही एक डिजिटल खातेवहीच (लेजर) होते. ज्यात पानांच्या ऐवजी ब्लॉक म्हणजे माहितीचे ठोकळे असतात. हे ब्लॉक्स एकमेकांना ‘हॅश’च्या साहाय्याने जोडलेले असतात. हॅश म्हणजे गुंतागुंतीच्या गणिताचा एक सांकेतिक शब्द (यूनीक कोड) असतो. प्रत्येक ब्लॉकचा ‘हॅश’ वेगळा असतो. असतो. त्यामुळे दोन वेगवेगळ्या ब्लॉकची ओळख पटवण्यासाठी प्रणालीला मदत होते. 

ज्याप्रमाणे आपण पारंपरिक पद्धतीने भौतिक चलन वापरून व्यवहार करतो तेव्हा त्याची नोंद एखाद्या खातेवहीमध्ये (लेजर) ठेवतो, त्याप्रमाणे ब्लॉकचेन तंत्रज्ञानात डिजिटल व्यवहारांची नोंद ही या अशा डिजिटल लेजर मध्ये ठेवली जाते. 

हे तंत्रज्ञान वापरून आपण कुठली कुठली माहिती साठवून ठेवू शकतो?:

  • ब्लॉकचेन माध्यमातून आपण  होणाऱ्या व्यवहारांची माहिती- ज्यात वेळ, तारीख, रक्कम इत्यादी गोष्टींचा समावेश असतो- साठवून ठेवू शकतो. तसेच कागदपत्रे (दस्तावेज), चित्रे आणि ओळख याही गोष्टी आपण साठवून ठेवू शकतो. उदाहरणार्थ आपण जर एखादी वस्तू खरेदी केली तर त्या कंपनीची माहिती, वस्तूची माहिती, विविध प्रमाणपत्रे, डिस्ट्रिब्युटर व रिटेलरची माहिती तसेच ग्राहकाची माहिती इत्यादी सर्व माहिती ब्लॉकचेन तंत्रज्ञानात नोंदवली जाते.
  • ब्लॉकचेन व्यवहारात कोण भाग घेत आहे त्याची माहिती सुद्धा यात साठवली जाते. परंतु आपले खरे नाव वापरण्याऐवजी इथे तुम्हाला एक डिजिटल किल्ली तुमचे नाव (यूजरनेम) म्हणून दिली जाते. ब्लॉकचेनमधे हेच युजरनेम साठवले जाते. प्रत्येक वापरकर्त्याला दिले गेलेले युजरनेम हे एकमेव असते. (कोणत्याही दोन वापरकर्त्याना एकाच नाव दिले जात नाही).

ज्याप्रमाणे पारंपरिक पद्धतीत प्रत्येक व्यवहाराची  सत्यता पडताळून पाहिली जाते व त्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते, त्याच प्रमाणे येथेही प्रत्येक ब्लॉकची पडताळणी केली जाते. इथे एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. नेटवर्क मधील कोणीही कधीही ब्लॉक तयार करून साठवू शकत नाही. तर ब्लॉकचेनवर असलेले इतर लोक तुमची माहिती सत्यापित (व्हॅलिडेट) करतात. जर सगळे काही ठीक असेल तर तुम्हाला हिरवा कंदील दिला जातो व मगच तुम्ही तुमचा ब्लॉक साठवू शकता. हा ब्लॉक लेजर मधे साठवला जातो. तसेच तो लेजरमधील आधीच्या ब्लॉकला जोडला जातो. यावेळी पुढच्या ब्लॉकमधे आधीच्या ब्लॉकची लिंक साठवली जाते. हे ब्लॉक्स एखाद्या विशिष्ट केंद्रीय संगणकावर न ठेवता संपूर्ण नेटवर्कवर ठेवले जातात. थोडक्यात ही माहिती एका ठिकाणी न राहता, जगभर पसरलेली असते. 

समजा तुम्ही ‘अ’ हा ब्लॉक तयार केला. त्या आधी तेथे ‘ब’ हा ब्लॉक होता. तर लेजर मधे साठवताना हा ‘अ’ ब्लॉक आधीच्या ‘ब’ ब्लॉकला जोडला जाईल. तसेच ‘अ’ ब्लॉक मधे ‘ब’  ब्लॉकची लिंक सुद्धा साठवली जाईल. या ब्लॉक्सना जोडून एक साखळी तयार होते. म्हणून या तंत्रज्ञानाला  ब्लॉकचेन असे म्हणतात. ब्लॉकचेनवरील प्रत्येक व्यवहाराची माहिती त्या साखळीत सहभागी असलेल्या प्रत्येक संगणकावरील लेजरवर त्याच वेळी (रियल टाइम) साठवली जाते. त्यामुळे असा डिजिटल व्यवहार अत्यंत पारदर्शक असतो. तसेच त्यात कोणालाही नंतर हस्तक्षेप किंवा छेडछाड करता येत नाही. कारण ही माहिती बदलण्यासाठी त्याला प्रत्येक ब्लॉकचा हॅश बदलावा लागेल. ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे. दुसरे म्हणजे ब्लॉकमध्ये असलेली माहिती ब्लॉकचेनमधील इतर लोक सत्यपित(validate) करतात. तरच तो ब्लॉक साठवता येतो. म्हणूनच डिजिटल व्यवहारांसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे अत्यंत सुरक्षित मानले जाते. या व्यवहारांची माहिती कायमस्वरूपी राहात असल्याने केलेला व्यवहाराचा मागोवा घेणे नंतर शक्य होते. या सर्वांमुळेच हे तंत्रज्ञान इतके लोकप्रिय झाले आहे. 

म्हणजे, एखाद्या व्यापाऱ्याने जर आपल्या कंपनीचे खाद्यपदार्थ  अमेरिकेत पाठवले, तर ग्राहकाला त्या व्यापाऱ्याचे नाव, मध्यस्थाचे नाव, त्यातील सामग्री, त्याचा दर्जा, ती ज्या विमानातून/जहाजातून आली त्याची माहिती, अमेरिकेतील ज्या व्यापाऱ्याने तो माल घेतला त्याची माहिती, या सर्व व्यवहाराची माहिती तसेच आर्थिक माहिती कळू शकेल. एवढेच नाही तर या साखळीत जेवढे लोक आहेत, त्या प्रत्येकाला ती माहिती कळेल. जर या माहितीत कोणी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला तर तेही सर्वांना कळेल. 

आता आपण सध्याच्या सेंट्रलाइज सिस्टिमला असलेल्या मर्यादा लक्षात घेऊ.

  • केंद्रीय प्रणालीच्या मर्यादा

या डिजिटल जगातील बहुसंख्य सॉफ्टवेअर केंद्रीय रचनेवर अवलंबून असते. ही रचना सोपी किंवा सुरक्षित आहे हे याचे कारण नसून याचे प्रमुख कारण हे आहे की प्रत्येकजण आपल्या माहितीच्या संरक्षणासाठी नियमन करणाऱ्या संस्थेवर विश्वास ठेवतो. खरे तर आपली ही दृढ धारणा असते की ही नियमन करणारी संस्था आपल्याला फसवणारच नाही. प्रत्यक्षात ते तसे असतेच असे नाही. 

उदाहरणार्थ, पारंपरिक पद्धतीत समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीला पैसे द्यायचे असतील तर तुम्ही ते बँकेमार्फत देऊ शकता. तुमच्या संपूर्ण व्यवहाराची नोंद पण बँकच ठेवते. यात तुमचं बँकेवर विश्वास असतो. पण हीच बँक त्या व्यवहारच्या माहितीमध्ये फेरफार पण घडवून आणू शकते. पण ब्लॉकचेन तंत्रज्ञानच्या व्याख्येप्रमाणे अशा कुठल्याही मध्यस्थाची व्यवहारासाठी गरज नसते. तुम्ही दुसऱ्यांशी परस्पर सहमतीने सरळ व्यवहार करू शकता. आवश्यक निकष पूर्ण झाल्यावर उर्वरित प्रक्रिया सुलभतेने आणि जलद गतीने पार पडते. 

  • केंद्रीय प्रणालीचे तोटे 
  1. आपण तिच्यावर संपूर्ण विश्वास ठेवू शकत नाही. 
  2. ती संपूर्ण सुरक्षित नाही. केंद्रीय प्रणाली हॅक करायची असेल तर फक्त तिचा मुख्य सर्व्हर हॅक कारणे पुरेसे होते. 
  3. ती गोपनीय नाही.
  4. ती वेळखाऊ आहे. त्यामुळे किंमत वाढते.
  5. तिच्यात पारदर्शकतेचा अभाव आहे.
  • ब्लॉकचेनचे फायदे:
  1. कोणही मध्यस्थाची गरज नाही. इतकेच काय व्यवहारासाठी बँकेचीही गरज नाही. 
  2. प्रत्येक व्यवहारची पडताळणी केली जाते.
  3. उच्च सुरक्षा प्रोटोकॉलचा वापर. ही प्रणाली हॅ*क करायची असेल तर तिचा प्रत्येक नोड (जोड) हॅ*क करावा लागेल. त्यासाठी नेटवर्कने किंवा क्लाउडला जोडलेले अनेक संगणक हॅ*क करावे लागतील. हे जवळजवळ अशक्य आहे. 
  4. कमी किंमत
  5. पारदर्शक नेटवर्क प्रणाली.
  6. ती अपरिवर्तनीय आणि विकेंद्रित आहे.

थोडक्यात काय, तर ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरून प्रत्येक जण आपापल्या पातळीवर सुरक्षितपणे व्यवहार करू शकेल. पण या तंत्रज्ञानाचे काही तोटे तसेच मर्यादाही आहेत.

ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे काही तोटे आणि मर्यादा:

1. स्केलेबिलिटी (व्यापकता): ब्लॉकचेन नेटवर्कचा विस्तार आणि कामाची गती मर्यादित असते. अधिक वापरामुळे नेटवर्क धीमे होऊ शकते, ज्यामुळे व्यवहार पूर्ण होण्यास जास्त वेळ लागू शकतो.

2. ऊर्जेचा खप: बिटकॉइनसारख्या काही अप्लिकेशन्समधे ब्लॉकचेनला प्रचंड प्रमाणात ऊर्जा लागते. यामुळे पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

3. गोपनीयता: ब्लॉकचेनमधील व्यवहार आणि माहिती सर्वांना उपलब्ध असतात. यामुळे गोपनीयतेसंबंधी काही प्रश्न निर्माण होऊ शकतात.

4. सुरक्षा: जरी ब्लॉकचेन तंत्रज्ञान सुरक्षित मानले जाते, तरीही हॅ*किं*ग आणि सायबर आक्रमणांचा धोका संपूर्ण नाहीसा होत नाही..

  5. कायदेशीर आणि नियामक आव्हाने: ब्लॉकचेनच्या वापरावर विविध देशांमध्ये वेगवेगळे कायदे आणि नियम आहेत. त्यामुळे अनेकदा आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकते तसेच ब्लॉकचेनच्या वापरावर मर्यादा पडतात.  

6. सहयोगिता (इंटरऑपरेबिलिटी): सध्या जगात विविध ब्लॉकचेन नेटवर्क्स वापरले जातात. त्यांच्यामध्ये  परस्पर संवाद आणि माहितीची देवाणघेवाण करणे कठीण आहे. त्यासाठी सामायिक नियमांचा अभाव आहे.

7. खर्च: ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणी, देखभाल आणि अपडेट करण्यासाठी मोठा खर्च येऊ शकतो. 

ब्लॉकचेनचा इतिहास:

ब्लॉकचेन तंत्रज्ञान केव्हा उदयाला आले माहिती आहे? अनेकांना असे वाटते की हे तंत्रज्ञान २०१८ मधे उदयाला आले. पण खरे तर ते इ.स. १९९२ मधेच उदयाला आले! स्टुअर्ट हेबर आणि स्कॉट स्टारनेटको यांनी सर्वप्रथम ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर काम करण्यास सुरुवात केली. क्रिप्टोग्राफीचे तंत्र वापरून एनक्रिप्ट केलेली ठोकळ्यांची साखळी तयार करण्याचा त्यांचा प्रयास होता. ही प्रणाली कुठल्याही छेडछाडीपासून मुक्त असावी असा त्यांचा प्रयत्न होता. सर्व व्यवहारांच्या पाऊलखुणा जपण्यासाठी त्यांनी दस्तावेज समयांकित (time stamped) करण्यास सुरुवात केली. 

त्यानंतर इ.स. २००८ मधे सातोशी नाकामोतो  नावाची व्यक्ती किंवा गट ब्लॉकचेनबाबत नवीन दृष्टी घेऊन पुढे आली. ब्लॉकचेन तंत्रज्ञान ‘बिटकॉइन’ या कूटचलनाचा (cryptocurrency) पाया होते. बिटकॉइन हे नवीन डिजिटल चलन होते. इ.स. २००९ मधे सातोशी नाकामोतो यांनी एक श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली ज्यामध्ये ब्लॉकचेन वापरून नेटवर्क कसे काम करते याबद्दल तपशीलवार माहिती दिली होती. डिजिटल व्यवहारांवरचा विश्वास कसा वाढवायचा याबद्दलही त्यात काही संकेत होते. विकासाचे हे व्यासपीठ सातोशी नाकामोतो याने जगापुढे ठेवले आणि तो अदृश्य झाला. त्यानंतर इतर विकासकांनी यावर काम करण्यास सुरुवात केली. हळूहळू हे तंत्रज्ञान सर्वांच्या नजरेत येण्यास सुरुवात झाली. २०१० मधे पहिला बिटकॉइन व्यवहार झाला. बिटकॉइनमुळेच ब्लॉकचेन तंत्रज्ञान सर्वांना माहीत झाले. पुढे हे तंत्रज्ञान विकसित होत गेले. 

ब्लॉकचेनचे भविष्य:  

आपण सध्या वापरत असलेले कागदी चलन भविष्यात वापरले जाणार नाही, तर त्याऐवजी डिजिटल चलन वापरले जाईल. त्यामुळे भविष्यात केवळ बँकाच नव्हे तर शेती, व्यवसाय, शिक्षण, उद्योग अशा सर्व क्षेत्रांत ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. (डिजिटल चलनामुळे तर पैसेच छापले जाणार नाहीत. त्यामुळे ते साठवण्यासाठी कदाचित बँकांचीही गरज भासणार नाही.) ब्लॉकचेनच्या  पारदर्शकतेमुळे काळ्या पैशालाही आळा बसू शकेल. 

ब्लॉकचेनचा इतिहास पाहून हे लक्षात येते की त्याचे भविष्यही उज्ज्वल आहे. इ.स. २०३० पर्यंत ब्लॉकचेनचे बाजारमूल्य ३.१ ट्रिलियन डॉलर इतके होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अनेक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे या दशकातील अतिशय महत्त्वाचे तंत्रज्ञान ठरणारं आहे.

ब्लॉकचेन तंत्रज्ञानाने सर्व प्रश्न सुटतील असे नाही. वर लेखात लिहिल्याप्रमाणे ब्लॉकचेनच्या स्वतःच्या काही मर्यादा आहेत. परंतु ब्लॉकचेनने केंद्रीय प्रणालीमधील काही समस्या निश्चितच सुटतील, केंद्रीय प्रणालीकडून विकेंद्रिय प्रणालीकडे जाणे म्हणजे नक्कीच एक पायरी वर चढण्यासारखे आहे. ब्लॉकचेन ही तंत्रज्ञानातील क्रांती आहे. तुम्हाला जर तुमच्या प्रणालीची गुणवत्ता वाढवायची असेल आणि आपला डेटा सुरक्षित ठेवायचा असेल तर या तंत्रज्ञानाला पर्याय नाही!

तुम्हाला ब्लॉकचेन तंत्रज्ञानाबद्दल ही माहिती कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुपही जॉईन करा.

      धन्यवाद !

1 thought on “ब्लॉकचेन तंत्रज्ञान- डेटा सुरक्षिततेचे आश्वासक भविष्य.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top