क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय आणि याचे कार्य कसे चालते?

WhatsApp Group Join Now

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय आणि याचे कार्य कसे चालते?

       क्रिप्टोकरन्सी म्हणजे नेमकं काय ?आजच्या डिजिटल युगात क्रिप्टोकरन्सी हे चलन क्रांतिकारक रूप म्हणून उदयास आले आहे. ज्यामुळे जगभरातील व्यक्ती आणि संस्थांचे लक्ष आकर्षित होऊन यामध्ये गुंतवणूक करण्याचा कल जास्त वाढला आहे. यामुळे या डिजिटल मालमत्तेत लक्षणीय वाढ झाली आहे. काय आहे क्रिप्टोकरन्सी? याची सविस्तर माहिती आपण या लेखातून खालील मुद्द्यांद्वारे जाणून घेऊ.

1] क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?

2] क्रिप्टोकरन्सीची संकल्पना कशी उदयास आली?

3] क्रिप्टोकरन्सीचे कार्य कसे चालते?

4] क्रिप्टोकरन्सीचे प्रमुख प्रकार 

5] क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक कशी करावी?

6] क्रिप्टोकरन्सीचे फायदे व तोटे

7]भारतात क्रिप्टोकरन्सी कायदेशीर आहे का?

8] क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित आहे  का?

•क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?

    ‘क्रिप्टो’ म्हणजे गुप्त आणि ‘करन्सी’ म्हणजे चलन थोडक्यात गुप्तचलन असा या क्रिप्टोकरन्सी शब्दाचा अर्थ होतो.याला आभासीचलन देखील म्हटले जाते.क्रिप्टोकरन्सी हे डिजिटल चलन आहे. हे फक्त डिजिटल स्वरूपात अस्तित्वात आहे.जसे आपण काही खरेदी करण्यासाठी नोटा किंवा नाणी यांचा वापर करतो तसे क्रिप्टोकरन्सी हे नोटा किंवा नाणी यामध्ये रूपांतरीत करता येत नाहीत.म्हणजेच आपण ते पाहू शकत नाही तसेच आपण त्याला स्पर्श किंवा त्याचा अनुभव घेऊ शकत नाही.

    हे विकेंद्रीत आहे म्हणजेच केंद्रीय प्राधिकरण किंवा बँक किंवा सरकार या चलनाचे नियमन (मध्यस्थी) करीत नाहीत. यामध्ये व्यवहार सुरक्षित होण्यासाठी आणि चलनाची एकके निर्माण करण्यासाठी सुरक्षा वैशिष्ट्ये(एनक्रीप्शन किंवा क्रिप्टोग्राफी) वापरतात.

•क्रिप्टोकरन्सीची संकल्पना कशी उदयास आली?

    2008 मध्ये अमेरिकेतील महामंदीच्या काळात ही संकल्पना विकसित झाली. या आर्थिक महासंकटाच्या सुरुवातीपासून खास करून फेडरल रिझर्व बँक आणि इतर अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपापल्या चलनाची छपाई सुरू केली.त्यामुळे चलनाचे प्रमाण विलक्षण वाढलं.साहाजिकच आपल्याकडच्या चलनाचं अवमूल्यन होऊन ते कवडीमोल ठरेल या भीतीपोटी लोकांनी सोन्याचा साठा करायला सुरुवात केली.

    साहजिकच सोनं  ठराविक प्रमाणात उपलब्ध असल्याने एक पर्याय म्हणून आणि दुसरी गोष्ट अशी की,बँक किंवा सरकारवर अवलंबून न राहता लोकांना आर्थिक व्यवहार सुलभरित्या हस्तांतरित करता यावेत या उद्देशाने बिटकॉइन या सर्वात पहिल्या क्रिप्टोकरन्सीची निर्मिती झाली.

•क्रिप्टोकरन्सीचे कार्य कसे चालते?

     क्रिप्टोकरन्सी हे डिजिटल चलन असल्यामुळे बँक किंवा वित्तीय संस्थेला व्यवहारांची पडताळणी करण्याची आवश्यकता नसते आणि त्याचा वापर खरेदीसाठी किंवा गुंतवणूक म्हणून केला जाऊ शकतो.

     क्रिप्टोकरन्सीचे काम करण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरले जाते. ब्लॉकचेन म्हणजे एक डिजिटल खाते पद्धती असून, ज्यामध्ये सर्व व्यवहार नोंदवले जातात.क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार करण्यासाठी कंप्यूटर किंवा स्मार्टफोन वापरले जातात.या व्यवहाराची नोंद ब्लॉकचेन वर केली जाते आणि त्यासाठी एक युनिक कोड वापरला जातो.

•क्रिप्टोकरन्सीचे प्रमुख प्रकार 

सध्या मार्केटमध्ये हजारो पेक्षा जास्त क्रिप्टोकरन्सी उपलब्ध आहेत. हि विविध डिजिटल चलने वेगवेगळ्या गरजा पूर्ण करतात. येथे आपण काही प्रमुख क्रिप्टोकरन्सी चे प्रकार पाहू.

1)बिटकॉइन( BTC ):- 2009 मध्ये सातोशी नाकामोटो या टोपण नावाने कार्यरत असलेल्या एका व्यक्तीने किंवा एखाद्या गटसमुहाने पहिली क्रिप्टोकरन्सी म्हणजे बिटकॉइनची निर्मिती केली. आज जगात बिटकॉइन हि अत्यंत लोकप्रिय आणि मौल्यवान क्रिप्टोकरन्सी बनली आहे.

बिटकॉइनच्या विकेंद्रीत आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित व्यवहार सत्यापन आणि सार्वजनिक खातेवही प्रणालीने डिजिटल सुरक्षिततेच्या जगात क्रांती घडवून आणली आहे. काहीजण बिटकॉइनला सोन्याच्या डिजिटल स्वरूपाची उपमा देतात. बिटकॉइन च्या मूल्यांमध्ये कमालीची अस्थिरता आढळते. 2013 च्या सुरुवातीस बिटकॉइनचे मूल्य फक्त 12 डॉलर्स होतं आणि 2013 च्या अखेरीस एका बिटकॉइनच मूल्य थेट 1242 अमेरिकी डॉलर्सवर जाऊन पोहोचलं. 

2022 मध्ये जोरदार घसरण होण्यापूर्वी नोव्हेंबर 2021 मध्ये बिटकॉइनचा पूर्वीचा सर्वकालीन उच्चांक $ 68,700 पेक्षा जास्त होता, तर मार्च 2024 मध्ये बिटकॉइनने $73,700 पेक्षा अधिक नवीन सर्वकालीन उच्चांक गाठला.

2) इथेरियम( ETH ):- बिटकॉइन नंतर इथेरियम ही जगातील दुसरी सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी आहे.नेटवर्कच्या मूळ क्रिप्टो करन्सीला इथर म्हणतात. 2015 मध्ये विटालिक बुटेरीन आणि गविन वूड यांनी इथेरियमची स्थापना केली. इथेरियम हे ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर बनवलेले विकेंद्रीत संगणकीय नेटवर्क आहे. आज इथेरियमचे बाजार भांडवल $1.1 ट्रिलियन जागतिक क्रिप्टो मार्केटच्या अंदाजे 20% प्रतिनिधीत्व करते.

3) टिथर (USDT) :- हे स्टेबलकॉइन म्हणून ओळखले जाते. ही क्रिप्टो करन्सी जी नेहमी स्थिर किंमत प्रदान करण्यासाठी डिझाईन केलेली आहे. टिथरचा वापर लाखो ब्लॉकचेन वापरकर्ते दररोज विविध ब्लॉकचेन नेटवर्कवर व्यापार,बचाव आणि व्यवहार करण्यासाठी करतात. जेथे इतर क्रिप्टोकरन्सीच्या किमती मध्ये अस्थिरता दिसून येते,याउलट टिथर त्याचे मूल्य कायम स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करते. 27 मार्च 2024 पर्यंत टिथर $1.00 वर व्यापार करीत होता आणि त्याचे बाजार भांडवल $104.37 अब्ज आहे.

•क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक कशी करावी?

   क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी ऑनलाइन 100 पेक्षा जास्त ब्रोकर आणि एक्सचेंजेस उपलब्ध आहेत. खालील काही पायऱ्यानुसार तुम्हाला गुंतवणूक प्रक्रिया पूर्ण करता येईल.

1) तुमची गुंतवणूक सुलभ करण्यासाठी एक प्रतिष्ठित क्रिप्टो करन्सी एक्सचेंजची निवड करा.

2) तुमचा ईमेल देऊन, पासवर्ड तयार करून आणि आवश्यक पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून निवडलेल्या एक्सचेंजवर साइन अप करा.

3) बँक ट्रान्सफर, क्रेडिट/डेबिट कार्ड किंवा दुसऱ्या वॉलेट मधून क्रिप्टोकरन्सी ट्रान्सफर यासारख्या पेमेंट पद्धतीचा वापर करून तुमच्या एक्सचेंज खात्यात पैसे जमा करा.

4) निधी जमा झाल्यानंतर तुम्हाला कोणती क्रिप्टोकरन्सी खरेदी करावयाची आहे ते ठरवा.विशिष्ट क्रिप्टोकरन्सीची मूलभूत तत्वे, वापर प्रकरणे आणि वाढीच्या संभाव्यतेचे संशोधन करा आणि समजून घ्या.

5) मार्केट ऑर्डर आणि मर्यादा ऑर्डर साधारणपणे अशा दोन प्रकारच्या ऑर्डर असतात. तुमच्या आवडीनुसार ऑर्डर प्रकार निवडा.

6) खरेदी पूर्ण झाल्यानंतर सुरक्षितता म्हणून तुमची क्रिप्टो करन्सी सुरक्षित डिजिटल वॉलेट मध्ये हस्तांतरित करण्याचा विचार करा. 

7) क्रिप्टोकरन्सीच्या किमती अत्यंत अस्थिर असल्यामुळे मार्केटमधील ताज्या बातम्या आणि घडामोडींसह स्वतःला अपडेट ठेवा यामुळे तुम्हाला गुंतवणुकीचे चांगले निर्णय घेण्यास मदत होईल.

•क्रिप्टोकरन्सीचे फायदे:-

1)कोणत्याही केंद्रीय प्राधिकरणापासून मुक्त असल्याने क्रिप्टो जगभरात इंटरनेट कनेक्शनसह संगणकाच्या पीअर-टू-पीअर नेटवर्क वर कार्य करतात. 

2)ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे यामध्ये पारदर्शकता आणि सुरक्षा निश्चित होते ज्यामुळे कोणीही व्यवहार नोंदीमध्ये फेरफार करू शकत नाही. 

3)क्रिप्टोकरन्सीमधील व्यवहार आंतरराष्ट्रीय असो वा देशांतर्गत,ते अगदी जलद असतात. 

4)इतर ऑनलाईन व्यवहारांच्या तुलनेत हा स्वस्त पर्याय आहे.

5)निधी हस्तांतरण प्रक्रिया कमीत कमी शुल्कासह पूर्ण केले       जाते.

•क्रिप्टोकरन्सीचे तोटे:-

1) क्रिप्टोकरन्सी बाजारपेठ अत्यंत अस्थिर असल्याने शिवाय किमती मधील चढ-उतार यामुळे गुंतवणूक करणे जोखमीचे असू शकते.

2) क्रिप्टोकरन्सीच्या वापरावर काही देशांमध्ये कायदेशीर बंधने आहेत.

3) क्रिप्टोकरन्सी वर नियमन कमी असल्यामुळे ते अनियंत्रित किंवा अनिश्चित असू शकते.

4) याचे व्यवहार ब्लॉकचेन-तंत्रज्ञानावर आधारित असल्याने क्रिप्टोचा उच्च उर्जा उपयोग समस्या निर्माण करणारा आहे.

•भारतात क्रिप्टोकरन्सी कायदेशीर आहे का?

     क्रिप्टोकरन्सी खरेदी आणि विक्री करण्यासाठी निर्बंध आणणारा कोणताही कायदा भारतात लागू नाही. मार्च 2020 पर्यंत RBI ने यावर निर्बंध घातले परंतु,सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध मागे घेतल्यावर आणि क्रिप्टोकरन्सीशी व्यवहार करणे बेकायदेशीर नसल्याचे जाहीर केल्यावर, देशातील लोकांसाठी क्रिप्टोकरन्सी हे गुंतवणुकीचे पसंतीचे माध्यम बनले आहे.

 •क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित आहे का?

     साधारणपणे क्रिप्टोकरन्सीचे मूल्य अस्थिर असल्याने यामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार पहायला मिळतो. यामुळे क्रिप्टोकरन्सीची गुंतवणूक काही वेळा धोकादायक असू शकते. तसे पाहता सर्व प्रकारच्या गुंतवणुकीत काही प्रमाणात जोखीम असते. ही जोखीम टाळण्यासाठी गुंतवणूकदाराने नेहमी सखोल संशोधन करण्याची गरज आहे.विशेषतः जेव्हा तुम्ही कष्टाने कमावलेले पैसे यामध्ये गुंतवण्याचा विचार करता.

वरील लेख फक्त माहितीसाठी लिहिला गेला आहे. कोणतीही गुंतवणूक करताना सखोल अभ्यास करा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या व नियमांचे पालन करा.

वरील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. तसेच आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशीच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’या वेबसाईटला नक्की भेट द्या तसेच व्हाट्सअप ग्रुप ही जॉईन करा.

                            धन्यवाद!

6 thoughts on “क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय आणि याचे कार्य कसे चालते?”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top