GI मानांकन म्हणजे काय? (What is GI tag?)

WhatsApp Group Join Now

एप्रिल महिना सुरु झाला की सगळीकडे आपण जाहिरात बघतो.. “GI मानांकित देवगड हापूस मिळेल”. पण आपण कधी विचार केलाय का की हे GI मानांकित म्हणजे नक्की काय असते?, या मानांकनाला  एवढे महत्व का आहे? याने नक्की आपल्याला हापूस आंब्या बद्दल काय समजते? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आज जाणून घेऊया की हे GI मानांकन म्हणजे नक्की काय असते ते.  

GI मानांकन म्हणजे काय? (What is GI Tag)

GI टॅग (जिऑग्राफिकल आयडेंटिफिकेशन) म्हणजेच भौगोलिक संकेत. प्रत्येक भौगोलिक प्रदेशाची एक विशिष्ठ भूरचना, हवामान आणि सांस्कृतिक वारसा असतो. त्यानुसार तिथे पदार्थ किंवा वस्तू विकसित होतात, वापरल्या जातात आणि मग त्या गोष्टी किंवा पदार्थ त्या भागाची ओळख बनतात. अशा पदार्थांना किंवा मानव निर्मित वस्तूंना त्या विशिष्ठ जागेची ओळख मिळावी म्हणून त्यांना GI मानांकन दिले जाते. हे GI मानांकन हे जगमान्य असते.  GI मानांकन हे उत्पादनांना दिलेले नाव किंवा चिन्ह अशा कुठल्याही स्वरूपात असू शकते.  GI मानांकन हे साधारणपणे विशिष्ट पेय, खाद्यपदार्थ, कृषी उत्पादने, हस्तकला यासाठी दिले जातात. हे एका प्रकारे विशिष्ट प्रक्रिया किंवा उत्पादन पेटंट करण्यासारखेच आहे. 

भारतात याची सुरवात कशी झाली? (First GI tag in India)

GI मानांकन हे २०व्या शतकात पहिल्यांदा फ्रान्स मध्ये वापरले गेले. १९९४ मध्ये WTO ने आपल्या सभासद राष्ट्रांसाठी पहिल्यांदा GI टॅग सिस्टिम TRIPS च्या अंतर्गत जरी केली. GI मानांकन हे भारतात १५ सप्टेंबर २००३ पासून वापरात येऊ लागले. हे GI मानांकन हे Registeration and Protection Act, १९९९ या कायद्यानुसार शासित केले जातात. २००४ या वर्षी “दार्जिलिंग टी”  हे GI मानांकन मिळवणारे भारतातील पहिले उत्पादन होते. 

  • GI मानांकन चे महत्व काय? (Importance of GI Tag)
  • GI मानांकन हे प्रमाणित करते की एखादे उत्पादन हे पारंपरिक पद्धतीने तयार केले गेले आहे, किंवा त्याच्या भौगोलिक स्थानामुळे त्या पदार्थात काही विशिष्ठ गुण आहेत. 
  • GI मानांकन हे त्या भागातील उत्पादनांना कायदेशीर संरक्षण मिळवून देते. 
  • GI मानांकनद्वारे स्थानिक उत्पादनांना जागतिक स्तरावर मान्यता मिळण्यास मदत होते. 
  • यामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळण्यास मदत होते आणि उत्पादन  विक्रीसाठी  त्यांना मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध होते. 

GI मानांकन मिळवण्याची  प्रक्रिया कशी असते? (How to apply for GI tag) 

  1. एखादी व्यक्ती किंवा संस्था जे एखाद्या विशिष्ट वस्तूच्या उत्पादकांचे हित जाणते, अशी व्यक्ती किंवा संस्था त्या विशिष्ट उत्पादनासाठी GI मानांकन मिळवण्यासाठी अर्ज दाखल करू शकते. GI मानांकन मिळवण्यासाठी त्यांचे रजिस्टर ऑफिस चेन्नई ला आहे तिथे अर्ज द्यावा लागतो. आपल्या उत्पादनाची वैशिष्ठये काय आहेत आणि ती कशी राखली जातात हे पुराव्यांसह सादर करणे आवश्यक असते.  
  2. नंतर परीक्षक अर्जाची छाननी करून त्यात काही कमतरता असल्यास कळवतात. अर्जदाराने एक महिन्याच्या आत त्यावर उपाय करणे आवश्यक असते. 
  3. सादर केलेल्या तपशिलांची छाननी करून मग अहवाल जरी केला जातो. 
  4. त्यावर रेजिस्टरारला काही आक्षेप असल्यास ते तसे कळवतात. त्यावर अर्जदाराने  २ महिन्याच्या आत उत्तर देणे अपेक्षित असते.  
  5. सर्व तपशील योग्य आढळून आल्यास अर्ज स्वीकारला जातो. 
  6. अर्ज स्वीकारल्यानंतर ३ महिन्याच्या आत तो GI जर्नल मध्ये प्रकाशित केला जातो. 
  7. हे मानांकन १० वर्षांपर्यतच लागू होते. १० वर्षानंतर अर्जदारांना परत अर्ज करावा लागतो. 

GI मानांकन साठी अर्ज करण्याआधी खालील गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. 

  • GI मानांकन हे  विवादास्पद किंवा बेकायदेशीर नसावे . 
  • यामध्ये कोणतेही अ*श्ली*ल साहित्य नसावे. तसेच ते कोणाच्याही भावना दुखावणारे नसावे. 
  • GI मानांकन चे नाव किंवा चिन्ह हे सरळ आणि स्पष्ट असावे.
  • भारतातील GI मानांकित उत्पादनांची यादी: (List of GI tag Products of India)

भारतात ३१ मार्च २०२४ पर्यंत ६३५ उत्पादनांना GI मानांकन मिळाले आहे. गेल्या २० वर्षात ११५८ उत्पादनांसाठी अर्ज केले गेले होते. त्यापैकी ६३५ उत्पादनांना आजपर्यंत मानांकन मिळाले आहे. 

राज्यानुसार यादी केल्यास उत्तर प्रदेश चा प्रथम क्रमांक लागतो. उत्तर प्रदेशातील ६९ उत्पादनांना GI मानांकन मिळाले आहे.  महाराष्ट्रात ३४ उत्पादनांना GI मानांकन मिळाले आहे.  त्यापैकी काही महत्वाची उत्पादने खालीलप्रमाणे आहेत. 

  1. सोलापुरी चादर: सोलापुरी चादरला २००५ मध्ये हस्तकलेतील महाराष्ट्रातील पहिले  GI मानांकन मिळाले आहे. 
  2. नाशिकची व्हॅली वाईन: नाशिकची द्राक्षे ही आधीपासूनच प्रसिद्ध आहेत. परंतु त्यापासून बनणाऱ्या वाईन ला २०१० मध्ये GI मानांकन मिळाले आहे. हे राज्यातील एकमेव उत्पादन श्रेणीतील मानांकन आहे. 
  3. कोल्हापुरी चप्पल: कोल्हापुरी चप्पल हि गेली अनेक दशके प्रसिद्ध आहे. परंतु याला GI मानांकन सध्या २०१८ मध्ये दिले गेले. छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रोत्सहानने सुरु झालेली ही परंपरा अजूनही वर्षानुवर्षे जपली जात आहे. आणि आता ही  चप्पल जगप्रसिद्ध सुद्धा झाली आहे. 
  4. पैठणी साडी: औरंगाबाद जवळील पैठण शहरातील पैठणी साडी ही सर्वांची लाडकी आहे. याला महावस्त्र असे सुद्धा म्हटले जाते. ह्या साडी ला GI मानांकन हे २०१० मध्ये हस्तकला या श्रेणी अंतर्गत मिळाले. जर ही साडी योग्य रीतीने जपून ठेवली तर ही वर्षानुवर्षे टिकते. 
  5. महाबळेश्वर स्ट्रॉबेरी: महाबळेश्वरला सर्वात रसाळ अशी स्ट्रॉबेरी मिळते. आणि यामध्ये ग्लुकोस चे प्रमाण फक्त ७% असते. यांचा लाल चुटुकदार रंग हा महाबळेश्वर मधील योग्य तापमान आणि सूर्यप्रकाश यामुळे त्यांना मिळतो. हे महाराष्ट्रातील चौथे उत्पादन आहे ज्याला GI नामांकन मिळाले आहे.  
  6. वारली चित्रकला: वारली चित्रकला ही  लोककला शैलीचा उत्तम नमुना आहे. हे मुंबई शहरातील एकमेव उत्पादन आहे ज्याला GI मानांकन मिळाले आहे. 
  7. देवगड हापूस: खूप प्रतीक्षेनंतर देवगड च्या हापूस आंब्याला २०१८ मध्ये GI मानांकन प्राप्त झाले. ५ वर्षांच्या अथक मेहनती नंतर देवगड जिल्ह्यातील शेतकरी त्यांचा आंब्याला GI मानांकन मिळवून देण्यात यशस्वी ठरले. त्यामुळे “देवगड हापूस” हा ब्रँड जगप्रसिद्ध झाला. 

GI चे तोटे:

GI मानांकनाचे अनेक फायदे आहेत. परंतु कधी कधी यामुळे वाद सुद्धा उद्भवतात. एखाद्या उत्पादनासाठी एक राज्याने अर्ज केले असता, आजूबाजूची राज्ये सुद्धा त्याच उत्पादनासाठी अर्ज देऊ शकतात. अशावेळी त्या उत्पादनाचे मूळ भौगोलिक स्थान निश्चित करणे कठीण होते. जेव्हा रसगुल्ला या पदार्थाला बंगालचा GI टॅग मिळाला तेव्हा ओडिशा रहिवाशांनी त्याच्या विरुद्ध आवाज पुकारला होता. कारण त्यांचे म्हणणे होते कि रसगुल्ला हा त्यांच्या राज्यातील पदार्थ आहे. अशा गोष्टींमुळे राज्या-राज्यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. 

तुम्हाला ही माहिती कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशा अजून कुठल्या नवीन विषयांबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हेही आम्हाला कंमेंट मध्ये जरूर कळवा. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.

      धन्यवाद !

error:
Scroll to Top