खरे तर आता यंत्रमानव (रोबोट) ही कल्पना काही नवीन राहिली नाही. अनेक ठिकाणी आणि अनेकविध कामांसाठी यंत्रमानवांचा वापर केला जात आहे. उदाहरणार्थ घरात वापरले जाणारे व्हॅक्युम क्लीनर रोबोट्स, शेतात वापरले जाणारे तण काढणारे यंत्र, उद्योगांमध्ये आपोआप कार्यान्वित होणारी यंत्रणा (ऑटोमेटेड सिस्टम), यांत्रिक हात (रोबोटिक हॅंड) इत्यादी गोष्टी आपल्या परिचयाच्या झाल्या आहेत. परंतु आता कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून मानवासारखेच दिसणारे रोबोट्स बनवले जात आहेत. त्यांना ह्युमनॉईड रोबोट्स म्हणजेच मानवी यंत्रमानव म्हणतात. ते केवळ मानवाप्रमाणे दिसतात एवढेच नाही तर मानवाप्रमाणे हालचाल करतात आणि निर्णयही घेतात.
ह्युमनॉईड रोबोट्स म्हणजे काय?
मानवाप्रमाणे दिसणाऱ्या आणि मानवी वर्तनाचे अनुकरण करणाऱ्या यंत्राला मानवी यंत्रमानव (ह्युमनॉईड रोबोट) असे म्हणतात. हे यंत्रमानव माणसाशी संवाद साधू शकतात, मानवाने दिलेल्या आज्ञांचे पालन करू शकतात तसेच नेमून दिलेली ठराविक कामेही करू शकतात. आपल्या कार्यक्षेत्रानुसार ह्युमनॉईड रोबोट्सचे वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक असे वर्गीकरण केले जाते. उदाहरणार्थ, वैद्यकीय रोबोट्स हे रुग्णाला वैद्यकीय उपचार देण्यासाठी तसेच शस्त्रक्रिया सहाय्यक (सर्जिकल असिस्टंट) म्हणून वापरले जातात. शैक्षणिक रोबोट्स हे शिक्षणक्षेत्रात शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी वापरले जातात. ते विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना नाविन्यपूर्ण पद्धतीने शिकवू शकतात. सामाजिक रोबोट्स हे व्यक्तींना किंवा संस्थांना त्यांच्या दैनंदिन कामात मदत करण्यासाठी बनवले जातात.
१८ मार्च २०२४ रोजी जगप्रसिद्ध NVIDIA या कंपनीचे सीईओ जेन्सन हाँग यांनी आपल्या कंपनीने तयार केलेली चिप GR00T लोकांपुढे आणली. त्या कार्यक्रमात त्यांनी एक मोठे विधान केले. ते म्हणाले, “भविष्यात हालचाल करणारी प्रत्येक गोष्ट यंत्रमानवीय (रोबोटिक) असेल.” त्यांच्या मते यंत्रमानवाची पुढची पिढी ही मानवसदृश्य यंत्रमानवाची असेल. ही चिप वापरून बनवलेला मानवसदृश रोबोट हा मानवाच्या नैसर्गिक भाषा ओळखणे, मानवाच्या हालचाली निरखून त्याचप्रमाणे हालचाली करण्याचा प्रयत्न करणे इत्यादी अनेक गोष्टी करु शकेल. अशा रोबोंचे त्यांनी प्रात्यक्षिकही दाखवले.
या सर्व रोबोंमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग हे तंत्रज्ञान वापरले जाते. या दोन तंत्रज्ञानांच्या संयोगाने रोबोटिक्सच्या क्षेत्रात आणि एकंदरीत संपूर्ण विश्वात क्रांती घडून येणार आहे हे निश्चित!
ह्युमनॉईड रोबोट्स स्वरूप आणि त्यातील तंत्रज्ञान:
- यंत्रमानवाच्या डोळ्यांच्या जागी कॅमेरे बसवलेले असतात. ते वापरून तो आजूबाजूच्या घटना, वस्तू ‘पाहू’ शकतो. कंप्यूटर व्हिजन हे तंत्रज्ञान वापरुन तो वस्तू आणि माणसे ओळखु शकतो.
- त्याच्या कानांच्या जागी मायक्रोफोन बसवलेले असतात. आजूबाजूचा ध्वनी ‘ऐकण्यासाठी’ त्यांचा उपयोग होतो. मानवाशी संवाद साधण्यासाठी आणि दिलेल्या आज्ञा ओळखण्यासाठी याच उपयोग होतो. यासाठी स्पीच रेकग्निशन आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग हे तंत्रज्ञान वापरले जाते.
- ह्युमनॉईड रोबोट्स मधे अनेक प्रकारचे सेन्सर्स (संवेदक) वापरलेले असतात. आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव या सेन्सर्सच्या साहाय्याने त्याला होते. उदाहरणार्थ वास घेण्यासाठी नाकाऐवजी सेन्सर्स वापरले असतात. कृत्रिम त्वचा वापरली असते जिच्या साहाय्याने रोबोटला स्पर्श, तापमान इत्यादींची जाणीव होऊ शकेल. या रोबोट्सना स्पर्शज्ञान देण्यासाठी हॅप्टीक फीडबॅक या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
- त्याच्यामध्ये हात, पाय, डोके आणि धड इत्यादी हालचाल करणारे भाग असतात.
- या यांत्रिक हालचालींसाठी लागणारी उर्जा पुरवण्याचे काम ॲक्चूएटर्स करतात. ॲक्चूएटर्स कुठल्याही ऊर्जेचे यांत्रिक उर्जेत रुपांतर करतात व त्यामुळे रोबोट्स ‘हालचाल’ करू शकतात. थोडक्यात, ॲक्चूएटर्स म्हणजे या रोबोट्सचे स्नायुच म्हणा ना!
- पूर्वी, मानवाने विकसित केलेली आज्ञावली म्हणजे या यंत्रमानवाची कृत्रिम बुद्धिमत्ता असे. त्या आज्ञावलींप्रमाणे तो फक्त नेमून दिलेले काम करीत असे.
- पण आता ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ वापरून तयार होणारे नवीन यंत्रमानवांमध्ये ‘मशीन लर्निंग’ ही संकल्पना वापरलेली असते. यात संगणक त्या जुनी माहिती आणि उपलब्ध असलेली नवीन माहिती यांची सांगड घालू शकतो व त्यानुसार आपले काम आखू शकतो. त्यामुळे असे यंत्रमानव आपल्या कामांमध्ये दिवसेंदिवस सुधारणा करू शकतात. आधुनिक रोबोंमधील सर्वात महत्त्वाची हीच गोष्ट आहे. कारण यामुळेच मानवापेक्षा प्रगत रोबोट्स बनवण्याचा स्वप्नाला मूर्त रूप देता येईल.
ह्युमनॉईड रोबोट्स मधे कृत्रिम बुद्धिमत्ता का आवश्यक आहे?
कृत्रिम बुद्धिमत्तेशिवाय तयार केलेला रोबोट केवळ त्याच्यामध्ये असलेल्या आज्ञावलींप्रमाणे विशिष्ट परिस्थितीत नेमून दिलेले कामच करू शकतो. मानवी हस्तक्षेपाशिवाय तो भिन्न परिस्थितीत काम करू शकणार नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने रोबोट्स नवीन गोष्टी शिकू शकतात तसेच स्वतंत्रपणे कामही करू शकतात. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे ह्युमनॉईडस अधिक सक्षम, कार्यक्षम आणि सुरक्षित बनतात.
कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून ह्युमनॉईड खालील गोष्टी करू शकतात-
- सभोवलतचे जग पाहणे तसेच ते समजून घेणे.
- नवीन माहिती आत्मसात करणे आणि अनुभवातून शिकणे.
- तर्क वापरून निर्णय घेणे अथवा समस्या सोडविणे.
- किचकट, गुंतागुंतीची आणि सूक्ष्म कार्ये करणे.
- मानवाशी तसेच इतर रोबोट्सशी संवाद साधणे.
ह्युमनॉईड रोबोट्स बनवण्यापुढील आव्हाने:
अनेक मोठ्या कंपन्या सध्या ह्युमनॉईड रोबोट्स बनवण्याचा कामाला लागल्या असल्या तरीही असे रोबोट्स बनवणे हे फार कठीण काम आहे. असे रोबोट्स बनवतांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते.
- हे रोबोट्स मानवी हालचाली आणि वर्तणुकीचे अनुकरण करण्यासाठी वापरले जातात. त्यांना बनवण्यासाठी वापरले जाणारे सर्व साहित्य, सेन्सर्स हे उच्च दर्जाचे असणे आवश्यक असते. त्यामुळे या रोबोट्सची किंमत खूप वाढते.
- ह्युमनॉईड रोबोट्सची रचना करणे, त्यांची बांधणी करणे, त्यांची आज्ञावली लिहिणे ही सर्व कामे अतिशय अवघड असतात.
- ह्युमनॉईड रोबोट्सची मानवसदृश हालचाल हे अजूनही एक मोठे आव्हान शास्त्रज्ञांसमोर आहे. ह्युमनॉईड रोबोटला दोन पायावर चालवणे, त्याचा तोल सांभाळणे यासाठी उच्च पातळीवरील संतुलन आणि समन्वय आवश्यक असते.
- ह्युमनॉईड रोबोट्सना काम करण्यासाठी खूप उर्जेची आवश्यकता असते. त्यामुळे जिथे खूप कमी ऊर्जा उपलब्ध आहे, अशा ठिकाणी ह्युमनॉईड रोबोट्स वापरता येत नाहीत.
- ह्युमनॉईड रोबोट हे शेवटी एक यंत्र आहे. त्यामुळे त्याची देखभाल करणे आवश्यक आहे. या रोबोट्सचा टिकाऊपणा हेही एक मोठेच आव्हान आहे.
- मानवाशी संवाद साधण्यासाठी या रोबोट्सना मानवी भाषा, हातवारे, हावभाव इत्यादी समजणे आवश्यक आहे, जे साध्य करणे अत्यंत कठीण आहे.
ह्युमनॉईड रोबोट्सचा मानवी जीवनावर होणारा परिणाम:
या रोबोट्सच्या वापराचा नजीकच्या भविष्यात मानवी जीवनावर मोठाच परिणाम होणार आहे. यापैकी काही परिणाम सकारात्मक असतील तर काही नकारात्मक.
सकारात्मक परिणाम:
- हे रोबोट्स आपली कामे अधिक वेगाने, अचूकतेने आणि कार्यक्षमतेने करतात. त्यामुळे मानवाला सृजनशील कामांवर लक्ष केंद्रित करण्यास तसेच धोरणात्मक निर्णय घेताना त्यावर विचार करण्यास अधिक वेळ मिळेल.
- या रोबोट्सच्या वापरामुळे उत्पादनक्षमता वाढेल व त्यामुळे उद्योगाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल.
- ह्युमनॉईड रोबोट्सच्या वापराने आरोग्य, शिक्षण, कृषी, वैद्यकीय, तांत्रिक अशा अनेक क्षेत्रांतील कामाचा दर्जा वाढेल. त्यामुळे मानवाचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.
- अनेक धोकादायक कामे करण्यासाठी आपण ह्युमनॉईड रोबोट्स वापरू शकतो. त्यामुळे मानवी जीवन सुरक्षित होईल.
- कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आणि ह्युमनॉईड रोबोट्स यांच्यामुळे व्यवसाय व रोजगाराच्या अनेक नवीन संधी निर्माण होतील.
नकारात्मक परिणाम:
- या कृत्रिमबुद्धीमत्ताधारक ह्युमनॉईड रोबोट्समुळे मानवाच्या नोकरीला, व्यवसायाला धोका निर्माण झाला आहे. या रोबोट्सच्या वापरामुळे केवळ अल्पशिक्षित नव्हे तर उच्चशिक्षित आणि उच्च कौशल्ये आवश्यक असणाऱ्या व्यवसायांवरही गदा येऊ घातली आहे. डॉक्टर्स, वकील, आर्किटेक्टस सध्या जी कामे करीत आहेत ती कामे येत्या काही वर्षांत हे रोबोट्स अधिक चांगल्या पद्धतीने, अधिक वेगाने, अधिक कार्यक्षमतेने व अचूकतेने करू शकतील. त्यामुळे बेरोजगारी वाढू शकते. हा ह्युमनॉईड रोबोट्सचा सर्वात मोठा धोका आहे.
- कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या ह्युमनॉईडसच्या वापरामुळे काही नैतिक तसेच कायदेविषयक प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यांच्यावर विचार करणे आवश्यक आहे.
- असे ह्युमनॉईड रोबोट्स हे हॅ*क केले जाऊ शकतात. तसेच त्यांचा गैरवापरही केला जाऊ शकतो. अशा वेळी ते मानवासाठी धोकादायक ठरू शकतात.
- जसजसे ह्युमनॉईड रोबोट्स शक्तिशाली बनतील, तसतसे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे अधिकाधिक कठीण होत जाईल. म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या रोबोट्स वर नियंत्रण ठेवणे, तसेच त्यांच्या कृतीची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे. या रोबोट्सच्या कृतींसाठी नक्की कोणाला जबाबदार धरायचे? त्याच्या निर्मात्याला, वापरकर्त्याला की त्या रोबोटला? हे निश्चित केले पाहिजे.
- ह्युमनॉईड रोबोट्सवर जास्त अवलंबून राहिल्यास माणसे आळशी बनतील. त्यांच्यातील अनेक कौशल्ये क्षीण होऊन नष्ट होण्याचा धोका संभवतो.
ह्युमनॉईड रोबोट्सची निर्मिती, वापर आणि भविष्य:
ह्युमनॉईड रोबोट्स वापरातील जोखीमा लक्षात घेऊन त्यांचा जबाबदारीने वापर करण्याची गरज आहे.
विज्ञान कथा लिहिणारे आयझॅक असिमोव्ह यांनी यंत्रमानव बनवतांना पाळावयाचे तीन प्रमुख नियम सांगितले आहेत.
१) यंत्रमानवाने मानवाला इजा पोहोचेल असे काम करू नये तसेच मानवाला इजा होत असताना तटस्थ राहून पाहू नये.
२) त्याने मानवाच्या प्रत्येक आज्ञेचे पालन केले पाहिजे.
३) वरील दोन्ही नियम पाळून त्याने स्वतःची काळजी घेतली पाहिजे.
या तीनही नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची आवश्यकता कृत्रिम बुद्धिमत्ता असलेले ह्युमनॉईड रोबोट्स विकसित करतांना आणि त्यांचा वापर करतांना अत्यंत महत्त्वाची आहे. ह्युमनॉईड रोबोट्सची निर्मिती आणि वापर करताना त्याचे नैतिक, सामाजिक आणि आर्थिक परिणाम लक्षात घेणे गरजेचे आहे.
यासाठी आंतरराष्ट्रीय चर्चा होण्याची आणि मार्गदर्शक तत्वे निर्माण करण्याची गरज आहे. त्यामुळे ह्युमनॉईड रोबोट्सचा विकास आणि वापर भविष्यात अधिक जबाबदारीने व मानवाच्या फायद्यासाठी होऊ शकेल.
गेल्या अनेक दशकांपासून ह्युमनॉईड रोबोट्सनी मानवाला भुरळ घातली आहे. सजीव आणि निर्जीव यांच्यातील फरकाची रेषा धूसर करण्याचे काम हे रोबोट्स करीत आहेत. मानवी ज्ञानाची क्षितिजे या रोबोट्सच्या वापरामुळे विस्तारात आहेत. कृत्रिम सर्वसाधारण बुद्धिमत्ता वापरून मानवापेक्षा अधिक बुद्धीमान, सक्षम ह्युमनॉईड रोबोट्सची निर्मिती करण्यासाठी आता कृत्रिम सर्वसाधारण बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स, AGI) वापर करण्याचा विचार चालू झाला आहे.
भविष्यात हे रोबोट्स मानवी आयुष्याचा एक भाग होणार आहेत. घरगुती कामात मदत करण्यापासून ते वैद्यकीय सेवा पुरवण्यापर्यंत आणि घरातील लहान मुलांची, वृद्धांची काळजी घेण्यापासून ते शास्त्रीय संशोधन करण्यापर्यंत सर्व कामांत ते हातभार लावतील. या वाटेवर अनेक संधी उपलब्ध आहेत तशीच अनेक आव्हानेही आहेत. मानवाच्या भविष्याशी हे क्षेत्र निगडित असल्याने त्याच्याकडे गंभीर दृष्टीने पाहावे लागेल हे नक्की.
तुम्हाला ह्युमनॉईड रोबोट्सबद्दलची ही माहिती कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुपही जॉईन करा.
धन्यवाद !
क्षितीजा कापरे
Good information regarding Robots
धन्यवाद
ह्युमनॉईड रोबोटस बद्दल माहिती मिळाली
.. अवघड विषय असून सर्वस्पर्शी आणि सोप्या शब्दातील लेखामुळे सहजपणाने समजला.
धन्यवाद