What is Mahashivratri in marathi:यावर्षी 8 मार्च 2024 या दिवशी सर्वत्र महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. महाशिवरात्री कधी व का साजरी केली जाते? महाशिवरात्रीचे महत्व काय आहे? महाशिवरात्रीचे व्रत व उपासना कशी केली जाते? महाशिवरात्रीची कथा काय आहे? हि सर्व माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया.
भारत देश हा संस्कृती प्रधान देश आहे. आपल्या देशात सांस्कृतिक व धार्मिक सण ठिकठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. भारतात देवदेवतांबद्दल निरतिशय प्रेम दिसण्यात येते. शिव ही वैदिक कालीन देवता आहे. वैदिक वाङ्मयात शिवाचे वर्णन आहे. दक्षिण भारतात तिसऱ्या शतकात शंगम वाङ्मयाला फार महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले होते. या वाङ्मयात शंकराचे वर्णन कर्पूरगौर, सर्वश्रेष्ठ देव, कैलास पर्वतावर राहणारे, व्याघ्राजीन पांघरणारे, परशू धारण करणारे असे आहे. देवांचे ही देव, सर्वात श्रेष्ठ देव म्हणूनच की काय त्यांना महादेव असे म्हटले जाते असे वाटते.
महाशिवरात्र कधी साजरी केली जाते?
संस्कृत पुराण साहित्यामध्ये अग्नीपुराण, शिवपुराण, पद्मपुराण या ग्रंथांमध्ये महाशिवरात्री या व्रताचे महत्त्व सांगितले आहे. माघ महिन्यातील वद्य चतुर्दशीला महाशिवरात्र असे म्हणतात. प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशीला शिवरात्र असते. परंतु माघ कृष्ण पक्षातील शिवरात्रीचा महिमा फार मोठा आहे.या दिवशी भगवान शंकराची उपासना केली जाते. तसेच या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात.
महाशिवरात्री का साजरी केली जाते?
काही दंतकथेनुसार समुद्रमंथनातून निघालेली रत्ने सर्वांनी घेतली.परंतु त्यातून निघालेले हलाहल भगवान शंकरांनी आपल्या कंठात साठवून ठेवले होते त्यामुळे त्यांचा कंठ निळा पडला होता. त्यामुळे त्यांना नीलकंठ असे म्हटले जाते. भगवान शंकरानी सृष्टीच्या कल्याणा साठी ते प्राशन केले आणि जगाला विनाशापासून वाचवले. अमृत पितो तो ‘देव’ विष पितो तो ‘महादेव‘असे म्हणतात. म्हणून भगवान शंकरांचे हे ऋण फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री होय.
शिवपुराणाच्या कथेनुसार महिन्याच्या कृष्णा पक्षातील चतुर्दशीला भगवान शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले. तेव्हा भगवान विष्णू व ब्रह्मा यांनी प्रथम शिवलिंगाची पूजा केली. तर दुसरीकडे असे म्हटले जाते की, महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर व देवी पार्वती यांचा विवाह पार पडला होता.यामुळे महाशिवरात्री साजरी केली जाते.
महाशिवरात्रीचे व्रत व उपासना :
•शंकरप्रभूंची पूजा महाशिवरात्रीच्या मध्यरात्री असणाऱ्या निशिथकालात प्रदोषात सर्वात प्रभावी मानली जाते.
•शिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेकाला फार महत्त्व आहे.
•या दिवशी उपवास करतात.हे व्रत पूर्ण एक दिवस असून दुसऱ्या दिवशी व्रताची समाप्ती होते.
•शिवपुराण, शिवस्तुती, शिवअष्टक, शिवचालीसा, शिव रुद्राष्टक, शिवाचेश्लोक, शिवपंचाक्षर आणि शास्त्र नामांमध्ये शिवाचा पाठ केला जातो.
•शिवकृपा प्राप्त होण्यासाठी ‘ओम’ किंवा ‘ओम नमः शिवाय’ या मंत्रोच्चाराचे चिंतन महत्त्वपूर्ण मानले जाते.
•महाशिवरात्रीला जागरणाचे खूप महत्त्व आहे. हे व्रत इच्छा पूर्ण करणारे आहे असे मानले जाते.
महाशिवरात्रीचे महत्त्व
सृष्टी निर्माण करणारे श्री ब्रम्हदेव, पालन करणारे श्रीविष्णु देव आणि संहार करणारे श्री महादेव हे आहेत. म्हणूनच प्रत्येकाचा शेवट किंवा मोक्ष यावर महादेवांचा अंकुश आहे असे म्हटले जाते. गेल्या जन्माचे भोग आपल्याला या जन्मात दुःख, हालअपेष्टा,संकटे,दारिद्र्य, शारीरिक ,मानसिक त्रास या स्वरूपात भोगावे लागते. या सर्वांपासून मुक्ती देण्याचे कार्य महादेव करतात. भगवान शंकर म्हणजेच खरे निर्गुण, निराकार, परब्रम्ह आहेत अशा या मोक्ष कार्य महादेवाला प्रसन्न करण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री. या दिवशी मनोभावे महादेवाची उपासना केल्यास मोक्ष प्राप्ती होते. या दिवशी केलेली उपासना ही मानवी जीवनाला सुख देते.
2024 मध्ये कधी आहे महाशिवरात्री?
महाशिवरात्री :- शुक्रवार 8 मार्च 2024
माघ वद्य चतुर्दशी प्रारंभ :- शुक्रवार 080 मार्च 2024 रोजी रात्री 09 वाजून 58 मिनिटे.
माघ वद्य चतुर्दशी समाप्ती :- शनिवार 9 मार्च 2024 रोजी सायंकाळी 06 वाजून 18 मिनिटे.
निशिथकाल वेळ :- शुक्रवार 08 मार्च 2024 रोजी मध्यरात्री 12 वाजून 25 मिनिटे ते उत्तररात्री 01 वाजून 13 मिनिटे.
12 ज्योतिर्लिंग
भारतात शंकर प्रभुची प्रसिद्ध अशी बारा ज्योतिर्लिंग आहेत. असे म्हणतात की, जो रोज प्रभातकाळी या बारा ज्योतिर्लिंगांची नावे घेईल, त्याची सर्व पापे नष्ट होऊन त्याला सर्व सिद्धी प्राप्त होते.
1) सोरटी सोमनाथ -सोरटी म्हणजे सौराष्ट्र. सौराष्ट्रातील प्रभासक्षेत्रात सोमनाथ या नावाने प्रसिद्ध आहे. याचे उपलिंगाचे नाव अनंतकेश्वर आहे. हे महीनदी जेथे सिंधू सागराला मिळते, त्या संगमावर आहे.
2) श्री शैलपर्वतावर मल्लिकार्जुन नावाचे ज्योतिर्लिंग आहे. हे कृष्णा नदीच्या काठावर आहे. याचे उपलिंगाचे नाव रुद्रेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे.
3) माळव्यात क्षिप्रा नदीच्या काठावर उज्जैन म्हणजेच अवंती नगरात महाकाळ नावाचे ज्योतिर्लिंग आहे. याचे उपलिंग दुग्धेश्वर किंवा धूतनाथ या नावाने प्रसिद्ध आहे.
4) ओंकारेश्वर-खांडवा-इंदोर अग्निरथाच्या मार्गावर बारा किलोमीटर अंतरावर ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग नर्मदेच्या काठावर आहे. याच्या उपलिंगाचे नाव कर्दमेश्वर आहे.
5) हिमालयात केदारेश्वर हे यमुनेच्या काठी आहे. याचे उपलिंग भूतेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे.
6) सिंह पर्वतावर भीमा नदीच्या काठावर, महाराष्ट्रात नाशिक हून 180 किलोमीटरवर भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आहे. याच्या उपलिंगाला भिमेश्वर असे म्हणतात.
7) काशी – वाराणसी येथे गंगेच्या काठावर काशी विश्वनाथ हे महाप्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे.
8) महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात गोदावरीच्या उगमा जवळ त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे.
9) परळी वैजनाथ नावाचे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात मराठवाडा परळीला आहे.
10) औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्र, मराठवाडा हिंगोलीहून 27 किलोमीटरवर आहे.
11) सेतुबंध रामेश्वर हे ज्योतिर्लिंग भारताच्या दक्षिण टोकाला हिंद महासागराच्या तटावर आहे.
12) घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्र,औरंगाबाद वेरूळ येथे आहे.
महाशिवरात्रीची कथा
महाशिवरात्रीचे महात्म्य सांगणारी कथा काय आहे पाहू.
कथा
एकदा एक शिकारी शिकारीसाठी रानात गेला. त्या दिवशी महाशिवरात्र होती. जाता जाता त्याला एक शिवमंदिर लागले. देवळात काही लोक शंकराची पूजा करीत होते. काही “नमः शिवाय” असा जप करीत होते ते पाहून त्याला हसू आले व चेष्टेने तो ‘शिव शिव’ असे म्हणू लागला.त्यामुळे त्याच्या मुखातून आपोआप शिवाचे नाव घेतले जात होते.तो रानात आला एका तळ्याकाठी असणाऱ्या बेलाच्या झाडावर तो शिकारीसाठी बसला. त्याच्या डोळ्यांसमोर पानाची फांदी आड येत असल्याने त्याला शिकार करणे अवघड जात होते. म्हणून त्याने ती फांद्यांची पाने तोडून खाली टाकण्यास सुरुवात केली. तेवढ्यात हळूहळू हरणांचा एक कळप तेथे पाणी पिण्यासाठी आला. शिकाऱ्याने आपला बाण सज्ज करून एका हरिणीवर नेम धरला.
हरिणीला चाहूल लागली, ती सावध झाली आणि कळवळून पारध्याला म्हणाली,”हे पारधी, थोडा थांब मला आत्ताच मारू नकोस, माझी मुले बाळे वाट पाहत असतील, मला त्यांना भेटू दे, मी पुन्हा येते, मग तू मला खुशाल मार!”
हरिणीचे हे शब्द ऐकून पारधी जोरजोरात हसून म्हणाला,”वा ! म्हणे मी परत येईन.हातात आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही माझी पोरं बाळं उपाशी ठेवून तुला सोडून देऊ,आणि तुझ्यावर विश्वास ठेवू!”
“हे पारधी,मी खरंच सांगते माझ्यावर विश्वास ठेव. तू मला मारण्यापूर्वी माझ्या मुलाना मला एकदा बघून येऊ दे!” हरीणी पुन्हा कळवळून म्हणाली.
हे ऐकून पारधीला तिची दया आली त्याने तिला परवानगी दिली. शिकारी झाडावरच तिची वाट पाहत बसला.रात्रभर खायला काहीच न मिळाल्याने त्याला उपवास घडला होता.पारधी झाडावर बसून रात्र काढायाची म्हणून तो बेलाची पाने तोडून खाली टाकू लागला आणि ती पाने नकळत शिवलिंगावर पडून त्याच्या हातून भगवान शंकराची उपासना होत होती.
दुसऱ्या दिवशी हरिणी आपल्या परिवारासह तेथे परत आली. ते पाहून पारध्याला आश्चर्य वाटले. रात्रभर घडलेल्या उपवासाने त्याच्या विचारात बदल झाला होता.त्यामुळे हरीणीच्या प्रामाणिकपणाचे त्याला कौतुक वाटले.त्याच्या मनात चांगल्या भावना निर्माण होऊ लागल्या, प्रकाश आल्यावर जसा अंधार नाहीसा होतो त्याचप्रमाणे शुद्ध चांगल्या भावनांच्या निर्मितीमुळे तिची हत्या करण्यासाठी विचार त्याच्या मनातून नाहीसा झाला.
हे पाहून भगवान शंकर त्यांच्यावर प्रसन्न झाले. पारधी व हरणीच्या परिवाराला त्यांनी विमानात बसवून स्वर्गात नेले. भगवान शंकरांनी हरिणांना मृग नक्षत्र म्हणून अन पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून आकाशात कायमचे स्थान दिले. हे घडले तो दिवस होता महाशिवरात्रीचा.अशी ही कथा. What is Mahashivratri in marathi
तुम्हाला ही महाशिवरात्रीची What is Mahashivratri in marathi माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा तसेच तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन कथा, माहितीपर लेख, बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यासाठी आमच्या “लेखक मित्र” या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा व्हॉटस ॲप ग्रुप ही जॉईन करा.
धन्यवाद!
लेखिका – आकांक्षा अरविंद निरळकर
खूप माहितीपूर्ण होते. खुप छान . कृपया असे आणखी माहितीपूर्ण लेख आमच्यासोबत शेअर करा
Nakki👍
Nice very informative
Thank you 🙏
खूप छान माहिती आहे
Thank you 🙏