कविता आणि कवितांचे प्रकार l What is Poem and Types of poem

WhatsApp Group Join Now

What is Poem and Types of poem :वाचक मित्रहो, तुम्हाला कविता वाचायला आवडतात का? कविता जशी वाचायला आवडते तशीच ती लिहिता यावी असे मनोमन वाटते का? कविता तुम्ही लिहित असालहि पण ती कोणत्या प्रकारात लिहीत आहात हे तुम्हाला ठाऊक आहे का?कवितेचे असे कोणकोणते प्रकार आहेत हे जाणून घेतल्यावर तुम्ही कोणत्या प्रकारात किंवा शैलीत उत्तम प्रकारे कविता लिहू शकता किंवा कुठल्या शैली मध्ये तुम्हाला कविता लिहिणे सहज जमू शकते . हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्हाला खालील लेखाचा नक्की उपयोग होईल.जेणेकरून भविष्यात तुम्ही एक उत्तम कवी होऊ शकता.चला तर मग आज आपण या लेखातून ही सर्व माहिती घेऊ.

कवितेचा इतिहास

कविता हा काव्यप्रकार समाजातील सर्वस्तरात लोकप्रिय असणारा व एक दीर्घ परंपरा लाभलेला हा साहित्य प्रकार आहे.मराठीत विवेकसिंधू या काव्यग्रंथापासून, सुरू झालेला हा प्रवास ज्ञानेश्वर,नामदेव, एकनाथ, तुकाराम,चोखामेळा इत्यादी संतांनी आपल्या काव्यातून जनप्रबोधन करीत समाजाची घडी सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न केला.तेराव्या शतकापासून सुरू झालेला हा काव्य प्रवास अठराव्या शतकापर्यंतच्या जडणघडणीच्या काळात समृद्ध होत गेल्याचे चित्र दिसून येते.

महाकाव्य, खंडकाव्य, नाट्यकाव्य, संवादकाव्य, संगीतिका, मालिका कविता, अभंग, ओव्या, आरती, स्तोत्र, ढवळे,विराणी, गवळण, भारुड, पोवाडा, लावणी, धावा, विडे, पाळणा, भूपाळी, पदे इत्यादी काव्यप्रकार मध्ययुगीन कालखंडात प्रचलित होते. तर आधुनिक कालखंडात गीतकाव्य, नाट्यगीत, चिंतनिका, गद्यकाव्य, विलापिका, जानपदगीत, ग्रामगीत, बालकविता,विडंबनकाव्य, विरूपिका, वात्रटिका, रागचित्रे- तालचित्रे, सुनीत, गझल, दशपदी, रुबाई, कणिका, चारोळी, हायकू, मूर्तकविता, उपहासिका इत्यादी अनेक काव्य प्रकार मराठी काव्य क्षेत्रात आज रुजले आहेत.कवितेची शक्ती एखाद्या शस्त्राहूनही अधिक असू शकते हे वारंवार अनेकांनी सुचित केले. कोणीतरी म्हटले आहे जेथे पोहचू शकत नाही रवि, तेथे पोहोचतो कवी. 

कविता म्हणजे काय?

कविता हा एक स्वतंत्र साहित्य प्रकार आहे. कवितेला कोणतेही बंधन नसते.कवितेची निश्चित अशी कोणतीही व्याख्या कुणालाही करता आली नाही. म्हणून कवितेची लक्षणे सांगण्याचा प्रयत्न अनेक कवी समीक्षकांनी केला आहे. त्यांनी त्यांच्या चिंतनातून ,भावना किंवा दृष्टिकोनातून व्याख्या केली पण तरीही ती परिपूर्ण नाही असे दिसण्यात येते.

साधारणपणे कविता म्हणजे अलंकार,प्रतिमा, प्रतीक, मिथक, आदिबंध आदींचा वापर करणारी छंदोबद्ध वृत्तबद्ध किंवा मुक्त छंद मुक्तशैलीत लिहिली गेलेली संहिता कविता म्हणून स्वीकारली गेली.

कवितेचे कोणते प्रकार आहेत?

भारतात कवितांचा इतिहास आणि कवितांचे तत्वज्ञान फार पूर्वीपासून चालत आले आहे. कविता या शब्दांनी खूप समृद्ध असतात. त्यातच कवितेचे निरनिराळे प्रकार आपल्याला बघावयास मिळतात. कवितेचे असे कोणकोणते प्रकार आहेत ते पाहू.

 1.  अभंग

अभंग हा प्राचीन मराठी साहित्यात विकसित झालेला काव्य प्रकार आहे.अक्षरवृत्त किंवा छंद प्रकारात अभंग मोडतो. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ इत्यादी संतांचे विठ्ठलभक्तीपर काव्य हे अभंग स्वरूपातच आहे.

छंद म्हणून मोठा अभंग व लहान अभंग असे अभंगाचे दोन प्रमुख प्रकार आहेत. (कविता आणि कवितांचे प्रकार)

1)मोठ्या अभंगात प्रत्येक चरणाचे चार खंड पडतात. पहिल्या तीन खंडात प्रत्येकी सहा अक्षरे असतात तर शेवटच्या खंडात चार अक्षरे असतात.दुसऱ्या व तिसऱ्या चरण खंडाच्या शेवटी यमक जुळवलेले असते तर शेवटचा खंड चरणाला पूर्णत्व देणारा असतो.

उदा.

 सुंदर ते ध्यान |उभे विटेवरी || कर कटेवरी| ठेवोनिया ||

2) लहान अभंगामध्ये आठ अक्षरांचे दोन चरणखंड असतात. व शेवटी यमक जुळवलेले असते.

उदा.

अग्निमाजि पडे बाळू | माताधांवे कनवाळू ||

अक्षर संख्येचे बंधन नेहमीच काटेकोरपणे पाळले जाते असे नाही; उच्चारानुसार कमी जास्त अक्षरेही वापरली जातात.

  2.     ओवी

 हे मराठी काव्य प्रकाराचे छंद किंवा अक्षरवृत्त आहे. ओवीतील चरणांची व चरणातील शब्दांची संख्या किती असावी याचे बंधन नसते. ओव्या हा महिलांच्या आस्थेचा विषय मानला जातो. घरातील दळण,कांडण करीत या ओव्या महिला गुणगुणत असत.त्याची भाषा सहज व सोपी असल्यामुळे अर्थही लगेच लागतो. ओवी काव्य प्रकारात कुटुंबातील नातेवाईक, पौराणिक देवता, त्यांच्या गोष्टी अशा विषयांची गुंफण केलेली दिसून येते.ओवीचे साधारणपणे दोन प्रकार आहेत. 1)ग्रंथातील ओवी 2)लोकगीतातील ओवी.

1)ग्रंथातील ओवी – या ओवीत चार चरण असून पहिल्या तीन चरणात यमक जुळलेले असते शेवटच्या चरणातील शेवटचे अक्षर भिन्न असते.

उदा.

 जातिधर्म क्रियायोग | सगुण निर्गुण विभाग || 

 बद्धमुक्त प्रसंग |अक्षरमय सर्वही||

2) लोकगीतातील ओवी – या ओवी मधून सर्वसामान्य स्त्रियां आपल्या मनातील भाव व्यक्त करतात असे म्हटले जाते.

उदा.

    पहिली माझी ओवी | पहिला माझा नेम ||

    तुळशी खाली राम | पोथी वाचे ||

बहिणाबाई चौधरी यांनी लिहिलेल्या ओव्या प्रसिद्ध आहेत.

उदा.

      मन वढाय वढाय

      उद्या पिकातलं ढोर

      किती हांकला हांकला

      फिरी येत पिकांवर

  3.  अंगाई

हा काव्य प्रकार तसा जुनाच आहे.लहान मुलांना झोप लागण्यासाठी जे गीत सादर केले जाते त्याला अंगाई म्हणतात. यामध्ये आईची माया, भावना, वात्सल्य, लेकराचं कौतुक असते.1977 च्या” बाळा कशी गाऊ अंगाई” या मराठी चित्रपटातील “निंबोणीच्या झाडामागे, चंद्र झोपला गं बाई” हे अंगाई गीत आपण सर्वांना माहिती असेलच.

                         आर्या (वृत्त)

मोरेश्वर रामचंद्र पराडकर म्हणजेच मोरोपंत या नावाने परिचित असणारे व संस्कृत भाषेवर प्रभुत्व असणारे प्रतिभावंत कवी. ‘आर्या’ आणि ‘पृथ्वी’ ही त्यांची आवडती वृत्ते या वृत्तांमध्ये त्यांनी अनेक रचना केल्या. आर्या वृत्तात अक्षरांचा नियम नसला तरीही गणाचे नियम आहेत.याशिवाय आर्या पूर्ण होत नाही. महाकवी मोरोपंतांनी सबंध महाभारत आर्या वृत्तांत आर्यभारत नावाने पुन्हा रचले यातीलच कृष्णार्जुन संवादातील खालील आर्या आजही मन मोहतात.

उदा. 

भ्यालो न तुझ हरीसहि; जो न तुला विमुख, काय कातर तो?

किथतो यास्तव की जन धर्मे भवसिंधु, नायका, तरतो.

                    साकी आणि दिंडी 

संतांनी आणि कीर्तनकारांनी अनेक साक्या रचल्या. याचा आधार घेऊन संगीत नाटकातून साकी वृत्तातील पदे प्रसिद्ध झाली.साकी आणि दिंडी ही धावती वृत्ते आहेत. गायला सुरस आणि समृद्ध असल्याने चाल द्यायला देखील सोपी असतात.अक्षरांच्या मात्रांची ठेवण चौकटीबद्ध नाही आणि कमी शब्दात कथा पुढे नेण्याची क्षमता! त्यामुळे नाटककारांनी आणि आणि सढळ हाताने कथन करताना साक्या वापरल्या.

उदा.

 पाल पाहुनी जसा बिचारा विंचू टाकी नांगी;

तसा आमुचा नायक खिळला उभा जागच्या जागी!

भान विसरला, कार्य विसरला, टकमक पाहत राही,

वेळ लोटला, असा किती तरि, स्मरण न त्याचे काही!

                                           – (आचार्य अत्रे)

   4.  गझल

 गझल हा प्रकार प्राचीन असून अरबी काव्यात या प्रकारचा जन्म इस्लाम धर्माच्या स्थापने अगोदरचा आहे. गझल मध्ये साधारणतः पाच ते पंधरा कडवी असतात.

 गझलेचे अनेक चरण असतात. एका गझलेत कमीत कमी पाच व जास्तीत जास्त सतरा शेर असतात. पण यासंबंधी कोणताही काटेकोर नियम नसतो.  शेराच्या शेवटी येणारे शब्द म्हणजे रदीफ.याचे यमकाशी साम्य असते. या रदिफच्या आधी येणाऱ्या व सारखे ध्वनी असणाऱ्या शब्दांना काफिया म्हणतात.

 गझलाच्या आरंभी बहुदा मतला असतोच. गझलाच्या पहिल्या शेरास स्थायी म्हणतात. उरलेल्या सर्व शेरांना अंतरे म्हणतात. बहुधा सर्व अंतर्ऱ्याची चाल सारखी असते.

आधुनिक कालखंडात सुरेश भट यांनी गझल हा काव्यप्रकार रुजविल्यामुळे त्यांना गझल सम्राट असे म्हटले जाते.

उदा.

दुःखाच्या वाटेवर, गाव तुझे लागले;

थबकले न पाय तरी, हृदय मात्र थांबले!

वेशीपाशी उदास,हाक तुझी भेटली

अन माझी पायपीट, डोळ्यातून सांडली!

                                   – (सुरेश भट)

5. खंडकाव्य

एखाद्या भाषेत किंवा बोली भाषेत रचलेले आणि कथेचे प्रति निधित्व करणारे, ज्यामध्ये सर्व संधी नाहीत, अशा प्रकारचा पारंगत ग्रंथ म्हणजे खंडकाव्य होय. खरे तर खंडकाव्य हे एक असे पारंगत काव्य आहे ज्याच्या कथानकात एकात्मक भिन्नता आहे; कथेमध्ये एकता असावी आणि कथनाच्या क्रमाने सुरुवात, विकास आणि कळस हे निश्चित हेतुने असावे आणि ते आकाराने लहान असावे. संक्षिप्ततेचे मोजमाप लावता आठ सर्ग किंवा लहान असलेले प्रबंधकाव्य हे खंडकाव्य मानले जाते.

 6.  महाकाव्य

भारतीय महाकाव्य हे भारतीय उपखंडात लिहिलेले महाकाव्य आहे रामायण आणि महाभारत ही महाकाव्य आहेत जी मूळतः संस्कृत मध्ये रचली गेली आणि नंतर इतर अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवादित झाली.

प्रसिद्ध कवी आणि नाटककार कालिदासांनी रघुवंश आणि कुमारसंभव ही दोन महाकाव्य लिहिली.इतर शास्त्रीय संस्कृत महाकाव्य म्हणजे माघाच्या शिशुपाल शिशुपालावध, अर्जुन आणि भारवीच्या पर्वतीय पुरुष किरातरजुनीयाचा वध,भैट

आणि भैटीकाच्या निषधाच्या राजकुमार नैयष्टाचरीताचे साहस

  7. मुक्तछंद

मुक्तछंद काव्य प्रकारात छंदाचे बंधन नसते. कुसुमाग्रज, कवी अनिल,पद्मा गोळे इत्यादी अनेक मोठ्या कवींनी मुक्तछंदात रचना केली आहे. मुक्तछंद कविता आणि छंदमुक्त कविता यात फरक असतो. छंदमुक्त कविता गद्य असल्यासारख्या जास्त वाटतात तर मुक्त छंद कवितांना आपली स्वतःची एक लय असते, जी वाचकाला कविता वाचताना जाणवते.

   8   लावणी

लावणी हा कलाप्रकार शृंगार व भक्ती या रसांचा परिपोष करण्यासाठी पूरक माध्यम समजले जाते, लवण या शब्दावरून लावण्यगीत वा लावणी शब्द तयार झाला आहे.

गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम म्हणजे लावणी. लावणीचे मूळ संतांच्या विराण्या,गौळणी बाळक्रीडेचे अभंग यात दिसते.संतांचे संस्कार घेऊन तंतांनी म्हणजे शाहिरानी ज्या विविध रसांच्या रचना केल्या त्यात लावणीचा समावेश होता. ही गाणी खटकेबाज, प्रासयुक्त, गेय असतात. तेराव्या शतकापासून महाराष्ट्रात लावणी अस्तित्वात आली असली तरी पेशवाईत तिला वैभव प्राप्त झाले.

लावणी ही जसा शृंगार रसाचा परिपोष करते तसेच ती भक्तिरस ही दाखविते. चला जेजुरीला जाऊ या सारखी लावणी ही भक्ती रस प्रधान आहे.

9. श्लोक 

 चार ओळीत लिहिलेले एक पद्य म्हणजे श्लोक. एकेकाळी हे पद्य स्तुतीपर किंवा उपदेशपर लिहिले जात असे. पुढील काळात निरनिराळ्या विषयांवर श्लोक लिहिले जाऊ लागले. समर्थ रामदास स्वामीं यांनी मनाचे श्लोक हे पद्य रचले. या पद्यात श्लोकांची एकूण संख्या 205 आहे मनाच्या श्लोकांची रचना ही भुजंगप्रयात वृत्तात आहे प्रत्येक ओळीत बारा अक्षरे आहेत.

उदा.

गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा |

मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ||

नमू शारदा मूळ चत्वार वाचा |

गमू पंथ आनंत या राघवाचा ||

                          चारोळी

चार ओळींची कविता म्हणजेच चारोळी होय.आणि या चारोळीच्या संग्रहाला चारोळ्या म्हटले जाते. या काव्यात दुसरी व चौथी ओळ यात अंत्य यमक असते. चारोळी हा काव्यप्रकार कवी,लेखक आणि साहित्यिक चंद्रशेखर गोखले यांनी 1990-91 मध्ये निर्माण केला. कविता आणि कवितांचे प्रकार

उदा.

घराभोवती कुंपण हवं

म्हणजे आपलं जग ठरवता येतं

बाहेर बरबटलेलं असलं तरी

आपल्यापुरतं सावरता येतं

10.  पोवाडा   

पोवाडा हा दृश्य व श्राव्य प्रकार आहे पोवाड्याचा उल्लेख कीर्ती काव्यात केला जातो. पोवाडा म्हणजे विद्वानांच्या मते” बुद्धिमत्तेचे तसेच एखाद्याच्या सामर्थ्य, गुण,कौशल्य तसेच वीरांच्या पराक्रमाचे इत्यादी गुणांचे काव्यात्मक वर्णन प्रशस्ती किंवा स्तुतिस्तोत्र म्हणजे पोवाडा”तरीसुद्धा पोवाडा म्हणजे ठासून स्तुती करणे किंवा वीरांच्या पराक्रमाचे स्तुती पर गेय कवन असे म्हणत.

उदा.

“डावी हाती बिचवा ल्याला |

 वाघ नख सरजाच्या पंजाला ||

 वरून बारीक झगा ल्याला |

 कंबर रस्ता वेढा केला | पोलाद

 घातला गळा || फिरंग पट्टा जिऊ 

 महाल्याप दिला | शिवाजी सरजा 

 बंद सोडूनि चालला ||”

  11.    हायकू 

हायकू हा जपानी काव्यप्रकार आहे. यात फक्त तीन ओळीचांच समावेश असतो. यामध्ये शब्दाचे बंधन असते. ही कविता एकूण सतरा शब्दांचीच असते.

आता याचा प्रसार जगभर झाल्यामुळे यामध्ये वेगवेगळे विषय ही सामावले गेले आहेत राजकारण, समाजकारण आणि कवितांचा मुख्य विषय प्रेम व विरह या सर्व विषयांवर शब्दांची बंधनं शिथिल करून हायकू केले जातात. मराठीमध्ये आचार्य अत्रे यांची कन्या शिरीष पै यांनी याची ओळख करून दिली. त्यांची अनेक पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

     12.      सुनीत

या काव्यामध्ये ओवी संख्या चौदा असते. चार चार ओळींची तीन कडवी आणि अखेरीस दोन ओळी असतात.याला सॉनेट असेही म्हटले जाते. इतर कवितांप्रमाणेच यात ही यमक,अनुप्रास साधले जाते.मराठीत सुनीत काव्य बरीच आहेत. माधव ज्युलियन, कवी केशवसुत यांची सुनीत काव्य प्रसिद्ध आहेत.

     13     वात्रटिका

वात्रटिका हा एक विनोदी काव्य प्रकार आहे.  हास्यकविता, उपरोधिका, भाष्यकविता, विडंबन, उपहासिका अशी नावे सुद्धा वात्रटिकांना वापरली जातात. साधारणपणे चार-पाच ओळीत चमकदार, विनोदी कल्पना अथवा चुटका वात्रटिकेत गुंफलेला असतो आशयाच्या अथवा कल्पनाविस्ताराच्या दृष्टीने कधीकधी सहा ते आठ ओळींचीही वात्रटिका असते. मंगेश पाडगावकर यांनी असंख्य विषय वात्रटिका रचल्या. (कविता आणि कवितांचे प्रकार)

  14.    दशपदी

हा दहा चरणांचा एक काव्य प्रकार आहे. कवी अनिल यांनी हा काव्य प्रकार मराठीत सुरू केल्याचे मानले जाते.

काही आशयानुसार कवितेचे निसर्गवर्णनात्मक कविता, चित्रपटगीत,नाट्यगीत, विनोदीकविता, भलरी (शेतकरी गीत), बालकविता, बालगीत, भक्तीगीत,भावगीत असेही प्रकार आहेत.तर मग आजपासूनच सुरुवात करा कवितांचे प्रकार या विषयावर अभ्यास करायला.

 वरील दिलेल्या माहितीत कोणत्या कविता प्रकारावर What is Poem and Types of poem तुम्हाला कविता करायला आवडेल हे कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.अशाच नवनवीन कथा, माहितीपर लेख, बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यासाठी आमच्या” लेखक मित्र” या वेबसाईटला नक्की भेट द्या व आमचा व्हाट्सअप ग्रुप ही जॉईन करा.

                         धन्यवाद!

11 thoughts on “कविता आणि कवितांचे प्रकार l What is Poem and Types of poem”

  1. Gouri Santosh Jangam

    अतिशय सुंदर लेखन…. मला गझल हा काव्यप्रकार आणि मुक्तछंदामध्ये लिहायला आवडतं

    1. Akanksha Niralkar

      धन्यवाद, तुमच्या आवडत्या काव्य प्रकारात अशाच लिहीत राहा.

  2. सौ. राधिका जोशी

    वा! खूप सुंदर माहिती मिळाली👌👌

    1. भानुदास सुखदेव शेवाळे

      खूप सविस्तर उपयोगी माहिती…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top