इच्छापत्र म्हणजे काय:आपण दैनंदिन जीवनात जसे कामाचे नियोजन, वेळेचे नियोजन,कुटुंब नियोजन, आर्थिक नियोजन, निवृत्ती नियोजन करतो तसेच आपल्या मृत्यूनंतर आपल्या मिळकतीचे नियोजन करणे आवश्यक आहे. तर तुम्हाला माहित आहे का?आपल्या मृत्यूनंतर संपत्तीचे (मिळकतीचे) व इच्छांचे नियोजन आपल्याला आपल्या इच्छापत्रानुसार करता येते.तर वाचक हो आज आपण या लेखात इच्छापत्र म्हणजे काय? आणि इच्छापत्र का, कोणी,केव्हा,कशाचे व कसे करावे तसेच इच्छापत्राचे प्रकार व फायदे काय आहेत त्याची विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा हा लेख शेवटपर्यंत जरूर वाचावा.
•इच्छापत्र म्हणजे काय?
•इच्छापत्र का करावे?
•इच्छापत्र कोणी करावे?
•इच्छापत्र केव्हा करावे?
•इच्छापत्र कशाचे करावे?
•इच्छापत्र कसे करावे?
•इच्छापत्राचे प्रकार
•इच्छापत्राचे फायदे
इच्छापत्र म्हणजे काय?
इच्छापत्राला मृत्युपत्र किंवा व्यवस्थापत्र(will)असेही म्हटले
जाते. हयात असताना आपल्या संपत्तीचे वाटप आपल्या मृत्यूनंतर कसे करावे यासंबंधी लिखित स्वरूपात व्यक्त केलेली इच्छा म्हणजेच इच्छापत्र. हे एक दस्तऐवज आहे.म्हणजे सोप्या भाषेत कायदेशीर कागदपत्रे असे म्हणू शकतो.मृत्यूनंतर मृत व्यक्तीच्या इच्छेनुसार संपत्तीचे विनियोग करणे हे महत्त्वाचे काम या दस्तऐवजांचे असते.
इच्छापत्र का करावे?
सर्वसाधारणपणे इच्छापत्र ( मृत्युपत्र) म्हटले की अनेकांना धडकी भरते. काय गरज आहे याची,आणि कशासाठी,डोळ्या देखत अकस्मात मृत्यूच्या कितीही घटना घडल्या तरी आपल्या बाबतीत असे काही होणार नाही अशी त्यांना भाबडी समजूत असते. याउलट वेळीच इच्छापत्र करून ठेवल्याने मानसिक शांती मिळते व आपल्यानंतर आपल्या संपत्तीचे आपल्या इच्छेप्रमाणे वितरण होऊन त्याची अंमलबजावणी होणार असल्याचे समाधान मिळते. तसेच इच्छा पत्रानुसार वागण्याचे नैतिक व कायदेशीर बंधन लाभार्थीवर व वारसांवर येते आणि त्याचा परिणाम म्हणजे वारसांमध्ये आपापसात सामंजस्य व प्रेम टिकून राहण्यास मदत होते. आपल्या पश्चात आपल्या वारसदारांमध्ये वादविवादास आपण कारणीभूत होत नाही ना, याची काळजी प्रत्येकाने घ्यावयास हवी. ज्यांच्याकडे वारसांना देण्यासाठी कोणत्याही स्वरूपात संपत्ती असेल त्यांनी वेळीच इच्छापत्र करणे सर्वांच्याच हिताचे ठरते.
इच्छापत्र करण्याच्या कायद्यातील तरतुदी अत्यंत सोप्या असून इच्छापत्र करणाऱ्यास कुठलाही खर्च करावा लागत नाही.इच्छापत्राला मुद्रांक लागत नाही, नोंदणी करावी लागत नाही. त्यामुळे सरकारी कचेरीशी संबंध नाही तसेच इच्छापत्र केव्हाही बदलता येते आणि महत्त्वाचे म्हणजे इच्छापत्र करणाऱ्याच्या मृत्यूनंतर याची अंमलबजावणी होणार असल्याने मृत्यूपूर्वी कुठल्याही मालमत्तेवरील हक्क नष्ट होत नाही अशा परिस्थितीत इच्छापत्र करणे फायद्याचे ठरते.
इच्छापत्र कोणी करावे?
ज्या माणसाच्या मालकीची कुठल्याही प्रकारची संपत्ती अथवा मालमत्ता असेल त्याला इच्छापत्र करता येते. तथापि शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असलेली व्यक्ती आणि सज्ञान व्यक्ती इच्छापत्र करण्यास पात्र ठरते. अंध, मुके व बहिऱ्या व्यक्तीही इच्छापत्र करू शकतात. ज्यावेळेस माणसाची चित्तवृत्ती स्थिर नसते, सारासार विवेक बुद्धी जागृत नसते त्यावेळेस इच्छापत्र करण्यास तो पात्र नाही असे ग्राह्य धरले जाते. तुरुंगात असलेली व्यक्ती सुद्धा इच्छापत्र करू शकते.
इच्छापत्र केव्हा करावे?
इच्छापत्र करणारी व्यक्ती मानसिक व शारीरिक दृष्ट्या सक्षम असेल तर लवकरात लवकर इच्छापत्र करणे हिताचे ठरते. कोणत्याही परिस्थितीत इच्छापत्र हे मृत्यू येण्यापूर्वी करावे लागते व मृत्यू केव्हा येणार याचा काहीच अंदाज नसल्याने ज्या व्यक्तींजवळ काही संपत्ती जमा आहे व ज्यांचे वय 18 पेक्षा जास्त आहे त्यांनी इच्छापत्र करण्यास हरकत नाही.
इच्छापत्र कशाचे करावे?
इच्छापत्र हे फक्त स्वतःच्याच मिळकतीचे करता येते. इच्छापत्रात आपल्याकडे असलेल्या स्थावर व जंगम मालमत्तेचा उल्लेख करणे आवश्यक असते. संपत्ती अथवा मालमत्ता तीन प्रकारात मोडते.
a)स्थावर मिळकत
b)जंगम मालमत्ता
c)बौद्धिक मिळकत
a)स्थावर मिळकत
यामध्ये भूखंड,जमीन,बंगला, सदनिका तसेच गहाण असलेली मिळकत यांचा समावेश होतो. इच्छापत्र करणाऱ्याच्या स्थावर मिळकतीतील हक्कांची विभागणी इच्छापत्राद्वारे करता येते.
b) जंगम मालमत्ता
यामध्ये रोख रक्कम, दागदागिने, शेअर्स, मुदत ठेव, फर्निचर, इलेक्ट्रिक वस्तू, वाहन, इन्शुरन्स पॉलिसी, शेतीवाडीतून येणारे उत्पन्न अथवा खंड, ग्रंथसंपदा, जुनी हस्तलिखिते अथवा दुर्मिळ ग्रंथ इत्यादी घटकांचा जंगम मालमत्तेत समावेश होतो. जंगम मालमत्तेत बऱ्याच घटकांचा समावेश होतो परंतु ही यादी न संपणारी आहे.
c) बौद्धिक मिळकत
जंगम मिळकतीचा आणखी एक प्रकार म्हणजे बौद्धिक मिळकत यात पेटंट, डिझाईन, कॉपीराइट्स, स्वामित्वाचे हक्क इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. ट्रेडमार्क, कॉपीराइट्स, पेटंट्स, डिझाईन इत्यादी मालमत्ता स्पष्टपणे स्थावर व जंगम स्वरूपात नसून ही मालमत्ता मालकाचे बौद्धिक सामर्थ्य दर्शविते. अशा मालमत्तेचे हक्क हे हस्तांतरित करता येतात किंवा वारसांकडे वारसा हक्क म्हणून येतात. त्याचप्रमाणे इच्छापत्राद्वारे मूळ मालकाला त्याची व्यवस्था लावता येते.
इच्छापत्र कसे करावे?
इच्छापत्राचा ठराविक असा एक नमुना नाही त्यामुळे त्यातील मजकुराचा, भाषा इत्यादी गोष्टींमध्ये काळानुसार बदल होऊ शकतो. परंतु खालील काही गोष्टी जरूर ध्यानात ठेवाव्यात.
a) कायद्याने तोंडी इच्छापत्र करता येत नाही. त्यामुळे लिखित स्वरूपातील इच्छापत्र स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिले गेले असल्यास इष्ट ठरते.
b) इच्छापत्र करणाऱ्या व्यक्तीने इच्छापत्रात स्वतःचे संपूर्ण नाव, वय,पत्ता,दिनांक यांचा उल्लेख करणे आवश्यक आहे.
c) हे इच्छापत्र आपण कोणाच्या दबावाखाली करत नसून स्वेच्छेने करत आहोत असे इच्छापत्रात नमूद करावे.
d) आपण इच्छापत्र करीत असताना मानसिक व शारीरिकरित्या निरोगी असल्याचा इच्छापत्रात स्पष्ट उल्लेख करावा.
e) तुमच्या वारसदारांना तुमच्या मालमत्तेत काय वारसा मिळेल हे स्पष्टपणे नमूद करा.
f) तुम्ही इच्छापत्रावर स्वाक्षरी करताना दोन साक्षीदारांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करणे गरजेचे असते.
तसेच प्रत्येक पृष्ठावर तुमच्या स्वाक्षरी बरोबर साक्षीदारांची स्वाक्षरी असणे बंधनकारक असते.
g) इच्छापत्र करताना कायदे तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.
h) इच्छापत्र सुरक्षित ठिकाणी ठेवून तुमच्या एखाद्या विश्वासातील व्यक्तीला किंवा नातेवाईक यांना याविषयीची माहिती जरूर द्यावी. जेणेकरून मृत्यूनंतर त्या इच्छापत्राची अंमलबजावणी शक्य होईल.
इच्छापत्राचे प्रकार:-
इच्छापत्राचे वेगवेगळे प्रकार असले तरी इच्छापत्राचा उद्देश साध्य करण्याच्या दृष्टीने ती सोपे व सुटसुटीत असणे आवश्यक आहे. इच्छापत्राचे कोणते विविध प्रकार आहेत ते पाहू.
a) हस्ताक्षरातील इच्छापत्र (Holographic Will)
सदरील इच्छापत्र हे दस्तऐवज करून ठेवणाऱ्याच्या स्वतःच्या हस्ताक्षरात असते आणि या दस्तऐवजाची विश्वासहर्ता जास्त असते.
b) तोंडी इच्छापत्र(Oral Will)
भारतीय वारसा कायदा 1925 ची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर हिंदू, बौद्ध, शीख व जैन, ख्रिश्चन, ज्यू यांच्यापैकी कुणालाही तोंडी इच्छापत्र करता येत नाही.
अथवा कोणी केल्यास कायद्याची मान्यता मिळत नाही.
c) सशर्त इच्छापत्र(Conditional/Contingent Will)
या इच्छापत्राची अंमलबजावणी एखाद्या घटनेवर अवलंबून असल्यास तशी घटना घडली असल्यास इच्छापत्र अमलात येऊ शकते अन्यथा ते अमलात येऊ शकत नाही.
d) संयुक्त इच्छापत्र(Joint Mutual Will)
यामध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्ती एकाच इच्छापत्राने स्वतःच्या मिळकतीची व्यवस्था करतात. पती व पत्नीने आपापल्या स्वतंत्र मालकीच्या मिळकतीबाबत एकच मृत्युपत्र केले तर ते संयुक्त मृत्युपत्र म्हणता येईल.
e) इच्छापत्र(Nun Cupative Will)
या प्रकारात इच्छापत्र करणारा इच्छापत्राच्या दोन प्रती काढतो. एक प्रत सुरक्षित म्हणजे बँकेत किंवा व्यवस्थापकाकडे ठेवतो व दुसरी प्रत स्वतःकडे ठेवतो.
f) पारस्पारिक इच्छापत्र(Reciprocal/ Mutual Will)
अशा प्रकारचे दस्तऐवज फार कमी प्रमाणात आढळतात. या प्रकारात दोन किंवा अधिक व्यक्ती संयुक्तपणे एकमेकांना किंवा त्रयस्थ व्यक्तीला मिळकत देण्याची तरतूद करतात.
g) मिळतेजुळते इच्छापत्र(Concurrent Will)
काही व्यक्तींची मिळकत एकापेक्षा जास्त देशात असते. अशावेळी आंतरराष्ट्रीय कायद्याच्या बंधनाचा विचार करून प्रत्येक देशातील मिळकतीचे वेगळे इच्छापत्र करता येते. अशावेळी प्रत्येक इच्छापत्र संपूर्णपणे स्वतंत्र असल्यास ज्या देशात मिळकत असेल, तेथील कोर्टाकडून इच्छापत्र खरे असल्याचा दाखला (प्रोबेट) घेता येतो.
h) विशेषाधिकार इच्छापत्र(Privileged Will)
यामध्ये पायदळ, वैमानिक किंवा नौदलातील सैनिकांना प्रत्यक्ष रणभूमीवर विशेष अधिकार वापरून इच्छापत्र किंवा पुरवणी इच्छापत्र करता येते.
i) पोकळ इच्छापत्र (Sham Will)
या प्रकारात इच्छापत्र करणारास फक्त इच्छापत्र केल्याची बतावणी करावयाची असते. परंतु इच्छापत्राप्रमाणे अंमलबजावणी होऊ नये, अशी त्याची मनोमन इच्छा असते.
इच्छापत्राचे फायदे:-
a) इच्छापत्र केले नसल्यास हिंदू व्यक्तीच्या मिळकतीचे वाटप हिंदू वारसा कायद्याप्रमाणे होते. त्यामुळे सामान्य माणसाना वारसा कायद्यातील तरतुदी समजणे अवघड जाऊन या गोष्टींना सामोरे जावे लागते. इच्छापत्र केल्याने या सर्व गोष्टी आपोआप टाळल्या जातात.
b) वारसदारांची संख्या व त्यांच्या गरजा विचारात घेऊन एकूण उपलब्ध मिळकतीचे इच्छापत्र करतेवेळी प्रत्येकासाठी वेगळी तरतूद करता येते.
c) इच्छापत्र करण्यासाठी मात्र मुद्रांक लागत नाही व इच्छापत्राची नोंदणी करणे कायद्याने बंधनकारक नाही.
d) इच्छापत्र तयार केल्याने वारसा कर रक्कम कमी होण्यास मदत होऊ शकते.
e) इच्छापत्र केल्याने तुमच्या वारसदारांना न्यायालयीन प्रक्रियेतून जाण्याची गरज न पडता तुमची मालमत्ता जवळजवळ तात्काळ ताब्यात घेण्यात यश मिळते.
f) तुमची प्रॉपर्टी व्यवस्थापित करण्यासाठी तुम्ही एखाद्या व्यक्तीची नियुक्ती करू शकता. ( ज्याला एक्झिक्युटर म्हणतात)
g) तुम्ही तुमच्या अल्पवयीन मुलांसाठी पालक नियुक्त करू शकता.
h) तुम्ही धर्मादाय संस्थेला पैसे किंवा मालमत्ता भेट देऊ शकता.
तर वाचक हो, वरील माहितीतून तुमच्या लक्षात आले असेलच की इच्छापत्र तयार करणे का आवश्यक आहे व किती महत्त्वाचे आहे.
तुम्हाला हि माहिती (इच्छापत्र म्हणजे काय )कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. तसेच मित्र परिवारात शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन कथा माहितीपर लेख मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. त्यासाठी आमच्या लेखक मित्र या वेबसाईटला नक्की भेट द्या .तसेच आमच्या व्हाट्सअप ग्रुप ही जॉईन करा.
धन्यवाद!
लेखिका– आकांक्षा निरळकर, मुंबई
छान आणि उपयुक्त माहिती मिळाली
Thank you Vaishali madam
खूप चांगली माहिती दिल्याबद्दल आपले धन्यवाद
👌👌👌👌
फायदेशीर माहिती आहे खूप
माझा मुलगा मला फसवत होता आता मला कळले तुमचा लेख वाचून खूप सुंदर माहिती दिल्या बदल dhanyawad