‘महिला सक्षमीकरणासाठी योग.’- आंतरराष्ट्रीय योग दिवस-२०२४ थीम
भारताने जगाला दिलेल्या काही अमूल्य देणग्यांपैकी एक म्हणजे योग. योग केवळ शरीरालाच नव्हे तर मनालाही मजबूत बनवतो, हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. सन २०१५ पासून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा केला जाणार आहे. हा दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस असेल. या निमित्ताने सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या वर्षी या आंतरराष्ट्रीय योग दिवसाची थीम आहे ‘महिला सक्षमीकरणासाठी योग’. या दिवसाच्या निमित्ताने आपण महिला सक्षमीकरणासाठी योग कश्या प्रकारे उपयुक्त ठरू शकेल? याबद्दल ऊहापोह करणार आहोत.
या थीममधे ‘महिला सक्षमीकरण’ आणि ‘योग’ असे दोन महत्वाचे शब्द येतात. दोन्हींचा आपण आधी वेगवेगळा विचार करू आणि त्यानंतर त्यांचा एकत्रित विचार करू.
आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यामागील उद्दिष्ट:
योगाभ्यासाचे अनेक फायदे आहेत. ते केवळ शारीरिक स्तरावर मर्यादित नाहीत तर मनाचा समतोल राखण्यासही योगाभ्यामुळे मदत होते. योगाभ्यासासाठी कोणत्याही विशेष अथवा किंमती संसाधनांची गरज नसते. तो अगदी घरबसल्या, आपल्या वेळेनुसार करता येऊ शकतो. योगाभ्यासाच्या या आणि अशा अनेक फायद्यांमुळे दिवसेंदिवस लोकांचा ओढा त्याच्याकडे वाढत आहे. योगाभ्यासाविषयी लोकांच्या मनातील गैरसमज दूर करुन त्याला चालना देण्यासाठी, योगाभ्यासाला अधिक व्यापक स्तरावर नेण्यासाठी आणि त्याला एखाद्या चळवळीचे रूप देण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे औचित्य साधून प्रयत्न होणे आवश्यक आहे.
महिला सक्षमीकरणाची आवश्यकता:
आज सर्वत्र महिला सक्षमीकरण हा चर्चेचा विषय ठरला आहे. प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये स्त्रियांचा सन्मान करण्याविषयी सांगितले गेले आहे. “यत्र नार्यस्तु पूज्यंते, रमंते तत्र देवता” म्हणजे जेथे स्त्रियांची पूजा केली जाते तेथे देवता वास करतात असे म्हटले गेले आहे. पण असे असूनही आज मात्र स्त्रीच्या सक्षमीकरणाची गरज निर्माण झाली आहे. सृष्टी निर्मितीची शक्ती असलेली स्त्री आज अबला म्हणून ओळखली जाते. या निर्मिती शक्तीचा विकास करणे आणि तिला सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक अशा सर्व स्तरांवर समान संधी उपलब्ध करुन देणे म्हणजे महिला सक्षमीकरण होय. विविध पातळींवर स्त्रीच्या सक्षमीकरणाचा विचार करताना तिच्या आरोग्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. कारण शारीरिक तसेच मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त असलेली स्त्रीच असमानतेचा सामना करुन स्वतःचे न्याय्य हक्क लढून मिळवू शकते. स्त्रियांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी योगसाधना महत्त्वाची भूमिका बजावू शकते. आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या थीम मागे हाच उद्देश आहे.
‘महिला सक्षमीकरणासाठी योग:
महिलांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि आध्यात्मिक कल्याणासाठी योगाभ्यासाचा उपयोग होऊ शकतो. बहुसंख्य वेळा महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. अनेकदा विविध सामाजिक, आर्थिक आणि कौटिंबिक कारणांमुळे त्या वेळेवर उपचार घेत नाहीत. ‘आजार आपोआप बरा होईल’ अशी त्यांची मानसिकता असते. आजार झाल्यावर तो बरा करण्यापेक्षा तो होऊच नये म्हणून प्रयत्न करणे हे योगाभ्यासातून साधले जाते. म्हणूनच स्त्रियांचे शारीरिक आरोग्य राखण्यासाठी योगाभ्यासाची मोठी मदत होऊ शकेल. महिलांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या पीसीओडी/पीसीओएस सारख्या समस्या किंवा स्त्रियांचे इतर आजार दूर करण्यास योगाभ्यासाची मदत होऊ शकेल. आज स्त्रिया अर्थार्जनही करू लागल्या आहेत. विविध क्षेत्रांत आघाडीच्या भूमिका पार पाडताना त्यांना बालसंगोपन आणि विविध कौटुंबिक जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. अनेकदा या सर्वांतील समतोल साधताना त्यांना अनेक मानसिक ताणतणावांचा सामना करावा लागतो. त्याच्यावर मात करण्यासाठी, मानसिक संतुलन राखण्यासाठी स्त्रियांना योगाभ्यासाची निश्चितच मदत होऊ शकेल. मनातील चिंता, भीती, तणाव कमी करण्यासाठी प्राणायामाचा विशेष उपयोग होतो. संतुलित मन योग्य निर्णय घेण्यास सक्षम असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयीची जाणीव त्यांच्यामध्ये विकसित करणे योगाभ्यासामुळे शक्य होईल.
खरे तर, वयाच्या विविध टप्प्यात स्त्रिया वेगवेगळ्या भूमिका निभावत असतात. त्या प्रत्येक टप्प्यात त्यांना योगाभ्यासामुळे निश्चितच मदत होऊ शकेल.
जीवनाच्या विविध टप्प्यांवर योग स्त्रियांना कशी मदत करू शकेल?
१) कुमार व तरुण वय: हल्ली शाळा आणि महाविद्यालयीन तरुणी ‘फिटनेस फ्रीक’ झाल्या आहे. शारीरिक ‘फिटनेस’ राखण्यासाठी त्यांना योगाभ्यासाची मदत होईल. योगाभ्यामुळे शरीर सुडौल, लवचिक आणि चपळ बनते. आज अनेक तरुणींना त्यांच्या व्यग्र आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे पीसीओडी/पीसीओएस सारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. योगाभ्यासामुळे त्यांचे निराकरण होऊ शकेल. या वयात मुलींवर अभ्यास, करियर इत्यादींचाही ताण असतो. शरीरात होत असलेल्या बदलांमुळे त्या गांगरून गेलेल्या असतात. त्याचे व्यवस्थापन करणे योगाभ्यासाने शक्य होईल. कारण योगाभ्यास हा केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक समस्यांवरही उत्तम प्रकारे कार्य करतो. कुमार आणि तरुण वयात राखलेले चांगले आरोग्य हे पुढील संपूर्ण आयुष्याच्या आरोग्याची पायाभरणी असते.
२) प्रौढ वय: या वयात स्त्रियांना अनेक जबाबदाऱ्या पार पडाव्या लागतात. त्यात कुटुंब, नातेवाईक आणि आपल्या लहान मुलांच्या जबाबदाऱ्यांचाही समावेश असतो. त्यांना गर्भावस्था, प्रसूती, बालसंगोपन अशा विविध टप्प्यांतून या वयात जावे लागते. याच बरोबर आज अनेक जणी अर्थार्जनही करत असतात. या सर्व जबाबदाऱ्या एकाच वेळी आणि योग्य प्रकारे निभावण्याच्या प्रयत्नात त्यांना अनेकदा मानसिक ताणाचा सामना करावा लागतो. या मानसिक ताणातूनच शारीरिक समस्याही निर्माण होतात. तसेच या जबाबदाऱ्या निभावतांना बऱ्याचदा त्यांचे स्वतःच्या शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष होते. नियमित योगाभ्यास हे या सर्व समस्यांवर योग्य उत्तर आहे. मातृत्वाचा प्रवास सुखकर करण्यास योगाभ्यासाचा फायदा होतो.
३) ज्येष्ठ नागरिकत्वाकडे वाटचाल करताना: वयाच्या पन्नाशीनंतर स्त्रियांना वेगवेगळया समस्या भेडसावतात. या वयात मेनोपॉजची सुरुवात होते. स्वतःच्या आरोग्याकडे आजवर केलेले दुर्लक्ष जाणवू लागले. शरीरातील संप्रेरके असंतुलित झाल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. परिवर्तनाच्या या टप्प्यात योगाभ्यास केल्यास त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. भविष्यातील ज्येष्ठ नागरिकत्वाकडील वाटचाल अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकते. उतारवयात स्वावलंबी राहण्यास योगाभ्यासामुळे निश्चितच मदत होऊ शकेल.
महिलांसाठी योगाभ्यासाचे फायदे:
१) शारीरिक आरोग्याच्या समस्या सोडवण्यास मदत होते. त्याचबरोबर मानसिक संतुलन साधले जाते. जीवनाच्या विविध टप्प्यांमधील समस्यांवर मार्ग काढताना याची मोलाची मदत होते.
२) योगाभ्यासामुळे शरीरातील संप्रेरकांचे(हार्मोन्स) संतुलन सुधारते. स्त्रियांच्या शरीरातील एंडोक्राइन ग्रंथींचे कार्य सुधारण्यास योगाभ्यासामुळे मदत होते. स्त्रियांच्या आरोग्यात या ग्रंथी महत्त्वाचे कार्य बजावतात. त्यामुळे एकंदरीत शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.
३) योगासने, प्राणायाम इत्यादींमुळे मासिक पाळीदरम्यानचा त्रास कमी होण्यास मदत होते.
४) रजोनिवृत्तीच्या काळातील मूड स्वींग, झोपेचा त्रास यासारख्या समस्या कमी करण्यास मदत होते.
५) नियमित योगाभ्यास तसेच प्राणायाम केल्यास मेंदूला आराम मिळतो. त्यामुळे ताण तणाव, चिंता, नैराश्य यातून सुटका होण्यास मदत होते.
६) योगाभ्यामुळे मनोबल वाढते. संतुलित मनामुळे योग्य निर्णय योग्य वेळी घेण्याची क्षमता निर्माण होते. याचा फायदा व्यक्तिगत जीवनात तर होतोच, पण आपल्या कार्यक्षेत्रात मोठी उंची गाठण्यासाठीही ते उपयुक्त ठरते.
नियमित योगाभ्यासामुळे महिलांना शारीरिक आणि मानसिक स्तरावर विस्मयचकित करणारे परिणाम दिसू शकतात. समाजाचा ५०% वाटा असणाऱ्या स्त्रियांच्या आरोग्याचा त्यांच्या कुटुंबावर, समाजावर आणि पर्यायाने राष्ट्रावर मोठा प्रभाव पडत असतो. राष्ट्रासाठी पुढील समर्थ, बलशाली पिढी घडावयाची असेल तर आपण महिलांच्या आरोग्याचा विचार करणे गरजेचे आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असलेली स्त्रीच खऱ्या अर्थाने सक्षम होईल. म्हणूनच येत्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने सर्व स्त्रियांनी नियमित योगाभ्यास सुरु केला पाहिजे.
तुम्हाला ‘महिला सक्षमीकरणासाठी योग’ ही माहिती कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुपही जॉईन करा.
धन्यवाद !
क्षितिजा कापरे,
Important info regarding Yoga , good 1
उत्कृष्ट लिखाण 👌👌
खूप समर्पक माहिती दिली आहे. नेहमीप्रमाणे विषय व्यवस्थित समजून सांगितला आहे 👍
खूप सुंदर लेख . योग या विषयाची महिलांना नितांत गरज आहे. हे व्यवस्थित पटवून सांगितले आहे.
खूपच छान.अभ्यासपूर्ण लेखन क्षितिजा.नेहेमीच छान लिहितेस.