म्हादबा आणि त्याची पत्नी गोदा आज फार आनंदी होते. कारणही तसेच होते. म्हादबाच्या मुलीचे लग्न ठरले होते. नवरा मुलगा तालुक्यातील शाळेत शिपाई म्हणून कार्यरत होता. त्याचा पगारही बरा होता. आपली मुलगी सुखात राहील या आशेने म्हादबाने स्थळाला होकार दिला होता .
म्हादबाची मुलगी विठा सातवीपर्यंत शिकली होती. तिथून पुढे तालुक्यातील शाळेत जावे लागणार होते. दररोज कोसो दूर पायपीट करत जाण्यापेक्षा ती शाळाच नको शिकायला असा सूर गोदा आळवू लागली. विठाच्या वर्गातील इतर मुलींनाही घरातून पुढील शिक्षणासाठी विरोध झाला आणि आता तर विठा एकटी कशी जाईल हा प्रश्न म्हादबा आणि गोदाच्या मनात फेर धरु लागला. अशा तऱ्हेने विठाची शाळा सातवीपर्यंत येऊन थांबली. पुढचे शिक्षण राहून गेले. बघता बघता विठा बावीस वर्षांची झाली.

विठाला पुढे शिकायचे होते.विठा वर्गातील सर्वात हुशार विद्यार्थीनी होती पण ; नियतीला मान्य नव्हते. म्हादबाला स्वतःच्या मुलीची शिक्षणासाठीची तळमळ कळत होती. खरी परिस्थिती मात्र तो आपल्या मुलीसमोर आणू शकत नव्हता. म्हादबाची आर्थिक परिस्थिती फारच बिकट होती. कसाबसा जमिनीचा छोटासा तुकडा होता. खंडू आणि धोंडूची बैलजोडी होती सोबतीला. त्यावर गुजराण चालत होती.
खंडू आणि धोंडू म्हणजे म्हादबाचा जीव की प्राण !पोटच्या पोराप्रमाणे म्हादबाने त्यांचा सांभाळ केला होता . मुक्या जनावरांचा देखील आपल्या मालकावर भारी जीव !म्हादबाचा तासनतास खंडू आणि धोंडू सोबत व्यतित व्हायचा . मनातल्या गुजगोष्टी म्हादबा त्या मुक्या जनावरांना सांगायचा. खंडू आणि धोंडूला पण त्यांच्या मालकाचा लळा होता. म्हादबाच्या शब्दांकडे कान लावून ऐकायचे खंडू आणि धोंडू. म्हादबाच्या सुखात सुखी आणि दुखा:त दुखी होती त्याची ही मुकी लेकरे. हो लेकरेच होती त्याची. म्हादबा खंडू आणि धोंडूला सांभाळत होता. परिस्थिती बेताची असली तरीही खंडू आणि धोंडूला मात्र वेळच्या वेळी चारा पाणी, औषधे मिळत होती. त्यामुळे दोघेही धष्टपुष्ट होते.
म्हादबाच्या घरी लगीनघाई चालली होती पण ; म्हादबाच्या मनात मात्र प्रश्नांचा डोंगर उभा राहिला होता. लग्नाच्या खर्चासाठी पैसा उभा करावा लागणार होता आणि म्हादबासाठी हे कठीण काम होते. वधूवरांचे खर्च , वरपक्षाचा मानपान , देणं-घेणं या सगळ्याचा खर्च म्हादबाच्या डोक्यात वावटळ उठवत होता.
“आवं धनी , कवादरनं बगत्या तुमास्नी. गप गप हायसा. आवं लगीन मांडलय घरात आन् तुमी आसं गुमान का बसलायसा ? काय झालय ? ” गोदाचे मन काळजीने भरुन आले होते. घरात लग्नकार्य असून देखील म्हादबा उदास होता आणि गोदाने त्याचे मन हेरले होते.
“आगं कारभारने , म्या आपल्या इठासाठी एवढं चांगलं सासर बगितलं खरं पर “. म्हादबा बोलता बोलता थांबला. एक दीर्घ श्वास घेत पुन्हा बोलू लागला.
” गोदे , खर्चाचं गणित काय मेळ खाईना. मोठ्ठी माणसं हाइती. जावाई आपला नोकरदार माणूस हाय. लग्नात बी त्येजाबर चार मोठ्ठी माणसं यितील. त्येंचा यवस्थित मानपान हुयाय नगं का ? ” म्हादबा गोदा जवळ मन रिकामे करू लागला.
” व्हय धनी , तुमचं आक्षी बराबर हाय. लगीन हाय लेकीचं आपल्या. मानपान तर करावा लागल . पावण्यांची सरबराई करावी लागल “. गोदा आपल्याच तंद्रीत बडबडत होती. म्हादबा विचारात मग्न होता.
“म्या काय म्हंती धनी , त्ये सावकारास्नी जाऊन भ्यटा की यकदा. काय मदत हुत्या का बगा त्येंच्याकडनं. सावकार करतील मदत. न्हाय म्हणायचं न्हायती. थोडंभुत पैकं जर मिळालं तरी जावायाच्या मानपानाचा घोर मिटल “. गोदा आस लावत होती आणि म्हादबाच्या मनात मात्र किंतु परंतु घर करून बसले होते. सावकार आशेचा किरण होता आणि म्हणूनच गोदाचे म्हणणे मान्य करून म्हादबा सावकाराच्या घराकडे चालू लागला.
” सावकार , सावकार ! “म्हादबाच्या हाका ऐकून सावकारांचा घरगडी सदा पळत आला. म्हादबा जवळ येताच त्याने म्हादबाच्या हाताला धरून जवळजवळ ओढून दरवाजातून बाजूला घेऊन गेला आणि रागाने म्हादबाकडे पाहू लागला . सदाचा रागीट चेहरा पाहून म्हादबा गोंधळला.
” आरं कळतं का काय तुला ? कशाला एवढ्या मोठ्यानं वरडाय लागलायस . जरा येळ काळ बगून तर याचं की. आन् आलायस कशाला ? जसा आलायस तसाच फिर मागं. सावकार काय आज भ्येटत नसत्यात. उगच येळ घालवू नगोस. जा “. सदा निष्ठुरतेने म्हादबाशी बोलत होता . सदाचे बोलणे शांतपणे खाली मान घालून म्हादबाने ऐकून घेतले आणि सदाला सावकारांची भेट घालून दे म्हणून विनवू लागला. सदाने म्हादबाला कसलीच दाद दिली नाही . उलट वाड्याबाहेरुनच त्याला हाकलू लागला.
” म्हादबा , आतमंदी पावणं आल्याती . सावकारांच्या पोरीच्या लगीन ठरवायचं चाललय. म्हत्वाची बोलणी चालल्याती . तुला आतमंदी सोडता येणार न्हाय. तू उद्या यिऊन भ्येट मालकास्नी ” . सदा बोलून वाड्यात निघून गेला आणि म्हादबा पाठमोऱ्या सदाला पाहतच राहीला.
रिकाम्या हाताने परतलेला हताश म्हादबा घराबाहेर येऊन उभा राहिला पण ; पावले मात्र त्याची आपसूकच गोठ्यात बांधलेल्या खंडू आणि धोंडूकडे वळली. मन उदास झाले होते. म्हादबा खंडूला गोंजारत त्याच्या शेजारी बसला आणि धोंडूकडे पाहत आज वाड्यात घडलेली गोष्ट सांगू लागला.
बराच वेळ म्हादबाची वाट पाहून गोदा गोठ्यात आली तर म्हादबा खंडू आणि धोंडूला गोंजारत तिथेच बसून होता. त्याचे सगळे बोलणे गोदाने ऐकले होते. गोदाला वाईट वाटले आणि सोबतच चिंता वाटू लागली. पुढे जाऊन तिने म्हादबाच्या खांद्यावर हात ठेवून त्याला धीर द्यायचा प्रयत्न केला.
“आसं नाराज का हुताय ? करु काय तर . त्या देवाला जरा तर काळजी आसलंच की आपली. उद्या पुन्यांदा जावा आणि सावकाराला इनंती करा. सावकार मदत करतील . आसा धीर सोडू नगासा “. गोदा भलेही म्हादबाला समजावत होती पण तिच्याही मनात चिंतेचे सावट गडद होत चालले होते.
म्हादबा आठ दिवस सावकाराच्या वाड्याकडे फेऱ्या मारत होता आणि रिकाम्या हाताने आणि निराश मनाने परतत होता. पावले गोठ्यात बांधलेल्या खंडू आणि धोंडूकडे वळत होती. डोळे भरून वाहत होते आणि मन रिकामे होत होते. सरतेशेवटी सावकाराने म्हादबाला भेटायला बोलावले. आज स्वतः सावकाराकडून बोलावणे आले होते तर धावत पळतच म्हादबा वाड्यात पोहोचला.
सावकार खुर्चीवर पायावर पाय टाकून रुबाबात बसला होता आणि सावकाराच्या बोलायची वाट पाहत म्हादबा शेवटच्या पायरीशी पाय पोटात घेऊन , हात जोडून बसला होता.
” तर तुला कर्ज पायजे. हमम् , देतो तुला कर्ज पर त्यासाठी तुज्या जवळ आसणारी तुझी एखादी वस्तू घाणवट ठेवावी लागल आमच्याकडं. बोल काय हाय तुज्याकडं ? ” सावकार थंड आवाजात विचारु लागला आणि म्हादबा गोंधळला.
” मालक , तुमीच आमचं मायबाप हायसा. तुमास्नी सगळं म्हायती हाय. म्या गरीब माणूस. माज्याकडं काय बी न्हाय मालक. माजी मदत करा मालक. लगीन हाय घरात ल्येकीच. लय नड हाय मला पैशाची “. म्हादबा हात जोडून विनंती करु लागला आणि सावकार सदाकडे पाहून गूढ हसला.
आज विठाचे लग्न होते. सगळे आनंदी होते. वाजतगाजत विठाचे लग्न पार पडत होते आणि म्हादबा आणि गोदाचे डोळे पाणावले होते. आज त्या दोघांचीही चिंता मिटली होती. आनंदाश्रूच्या सोबतीने विठाची पाठवणी झाली.
लग्नाला पाच दिवस झाले आणि पाठपरतवणीला आलेली विठा आज सासरी रवाना झाली. विठा जाताच गोदाने घरातील आवराआवर केली आणि ती गोठ्याकडे गेली. तिथे जाताच मात्र तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. ती रागाने कडाडली.
“सदा दादा , तू खंडू आणि धोंडूला घिऊन कुठं चाललायस ? तुझं धाडसच कसं झालं माझ्या खंडू आणि धोंडूला हात लावायचं. दावणीचं बैल सोडून घिऊन निघालायस . कुणाला इचारुन ? धनी , धनी “. गोदा रागाने लाल झाली होती. तिचा आवाज ऐकून सदा घाबरला होता पण ; तसे न दाखवता त्याने धाडसीपणाचा आव आणत गोदाला प्रत्युत्तर केले.
” गोदा वैनी , म्हादबानं तुमास्नी काय सांगितल्यालं दिसत न्हाय. तुमच्या इठाच्या लग्नासाठी सावकाराकडनं पैशे घेतलसा त्याबदल्यात ही बैलजोडी द्यायचं कबूल केलय म्हादबानं “. सदाने दिलेले स्पष्टीकरण ऐकताच गोदाच्या पायाखालची जमीन सरकली.
“न्हाय न्हाय , आसं कसं हुइल ? खंड्या आन् धोंड्या माजी नुसती दावणीला बांदल्याली जनावरं न्हायती. लेकरं हायती आमची. आन् आशी कशी कुणाला बी द्याची. न्हाय जमणार. बैलांची येसण सोडा सदा दादा “. गोदाच्या डोळ्यांमधून आसवांचा पूर वाहू लागला. चेहरा रागाने लालभडक झाला होता. म्हादबा शांतपणे गोदा जवळ येऊन उभा राहिला. तिचा हात घट्ट पकडत सदाकडे कटाक्ष टाकला.
” सदा , जा बाबा घिऊन त्या दोघास्नी. सावकारानं मला माझ्या पोरीच्या लग्नासाठी रिण दिलं हुतं. त्याची परतफेड करतुय आज. जा ” . म्हादबा रडत रडत मटकन् खाली बसला. खंड आणि धोंडूकडे एक नजर पाहून त्याने गुढग्यात मान खुपसली. सदा खंडू आणि धोंडूला घिऊन जाऊ लागला तशी गोदा त्याच्या समोर येऊन उभी राहिली. सदा प्रश्नार्थक मुद्रेने तिच्या कडे पाहू लागला.
“माझी लक्षुमी माझ्या घरातन उपाशी कशी जायल दादा. जरा वाईच थांब. भाकर तुकडा खायाला घालती त्यास्नी. ए खंडू , ए धोंडू परत कवा येणार रं. म्या वाट बगीन तुमची. म्या कवा वाईट वंगाळ बोलली आसल . माज्याकडनं काय चुकी झाली आसल तर माफी द्या लेकरांनो “. गोदा आरतीचे ताट आणि भाकर तुकडा घेऊन आली. दोघांनाही ओवाळून तिने भाकर तुकडा खायला घातला. चेहऱ्यावर स्मित आणत तिने त्यांना निरोप दिला. दोघेही नजरेआड होताच गोदा धाय मोकलून रडू लागली.
बराच वेळ म्हादबा आणि गोदा खिन्न मनाने रिकाम्या गोठ्याकडे पाहत बसले होते. सावकाराने विठाच्या लग्नासाठी दिलेल्या पैशांच्या मोबदल्यात खंडू आणि धोंडू मागितले होते आणि हतबल म्हादबाने सावकाराचे म्हणणे मान्य केले होते.
“गोदा , जीवापाड जपलेल्या माज्या मुक्या लेकरांनी आज सगळ्याची परतफेड केली. त्यास्नी आजपातू्र सांभाळलं. मोठ्ठं केलं. खाऊ पिऊ घातलं. आंजारलं गोंजारलं. त्या सगळ्याची परतफेड करुन गेलीत माझी लेकरं. पर सावकाराच्या घरात राजावानी ऱ्हातील. माझ्या सारख्याची झोळी फाटकी हाय गोदा. म्या त्यास्नी मिळल ती देत हुतो आन् त्यातच दोघं बी समाधान मानत हुती . आता सगळं चांगलं हुईल त्यांचं ” . म्हादबा खंडू आणि धोंडू गेले त्या दिशेला पाहत बोलत होता आणि गोदा मात्र त्याच्या मनाला झालेली जखम अनुभवत होती.
समाप्त :
कथा कशी वाटली तुमचा बहुमूल्य अभिप्राय देऊन जरुर कळवा . तुमच्या मित्र परिवारासोबत कथा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी लेखक मित्र या वेबसाईटला भेट द्या. आमचे what’s up चॅनेल फाॅलो करा. धन्यवाद.
सौ. मनिषा उदयसिंह पाटील, पुणे.
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)