मराठी कथा – कहाणी नाजुकाची, एक हास्यकथा l Marathi Funny story

WhatsApp Group Join Now

सकाळचे पाच वाजून गेले होते. अलार्म दोन वेळा पुढे ढकलून झाला होता. नाजुकाचे नाजुक मन मात्र गादीवरून काही उठायला तयार होत नव्हतं.  ती या कुशीवरून त्या कुशीवर वळली तरी बिचाऱ्या पलंगाने जीव गेल्याची वेदना अनुभवली. 

त्याच झालं असं की आपल्या कथेची नायिका नाजुका बारके हिने २०१८ साली एक तारखेलाच सोमवार आल्यामुळे वर्षाच्या पहिल्या दिवसापासून सोमवारपासून आणि एक तारखेपासून चालू करू हे ठरवायला आता तीनही मुहूर्त एकत्र झाले होते आणि त्यामुळेच नाजुकाने वजन कमी करायचं आपलं स्वप्न पूर्ण करायला हे न्यू इयरचं रिझॉल्युशन ठरवलं होतं.

 कारण यावर्षी पठ्ठीने तिशी पार केली होती आणि आता यावर्षी आपल्याला लग्न करायचचं आहे आणि लग्न करण्यासाठी वजन कमी करायचे आहे असा दृढनिश्चय केला होता. कसतरी करून नाजुका पाचचा अलार्म पुढे ढकलत ढकलत आठ वाजता उठली आणि घाईघाईत आवरून व्यायामासाठी म्हणून घराजवळच्या उद्यानात पोहोचली. 

तिथे पोहचेपर्यंतच बिचारी नाजुका धापा टाकायला लागली. पाच मिनिटं बसून नंतर व्यायामाला सुरुवात करते असं म्हणत ती चांगली तासभर तिथे बाकड्यावर बसून राहिली. तिची बिचारीची त्यात काहीच चूक नव्हती एकशे दहा किलोचं स्वतःचे वजन पेलत इथपर्यंत येऊन पोहचणं म्हणजे काही साधी गोष्ट नव्हती. तासभर बसल्यावर आता खूपच उशीर झाला उद्यापासून नक्की व्यायामाला सुरुवात करू असे ठरवून धापा टाकीत टाकीत पुन्हा जिन्याला हादरे देत घरी पोहोचली. येता येता तिने मनाशी ठरवलं व्यायाम तर आज होऊ शकला नाही पण माझ्या जिभेला मात्र आज मी नक्की ताब्यात ठेवेन.

 घरी पोहचताच आईने केलेल्या साजूक तुपातल्या रव्याच्या वासाने तिचा डाएट प्लॅन हाणून पडला. थोडं खायला काय हरकत आहे दिवसभर मी नक्की कंट्रोल करेन असं म्हणून केवळ तीन डीश भरून शिरा तिने फस्त केला. आज ती केवळ चार भाकरी आणि भाजी डब्यात घेऊन ऑफिसला गेली. कोणा साहेबांच्या रिटायरमेंटचे चार पाच समोसे खाऊन बाकी तिने आज मात्र स्वतःची जीभ ताब्यात ठेवली होती. फक्त ऑफिसमधून घरी येताना रस्त्यात उभे राहून पाणीपुरी विकणाऱ्या काकांच्या रस्त्यात उभे राहण्याच्या चुकीमुळे तिला तीन चार प्लेट पाणीपुरी तेवढी खावी लागली. एवढं सोडलं तर आज नाजूकाने स्वतःला चांगलच ताब्यात ठेवलं होतं.

 असेच दिवसांमागून दिवस पार पडत होते पण आपली नाजुका बारके काही नावासारखी नाजूक आणि बारीक व्हायला तयार नव्हती. तिने एक ठरवलं होतो की बटाटा भोपाळा अशा गोल गरगरीत दिसणाऱ्या भाज्यांपासून लांब रहायचं. त्यापेक्षा भेंडी, चवळी अशा नाजूक भाज्याच तेवढ्या खायच्या. निदान त्याच्याने तरी काही तरी फरक जाणवेल. कोणी भात बंद करायचा सल्ला दिला तर जेवणातला पहिला आणि शेवटचा भात वर्ज्य करून फक्त मधला भात थोडा (तिच्या मानाने) ती खात होती. 

नाजुकाने आताशा वजन कमी करण्याचा एक अनोखा मार्ग शोधून काढला होता. ती ठराविक गोष्टींपासून चार हात लांबच राहत असे. तिच्या वजनानी खराब झालेले किंवा तुटलेले वजनकाटे आणि इतक्यात नवीन मागवलेला आणि अजून चांगल्या अवस्थेत असलेला नवीन वजन काटा.  तसेच आरशात पण ती हल्ली स्वतःला बघेना झाली होती. फोटोपासून सुद्धा ती लांब राहणेच पसंत करी. आणखी एक गोष्ट तिला जाणवली होती आजूबाजूला बारीक मैत्रिणी असल्या की आपण त्यांच्यासमोर फारच जाड वाटतो म्हणून ती तिच्यासारखा गुटगुटीत मुलींबरोबरच राहू लागली होती. 

 आणि ह्याच तिच्या मन लावून केलेल्या प्रयत्नांचं फळ म्हणजे तीला  स. दा. रडे. म्हणजेचं सदाशिव दामोदर रडे या गावातल्याच सुकुमाराचे स्थळ चालून आले. नवरदेव अगदी नाजुकाच्या विरुद्ध दिसायला होता फुंकर मारली तरी उडून जाईल त्याची किरकोळ शरीरयष्टी आणि चालण्याची विचित्र ढब  त्याला आणखीनच यूनिक ठरवत होती. 

नाजुकाचे आई वडील मात्र भलतेच खुश होते. आपल्या लेकीचं लग्न होणे किती अवघड गोष्ट हे त्यांना चांगलेच माहीत होते त्यामुळे आलेल्या स्थळाला नावे ठेवण्यात काहीच अर्थ नव्हता. त्यांनी दणक्यात बार उडवून दिला.

आता मात्र नाजुकाने ठरवलं आपल्याला अहोंशी जुळवून घेण्यासाठी तरी का होईना थोडं वजन कमी करावंच लागेल. सासरची मंडळी नाजुकाच पाककौशल्य बघून भारावून गेले होते. त्यामुळे तिला वजन कमी करावंच लागेल असा काहीच त्यांचा आग्रह नव्हता. नाही म्हणायला सदाशिवराव कधी कधी आमचा भोपळा, आमचं कलिंगड अशा उपमा द्यायचे खरे पण तेही गमतीतच.

पण तिला स्वतःचचं मन खात होतं, मला कधीतरी छान स्लीमट्रीम दिसायच आहे हा तिचा स्वतःचा हट्ट होता. ती त्यासाठीच खूप जास्त प्रमाणात कष्ट घेत होती. नेमाने रोज अलार्म लावायचा तो पुढे ढकलून रोजच्याच वेळेत उठायच. मग आज खूप काम आहे उद्यापासून नक्की व्यायाम करेन अस ठरवलं की पुन्हा उद्यापासून तेच. ती बिचारी मनापासुन प्रयत्न करत होती पण यश येत नव्हते. 

त्यात मिस्टर स. दा. रडे ना गोड खूप आवडत होतं. मग काय सांगणार नाजुका ? पतीच्या आवडीनुसार गोड बनवायची आणि गाजराच्या हलव्याची नजरानजर झाली की  हलव्याचं वजन कमी व्हायचं. अशा प्रकारे मिस्टर स. दा. रडे आपल्या सुगरण बायकोच्या हातचं चांगलं चुंगलं खाऊन जरा गरगरीत होऊ लागले होते.परंतु आपल्या नाजुकाचा मात्र एकशे दहा किलोचा काटा काही खाली येत नव्हता. कधीतरी नव्हे बऱ्याच वेळा काटा वर जाई पण खाली चुकून सुद्धा जात नसे.

 अशातच तिने गोड बातमी दिली आणि याच बरोबर डायट वगैरेच तिने मनावर घेणे सोडून दिले. एक आईसारखीच गुटगुटीत छोटीशी नाजूका अवतरली. आता एकाला दोघे हवेत म्हणून सासरच्या मंडळीचा आग्रह त्यांनी मनावर घेतला आणि एक गुटगुटीत असा दादा आला. हा हा म्हणत चौकोनी कुटुंब पूर्ण झालं.

नाजुकाच स्वप्न बाजूलाच पडलं. मुलाचं संगोपन करण्यात ती रमून गेली. डायट वगैरेच सगळं जागीच थांबलं. असं नाही की तिने कधी पुन्हा वजन कमी करण्याचा विचारच नाही केला. तिने बिचारीने खूप वेळा या गोष्टीवर विचार केला फक्त कृती करण्यात ती थोडीफार कमी पडली एवढंच कारण आता तिच्यावर दोन पिल्लांची ही जबाबदारी होती.देवाच्या कृपेने म्हणा किंवा  नाजुकाची स्ट्रॉन्ग वील पॉवर म्हणा. एक चमत्कार असा झाला की नाजुकाच काय तिच्या भोवतीचे सगळेच अवाक होऊन पाहात राहिले.

दोन मुलांच्या मागे धावपळीत ती आपोआप एकशे दहा वरून सत्तर किलोवर केव्हा आली ते तिच तिलाच कळलं नाही. तिच्यासह सगळेच थक्क झाले.पण काहीही असो नाजुकाचे स्वप्न पूर्ण झाल होतं. ती स्लीमट्रीम झाली होती. असा चमत्कार आपल्यापैकी अनेक जणींना व्हावासा वाटतो. त्यांनाही देवाची अशी कृपा लाभो. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

तुम्हाला ही कथा कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WApp ग्रुप हि जॉईन करा.

महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)  

      धन्यवाद !

6 thoughts on “मराठी कथा – कहाणी नाजुकाची, एक हास्यकथा l Marathi Funny story”

  1. This Story creats lighter mood , I felt like I’m listening to someone . My best wishes with Mrs. Madhuri keep posting amazing stories like this . Thank you

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top