एक भावनिक संवाद
अथर्व ने आजोबांचा रेकॉर्ड केलेला आवाज आनंदी पुन्हा पुन्हा ऐकत होती. तिच्या नेहमीच्या बाल्कनीतल्या खिडकीजवळ बसून. तिचा तो आवडता कोपरा, छान सजवलेला, भारतीय बैठक, कोपर्यात पुस्तकांचा शेल्फ, छोटसं टेबल त्यावर गणपती बाप्पाची आकर्षक मुर्ती, बाप्पाला वाहिलेलं जास्वंदीचे टवटवीत फुलं, छोटासा टेबल लॅम्प, तिची नेहमीची डायरी, काही कोरे कागद, पेन ,पेन्सिल. व्यक्त होण्यासाठीची, मनात आलेलं पेपरवर लिहून काढण्याची हि तिची जागा.
गेले कित्येक दिवस त्या कागदांवर काहीच ऊमटलं नव्हतं. कारण ही तसंच होतं. तिच्या आयुष्याला आकार देणारे, तिच्यावर चांगल्या तत्त्वांचे, माणुसकीचे संस्कार करणारे तिचे बाबा तिने गमावले होते. शांत, निस्वार्थी, नेहमीच पॉझिटिव्ह असणारे तिचे बाबा त्यांच्या शेवटच्या दिवसात मात्र खूप नकारात्मक आणि चिडचिडे झाले होते. त्यांच्या ह्या शेवटच्या क्षणात आनंदी सतत त्यांच्या सोबत होती. आणि म्हणूनच त्यांच्या जाण्याने ती खूप खचली होती. आज सुद्धा ती तिच्या आवडत्या जागी बसली होती. पण हतबल, खचलेली, आसवं गाळीत. आणि अथर्वने रेकॉर्ड केलेला तिच्या बाबांचा आवाज ऐकत होती.

आकाश आनंदीचा नवरा ऑफिसमधून कधीच आला होता. तो रोज आनंदीला असं रडताना, खचताना बघून काळजीत पडत होता. त्याला कळत होतं की आनंदीने ह्या दुःखातून बाहेर पडणं आणि व्यक्त होणं गरजेचं आहे. म्हणूनच त्याने आज प्रयत्न करण्याचे ठरविले. त्याने आलं घालून केलेला गरमागरम चहाचा कप आनंदीसमोर ठेवला व ते रेकॉर्ड पुन्हा सुरू केले. आनंदी ते ऐकत होतीच. बाबांचा आवाज तिच्या कानावर पडला.
“चला निघतो मी… येऊ परत नंतर.. माहेरपण खूप सुंदर झालं माझं इथे.. “
“अहो बाबा काय बोलताय..माहेरपण काय.. “
“अगं खरंच. तुम्हा बायकांनाच माहेरपण असतं का? आम्हा पुरूषांचं सुद्धा असतं माहेरपण. हसण्यावर नको नेऊस. आम्हा पुरूषांना सुद्धा स्वतःचे लाडकोड करून घ्यावे वाटतात. कुटुंब प्रमुख म्हणून किती तरी गोष्टी मनात असून सुद्धा करू शकत नाही. तुम्हां बायकांना गृहिणी म्हणून समर्पणाची,कौतुकाची शाबासकी मिळते पण कुटुंब प्रमुखाला, पुरूषाला केलेल्या त्यागासाठी एखादी थाप सुद्धा त्याच्या पाठीवर मिळत नाही. त्याचा त्याग कळतही नाही. अगं पूर्वी काही खाऊ वाटलं, नवीन वस्तू घ्यावी वाटली, मजा करावीशी वाटली, फिरावंसं वाटलं, तर आधी कुटुंबाच्या गरजा आणि मिळकत ह्यांची सांगड घालण्याचं गणित समोर ऊभं असायचं. परिस्थिती बेताची आणि जबाबदाऱ्या जास्त.
खूप खंत वाटते गं तुझ्या आईला सुद्धा माहेरपण अनुभवता आलं नाही. त्याकाळात घरात इतकी माणसं असायची आणि मिळकत कमी. परिस्थिती अगदी बेताची तिच्या माहेरी. मग भाऊ सगळं सांभाळत आहे ना आपण तिथे जाऊन त्याला अजून खर्च कशाला आणि जाण्या येण्यात माझा पैसा खर्च होईल म्हणून तुझी आई कुठल्याही कार्याशिवाय माहेरी गेली नाही. खूप कष्टात गेलं तिचं बालपण. तिचंच कशाला अगदी माझं सुद्धा कष्टातचं गेलं बालपण. पण म्हणून आम्ही कंटाळून गेलो नाही गं कष्टाला. म्हणूनच तर नंतर सुखाचे दिवस दिसले. तुम्हाला अगदी खूप काही नाही देऊ शकलो. पण गरजेचे होते ते सगळंच देण्याचा प्रयत्न केला. मुख्य म्हणजे शिक्षण देऊन तुम्हाला तुमच्या पायावर भक्कमपणे ऊभे करू शकलो आम्ही ह्यातच आम्हाला समाधान.
आता स्वायत्तता वाढली. थोडं स्थिरस्थावर झालो. पण आता वय झालं. तुझी आई खाऊपिऊ घालते गं. पण आता तिचं ही वय झालं आहे. तिलाही नाही जमत सगळंच करायला आता. स्वयंपाकासाठी बाई ठेवण ना तुझ्या आईला पटतं, ना मला. मग आहे ते, जमेल ते खायचं. घरातली कामं जास्तीत जास्त कशी स्वतःच करता येतील ह्याचा कल आणि चुरस आमच्यात असते. कारण ह्या वयातही आम्ही आधी एकमेकांचा विचार करतो. एकमेकांना कमी त्रास कसा होईल हे बघतो. पण इथे पंधरा वीस दिवस खा, प्या, लोळा, फिरा, नातवंडांबरोबर खेळ, जावयांबरोबर राजकारणावर गप्पा, मॅच बघणं, पिक्चर बघणं… किती, काय मजा केली आम्ही. आणि तू तर पदार्थाची रेलचेल केलीस. अग इतकं झेपत नाही प्रकृतीला. माझी हल्ली बडबड सुद्धा जास्त असते तीसुद्धा सहन केलीत शांतपणे.
आणि एरवी सुद्धा कधी तुम्ही ऑनलाईन पिक्चरची तिकीट काढून देता. एखादी टूर अरेंज करून देता, कधी हॉटेलचं टेबल बुक करून देता. आमचं अर्ध काम तर तुम्ही इथे बसून करून देता. पण एक सांगू का आमचं बालपण, तरुणपणात सगळंच कष्टात गेलं. पण म्हातारपणात आम्ही ते सगळं अनुभवतो आहे. त्यावेळेस जी हौसमौज करता आली नाही ती आता जमेल तशी पूर्ण करतो आहोत. आणि हे करण्यासाठी तुम्ही आम्हाला छान साथ देत आहात. आमची हौसमौज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहात. हे सुद्धा काही कमी नाही. वेळ काढून वेळेतच काळ येण्याआधी सगळं छान केलतं माहेरपण माझं. येईन परत माहेरपणाला नंतर . आत्ता निघायलाच पाहिजे. नाही आता थांबवू नकोस. माहेरपण थोडक्यातच असतं. जास्त दिवस किंवा कायमचं राहिलं तर ते माहेरपण कसलं. छान केलतं सगळं. रडू नकोस. चल येतो.”
“किती मार्मिक बोलतात बाबा. विचार करायला लावणारं आहे. खरंच लग्न झालेल्या मुलींचं माहेरपण होतं. पण आईबाबांचं माहेरपण. कधीच कसं नाही सुचलं. ठरलं आता तुमचं माहेरपण मी करणार अजून थोड्या हटके स्टाईल ने…अपने स्टाईल में .” आनंदीने ऊत्साहात फर्मानच काढला त्यादिवशी..
पण आपणं जे ठरवतो ते तसंच घडतं असं नाही ना… नियतीने काही वेगळच योजलेले असतं. आकाश ने ते रेकॉर्ड बंद केले. आनंदीला पेपर आणि पेन हातात देऊन म्हणाला, “हे ऐकल्यानंतर आणि जे घडलं आहे त्यानंतर तुझ्या मनात काय चाललं असेल त्याची कल्पना मला आहे. पण तू ह्या सगळ्यात बाबांची शिकवण विसरत आहेस. कितीही मोठे दुःख आले, कितीही मोठी संकट आली तरी आपली सकारात्मक वृत्ती कधीच सोडायची नसते. ही सकारात्मक वृत्तीचं आपल्याला संकटातून, दुःखातून बाहेर काढते ही बाबांचीच शिकवण. ती तू विसरू नकोस.
अगं आठव त्यांनी बेताच्या आर्थिक परिस्थितीत सुद्धा तुम्हा भावडांची शिक्षण केली. त्यावेळेस अगदी हालाकीच्या परिस्थितीत वाढणाऱ्या अनिकेत आणि ओजस्वीच्या शिक्षणाचा खर्च सुद्धा त्यांनीच केला… का. कशासाठी? त्या मुलांची हुशारी पैशांअभावी फुकट जाऊ नये म्हणूनच ना. मान्य आहे पुस्तक तुम्ही एकमेकांबरोबर शेअर करीत होता. शाळेचा गणवेष ही मोठ्यांचा नंतर लहानांनी वापरला. ज्याचा जो विषय चांगला त्याने तो विषय बाकीच्या मुलांना शिकवला असं तुम्ही सगळ्यांनी शिक्षण पुर्ण केलेत. पण तुमच्या प्रत्येक निर्णयाला आईबाबांचं प्रोत्साहन आणि पाठिंबा होता. त्यामुळेच तुम्ही इथपर्यंत आलात. बाबा नेहमीच सकारात्मक विचार कर होते. म्हणून समाजकार्य करू शकले. फार मोठं नाही पण कमी आर्थिक प्रमाणात.
काय काही कळतंय का? हे बघ मी तुला असं नाही सांगत की तू विसरून जा. रडू नकोस वगैरे . काही उपदेश ही नाही करणार. फक्त इतकंच सांगेन की तुला जे काही वाटतं जे मनात येतं. ते लिहून काढ ह्या कागदावर. मनात काहीही न ठेवता व्यक्त हो. लिही आनंदी… लिही…” आकाश अगदी पोटतिडिकीने तिला सांगत होता. त्याच्या समजावून सांगण्याचा थोडा परिणाम आनंदी वर दिसू लागला आणि ती पेपर वर लिहू लागली.
“आठवणींच गाठोड कितीही जड असलं तरी ते वाहून न्यावं लागतं. आठवणी संपल्या म्हणजे आपण संपलो आणि आपण संपलो की आठवणीही. निदान आपल्यापुरत्या तरी. आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती आपल्या आठवणींचं गाठोड वाहून घेते तिच्या अंतापर्यंत.आणि हे असंच सुरू राहतं अनंत अखंडित. कितीही वेदनादायक असलं तरीही….
बाबा माझ्याकडे रहायला आला होता. जाताना म्हणाला होता माहेरपण खूप छान केलंस. माहेरपण म्हणजे मौज करायची, बागडायचं. आपला आनंद वाटायचा आणि मनातली दुःखं,सल सांगायची, थकल्यावर आईच्या कुशीत झोपायचं, हरल्यासारखे वाटले तर वडीलांकडून लढण्याचं बळ घ्यायचं. ह्यालाच तर माहेरपण म्हणतात ना. तेच माहेरपण तुमचं करायचं होतं. तुमचे आईबाबा बनण्याचा प्रयत्न करायचा होता. मी तुमचं माहेरपण तुमच्या जन्मभूमीत सगळ्यांसोबत करायचं ठरवलं होतं. दुसर्यांच्या भल्याचा विचार सगळ्यात आधी करायचा हे तुमच्याकडून शिकले आहे बाबा. म्हणून तुमचा वाढदिवस मोठा साजरा करण्यात जो पैसा खर्च होणार होता त्या पैशांना मी सत्कारणी लावलं. आश्रमशाळेत ते पैसे मी दान केले होते. त्याचाच सत्कार कार्यक्रम आश्रमशाळेने ठेवला होता. खूप मोठा नाही. फक्त आश्रमशाळेतील मुलांबरोबर. सगळंच राहून गेलं आहे तुमच्या जाण्याने.
माझ्या लिखाणाचे तुम्हाला कौतुक होते. माझ्या लिखाणाचे, कवितेचे पुस्तक छापून यावे अशी तुमची इच्छा होती. तुमची ती इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. पण आता माझं कौतुक कोण करेल. त्यावेळेस माझ्या आयुष्यातील खूप जण दगा देत मला फसवून निघून गेले. तसेच तुम्ही सुद्धा मला फसवून निघून गेलात. न सांगताच. तुमच्या हृदयात आलेली कळ आमचं आयुष्य घेऊन गेली. तुमचं माहेरपण करायचं राहुन गेलं ही हुरहुर मात्र कायमची मागे ठेवून गेली.
काळजी करू नका. सावरते आहे हळूहळू. आईसाठी. कारण ती आहे तोपर्यंतच आता माझं माहेरपण. आणि आता आईचं ही माहेरपण मीच…
तुमच्या ह्या आठवणींचा पेटारा असेलच माझ्या साठी माझ्या अंतापर्यंत….
खूप खूप आठवण येते बाबा… “
आनंदी फक्त लिहीत नव्हती. ती व्यक्त होत होती. व्यक्त झाल्यावर आकाश च्या कुशीत जाऊन मनसोक्त रडून झाल्यावर म्हणाली,” मला बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. ते करत असलेले समाजसेवेचे कार्य आता मी पूर्ण करणार. त्याचबरोबर त्यांच स्वप्न माझं पुस्तक ते सुद्धा मी प्रकाशित करणार. माझ्या मनात अजून एक कल्पना आहे. माहेरपण आईबाबांचं. आता माझे बाबा तर नाहीत. पण ज्या आईबाबांना मुलं नाहीत, किंवा ज्या मुलांनी आईबाबांना सोडून दिलं आहे. त्यांच माहेरपण मी करणार आहे. नव्या जोमाने आणि सकारात्मकतेने मी जगणार बाबांसारखीच बाबांसाठी ” .
आकाशने आनंदीला “मी सोबत आहे तुझ्या” हे आश्वासन दिलं. आणि राहून गेलेलं माहेरपण करण्यासाठी दोघेही सज्ज झाले.
लेखिका -पुजा सारंग, मुंबई
वेळ काढून वेळेतच काळ येण्याआधी आईवडीलांसाठी करायच्या गोष्टी.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.
धन्यवाद !
माहेरपण छान वाटल.खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद मॅडम 🙏🏻
Excellent sentence framing and story too good, while reading sound it different.
Great….
धन्यवाद सर 🙏🏻
खूप छान कथा
धन्यवाद मॅम 🙏🏻
छान आहे कथा
आभारी आहे मॅडम 🙏🏻