मराठी कथा: ती एक रणरागिणी….
स्नेहा आपल्या शांतपणे निजलेल्या सहा महिने झालेल्या कान्हाकडे बघत होती. तिचं मन आता खूप अस्वस्थ झालेलं होतं. कितीही मनाला बुद्धीने समजावलं असलं तरीही आता ते मन अस्वस्थ झालं होतं! तो तिच्याकडेच एकटक बघत होता. ती तिच्या मनात सुरू असणारी खळबळ चेहऱ्यावर अजिबात येऊ देत नव्हती. डोळे नेहमीसारखेच होते हसरे, प्रसन्न! पण त्यामागे लपलेले दुःख तो सहज जणू शकत होता. त्याने तिची मान वर उचलली. मनात ती रडत होती!
“झालं…मनातल्या मनात रडून झालं?” तो थोडं रागानेच विचारलं. तशी ती गोड हसली.
“हसू नकोस… कधीतरी भावना व्यक्त कर ना… एक ऑफिसर असलीस तरीही जिवंत माणूसच आहेस तू… मी काही परका आहे का? लग्नाला पाच वर्षे झाली तरी तू अजून ही अशी आतल्या आत भावना लपवते… व्यक्त हो स्नेहा…” तो तिला आपल्या मिठीत घेत म्हणाला. त्याने तिच्या केसांवर ओठ टेकवले. ती डोळे मिटून ते अनुभवत होती.
“गप्प का बसलीस?” तो तिला दूर करत म्हणाला. तेव्हा मात्र ती त्याला घट्ट बिलगली.
“दूर नका ना करू… राहूदे काही क्षण असेच… पुन्हा कधी ही मिठी, ही पोसिटीव्ह फिलिंग अनुभवू शकेल माहीत नाही…. परत येईन की नाही माहीत नाही…”
“शु…. उगीच काहीही बोलू नकोस.” त्याने तिचे केस हातात घट्ट पकडले.
“अहो! सत्य हेच आहे. बॉर्डर वर काय होईल हे कुणाला माहीत आहे का? आपल्या झेंड्यामध्ये येण्याचं सुख त्या जवानालाच माहीत असतं! आपल्या देशासाठी, आपल्या देशबांधवांसाठी आम्ही हसत हसत मृत्यू स्वीकारतो! ज्यावेळी शपथ घेतो तेव्हाच ते स्वप्नं बघतो…. आलो तर यशस्वी होऊन नाहीतर तिरंग्यातून! “
आमच्या मनाची तयारी झालेली असते. तुम्ही तुमचे मन कणखर करा…. माझे काहीही झाले तरी कान्हाला सांगा… त्याची आई देशासाठी शहीद झाली… आपल्या देशासाठी, देशाचे रक्षण करण्यासाठी त्याला सोडून गेली… मला फक्त एक वचन पाहीजे… द्याल?” आज तिने पहिल्यांदाच त्याच्याकडे काहीतरी मागितले होते.
“काय?”
“कान्हाच्या नजरेत कधीच माझ्याबद्दल तिरस्कार निर्माण होणार नाही याची काळजी घ्याल? एक आर्मी ऑफिसर म्हणून मी माझ्या लेकराला इथेच सोडून सीमेवर जात आहे. देशासाठी असलेले कर्तव्य माझ्यासाठी पहिले आहे.मग बाकीचे. अगदी एका आईचे असणारे कर्तव्य ही दुय्यम आहे! मी त्याच्यापासून दूर जाणार! पण ती का जाते हे समजावून सांगाल ना? कारण सगळ्यांची आई सोबत असते आणि आपलीच आई आपल्या जवळ खूप कमी वेळा असते हे त्याच्या मनात येणारच.. त्यावेळी माझी बाजू घेवून त्याला शिकवाल ना…. त्याची आई एक आर्मी ऑफिसर आहे जी सीमेवर आहे…” ती खूप आशेने त्याला विचारत होती.
“हा काय प्रश्न आहे स्नेहा? मी नक्कीच त्याला समजावून सांगणार की त्याची आई एक रणरागिणी आहे. जी स्वार्थी विचार न करता पूर्ण देशाचा विचार करून तिचे कर्तव्य बजावत आहे. मी त्याच्या नजरेत तुझी किंमत कमी होवू देणार नाही किंवा तुझ्याबद्दल तिरस्कार! मी त्याला नक्कीच आशा वातावरणापासून दूर ठेवायचा प्रयत्न करेन. कान्हा कधीच कोणत्याही सैनिकाचा अपमान करणार नाही.” त्याने तिला आश्वस्थ केले. कान्हा उठला. तशी ती त्याच्यासोबत थांबली. त्याच्यासोबत वेळ घालवू लागली. कारण ती उद्या त्याच्यापासून दूर जाणार होती.
स्नेहा जाणार म्हणून तिचे आईबाबा तिच्या सासरी आलेले होते. तिच्या आईला आणि सासुबाईंना तिचे जाणे पटलेले नव्हते. कारण कान्हा फक्त सहा महिन्याचा आहे. त्याला स्नेहाची गरज आहे तरीही ती जाणार होती. आई आल्यावर तिच्यासोबत नीट बोलत नव्हती. कारण आजीचा नातवाच्या काळजीने जीव घाबरून गेला होता. शिवाय तिच्या सासरचे काय म्हणतील?
“काकू… अशा गप्प का तुम्ही?” आल्यापासून सगळ्यांचे करत असताना मैथिली म्हणजे स्नेहाची मोठी जाऊ बघत होती. एकत्र कुटुंब होते. स्नेहाच्या आईचा स्वभाव खूप बोलका होता. पण ती आता गप्प होती.
“काही नाही… स्नेहा जाणार म्हणून!” माधवी ( आई)
स्नेहा ते बोलणे ऐकल्यावर म्हणते. “आई मी आज पहिल्यांदा सीमेवर जात नाहीये. मी कायमच सीमेवर जात आले आहे. दरवेळी तू इतकी हळवी कधीच झालेली नव्हतीस. नाही माझं लग्न झालं म्हणून भरपूर रडली होती. हे खरं कारण नाहीये.” तिने आईवर नजर रोखली.
“दरवेळी तू जात होतीस. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. आणि आजची परिस्थिती वेगळी आहे. मी तुला लग्न झाल्यानंतर ही पोस्टिंग बदलून घे म्हणून बोलले होते. तू त्यावेळी ही ऐकलं नाहीस. आणि आता…. आता तू एका बाळाची आई आहेस. सहा महिन्याचे लेकरू आहे. त्याला तुझी गरज असताना तुला नोकरीवर जायची खरोखर गरज आहे का? बाळासाठी तू तुझी नोकरी सोडू शकत नाहीस?” आई चिडून म्हणाली. आणि स्नेहाचे डोळे काठोकाठ भरले. आईच आपल्याला समजून घेत नाही.
“आई… तू काय म्हणत आहेस? माझ्यासाठी ती फक्त नोकरी नाहीये. माझे प्रेम, माझा ध्यास, माझं जग आहे. तिथे पोहोचण्यासाठी रात्रंदिवस मी कष्ट केले, अवघड ट्रेनिंग पूर्ण केले. ते अस सोडून देण्यासाठी का? आई तू तरी हे बोलायला नको होते. मला वाटलं तू समजून घेशील…. सगळ्यांना मी का चुकीची वाटते?” ती काहीशी चिडली.
“काय चुकीचं बोलले मी? आई आहेस तू! या सगळ्यात त्या बाळाचा काय दोष आहे? कान्हाला तुझी गरज आहे हे तुझ्या लक्षात येत नाही का? देशापुढे त्या बाळाला काहीच किंमत नाही का तुझ्यालेखी?” विद्याताई (सासूबाई) ही म्हणाल्या.
“स्नेहा… तू आत जा… कान्हा उठला आहे.” मैथिली म्हणाली. तशी स्नेहा शांत होत आत गेली. बाहेर बाबा, सासरे, दीर हे सगळं बोलणं ऐकत होते. स्नेहा आत गेली तसे ते सगळेच आत आले.
“तुम्हा दोघींचे काय सुरू आहे?” वामन (सासरे)
“अहो.. विषय माहीत आहे तरी का विचारात आहात?” विद्या चिडून म्हणल्या.
“तुम्ही स्नेहाला धीर द्यायचा सोडून तिचे मानसिक खच्चीकरण करत आहात! तुम्हाला काहीच लाज वाटत नाही का? तुमची सून स्वत:च्या भावना मनात दाबून आपल्या देशासाठी सीमेवर जात आहे. तिचे कौतुक करायचे सोडून तिला अडवत आहात?” वामनराव चिडून म्हणाले.
“यात कौतुक कसले करू? तान्ह्या बाळाला सोडून जात आहे म्हणून?” आई
“चुकते आहेस तू माधवी.” मनोज म्हणजे स्नेहाचे बाबा म्हणतात. “तिथे कुटुंब, मुले, घरदार या सगळ्याचा विचार न करता हे सैनिक उभे आहेत म्हणून आपण इथे सुरक्षित आहोत. आपले पोलीस बांधव आपल्या परिवारापासून दूर राहून देशभर आपली रक्षा करत आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत. आर्मी, नौदल, पोलीस, एअर फोर्स यात काम करणार्यांना कुणाला भावना नसतात असं वाटत का तुला? त्यांनाही भावना आहेत. त्यांचे कुटुंब आहे. पण फक्त आपल्याच कुटुंबापुरता स्वार्थी विचार ते करत नाहीत. त्यांच्या लेखी आपला देश हा सगळ्यात जास्त महत्वाचा असतो त्याच्यासाठी ते घर, मुले सगळ्यांपासून दूर जातात.
आज तुझी लेक देशासाठी जात आहे. जेव्हा तिने पहिल्यांदा आर्मीचा गणवेश घातला त्यावेळी तुला तिचा अभिमान वाटला. पण बाळाला सोडून जाते म्हणून आज तूच तुझ्या मुलीला नावे ठेवतेस? तुला आता जास्त अभिमान वाटला पाहिजे कारण तुझी मुलगी आपल्या लहान बाळाचा विचार करून घरात बसली नाही तर सगळ्या देशाचा, देशात असणार्या प्रत्येक बाळाचा विचार करून सीमेवर जात आहे. तिला आपल्या बाळाला इथे सोडून जाताना आनंद होतोय? नाही. पण कर्तव्य माणसाला कठोर बनवते. त्यांना दिलेले ट्रेनिंग या भावना लपवून राहायला शिकवते. ती तिचे गरोदर असतानाचे दिवस ऑफिस वर्कमध्ये घालवत होती. तिने तेव्हा आठ दिवसांच्यावर सुट्टी घेतली नाही. आता तिला कमजोर करु नकोस. ती तिचा निर्णय बदलणार नाही.”
“राहता राहिला कान्हाचा प्रश्न! काकू, आई मी तुम्हाला वचन देते की मी कान्हाला कधीच अंतर देणार नाही. तो माझा मुलगा आहे. माझ्या दोन मुलांसोबतच मी त्याला मोठे करणार. त्याला कधीच आपली आई जवळ नाही हे भासवू देणार नाही. स्नेहा मला माझ्या बहिणीसारखी आहे. आणि ‘माय मरो मावशी जागो’ असं म्हणतात. स्नेहाला कान्हामुळे अडवू नका. सहा महिने झालेत त्याला. आता वरचे अन्न आपण देवूच शकतो. स्नेहाला त्याची काळजी आहेच. म्हणून ती सहा महीने थांबली. आता तिला अडवू नका.” मैथिली
“वहिनी….” स्नेहा भावुक होवून तिला मिठी मारते.
“रडू नकोस. मी आहे इथे. कान्हाला आता एकटे सोडू नकोस. त्याच्यासोबत वेळ घालव. उद्या जात आहेस न? मी कधीच त्याला अंतर देणार नाही, त्याचा दुसवास करणार नाही. तू निश्चिंत होऊन तुझे कर्तव्य कर.”
तिने काहीही न बोलता परत मिठी मारली . शब्द कमी पडले होते, पण चेहरा आणि तिची आश्वासक मिठी तिचे मन मोकळे करून गेली.
दुसर्या दिवशी दुपारी तीनच्या ट्रेनने स्नेहा आपल्या नोकरीच्या ठिकाणी जायला निघाली. तिने तिचा गणवेश घातला होता. कान्हा कुतुहलाने आपल्या आईला बघत होता. तिने स्टेशन वर जाईपर्यंत आपल्यापासून कान्हाला दूर केले नाही.
“अहो…. तुम्ही होता म्हणून मी येवू शकले. कारण तुम्ही मला कायम सपोर्ट केलात. कान्हासाठी तुम्ही मला रिझाईन करायला लावू शकत होतात. पण तुम्ही मला ते करायला लावले नाहीत. समजून घेतले. आणि घरी सगळ्यांना समजावले.”
“मी इतकं काहीच केले नाही.”
“तुम्ही जे केलेत ना ते सगळे नाही करत. आज माझ्यासारख्या कितीतरी आया फक्त आपल्या बाळासाठी आपली नोकरी सोडून घरी थांबतात. मग ती पोलीस असो, शिक्षिका असो किंवा अजून कोणी! आई झाल्यावर तिचे जग आपल्या मुलांभोवतीच फिरते.
काल माझी आईच मला नावं ठेवत होती. कारण मी बाळाला सोडून जात आहे. पण वहिनी, दोन्ही बाबा, दादा आणि तुमच्यामुळे मी माझे देशाप्रती असणारे कर्तव्य करायला जात आहे. तुमचा पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे.” ती कान्हासोबत त्याच्या मिठीत शिरली. त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. ट्रेन आली. कान्हा एकदा डोळ्यांत साठवून ती मागे न बघता ट्रेन मध्ये चढली. भारत मातेच्या रक्षणासाठी आपल्या कान्हाला सोडून सीमेवर गेली.
स्नेहा सारख्या रणरागिणीना मानाचा मुजरा! देशाच्या प्रत्येक सीमेवर काम करत असणार्या, सर्व सेनेत असणार्या जवानांना, पोलीस, सगळ्याना मानाचा मुजरा! त्यांचे आभार! ते तिथे आहेत म्हणून आपण इथे आहोत!
धन्यवाद.
लेखिका – सौ. वेदिका केळकर वाटवे.
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे. लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
खरंच आहे. सलाम त्या मातांना… कथा मस्तच
छान…!!
खूप सुंदर कथा.खरेच अशा विरांगना ना समजून घेणे खूप गरजेचे आहे.
खूपच छान .सलाम प्रत्यक स्त्री ला जी कर्तव्य दक्ष असते…
prernadayi katha